घरक्रीडाMithali Raj : धाकड!

Mithali Raj : धाकड!

Subscribe

'एखादी महिला क्रिकेटपटू १५-२० वर्षांहूनही अधिक काळ क्रिकेट खेळणे अवघड आहे,' हा समज खोटा ठरवत भारताच्या मिताली राजने जगासमोर वेगळे उदाहरण ठेवले आहे. मिताली तब्बल २१ वर्षे भारताचे प्रतिनिधित्व करत असून तिने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. नुकताच तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७ हजार धावांचा टप्पा पार केला. मिताली तिच्या तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखली जाते. परंतु, शांत आणि संयमी वाटणारी मिताली आपल्यातील आक्रमकता दाखवायलाही घाबरत नाही. महिला क्रिकेटवर होणारा अन्याय, बीसीसीआय काही वर्षांपूर्वीपर्यंत महिला क्रिकेटवर करत असलेले दुर्लक्ष याबाबतही ती स्पष्टपणाने बोलते.

धाकड, निडर, बिंदास ही विशेषणे जिला तंतोतंत लागू पडतात ती म्हणजे भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज. भारतीय महिला तिने निवडलेल्या क्षेत्रात सर्वोच्च पातळीवर जाऊ शकते, आपल्या कर्तृत्वाने जगावर ठसा उमटवू शकते याचे मिताली उत्तम उदाहरण आहे. मितालीने नुकताच एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७ हजार धावांचा टप्पा पार केला आणि ही कामगिरी करणारी ती जागतिक क्रिकेटमधील पहिली महिला खेळाडू ठरली. त्याआधी काही दिवस तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या आणि इंग्लंडची माजी कर्णधार शार्लेट एडवर्ड्सनंतर हा टप्पा पार करणारी ती केवळ दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली. एडवर्ड्सच्या कामगिरीचे कौतुक आहेच, पण मुळात इंग्लंड आणि भारत या दोन देशांमधील संस्कृती, महिलांना असलेले स्वातंत्र्य यात मोठा फरक आहे. इंग्लंड हा देश ‘मॉर्डन’ मानला जातो. तिथे महिला क्रिकेटलाही पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, भारताचे तसे आहे का?

भारतात महिला क्रिकेट खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले ते २०१७ एकदिवसीय वर्ल्डकपनंतर. भारतीय संघाने या वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी भारताच्या महिलांनी दाखवलेल्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक झाले. या संघाचे नेतृत्व कोणी केले? मितालीनेच! मात्र, हा वर्ल्डकप आणि मितालीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण यादरम्यान १८ वर्षे उलटून गेली. प्रकाशझोतात न राहता, आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचे कौतुक होत नसतानाही इतकी वर्षे खेळत राहणे फार अवघड आहे. मात्र, मितालीचे क्रिकेटवर असलेले प्रेम आणि तिला देशासाठी खेळत असल्याचा अभिमान यातूनच दिसून येतो.

- Advertisement -

हवाई दलाचे माजी अधिकारी असलेल्या मितालीच्या वडिलांनी अगदी लहानपणासून तिला कडक शिस्त लावली. वयाच्या आठव्या वर्षापासूनच ती मोठ्या भावासोबत क्रिकेटचे प्रशिक्षण घेऊ लागली. यातूनच मिताली खऱ्या अर्थाने घडली. तिने १९९९ मध्ये वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आपल्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात आयर्लंडविरुद्ध नाबाद शतकी खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही.

२००० च्या दशकात ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, लक्ष्मण यांनी भारतीय पुरुष क्रिकेट संघाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले, त्याचप्रमाणे महिला क्रिकेटमध्ये मिताली, झुलन गोस्वामी या दोघींनी मिळून भारतीय संघाचा दर्जा उंचावला. हळूहळू युवा खेळाडू पुढे येत गेल्या आणि भारतीय महिला संघ इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांना झुंज देऊ लागला. या युवा खेळाडूंना लढण्याचा, जिंकण्याचा विश्वास दिला तो मिताली आणि झुलन यांनीच.

- Advertisement -

मिताली तिच्या तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखली जाते. जगात कुठेही, कोणत्याही खेळपट्टीवर धावा करण्याची तिच्यात क्षमता आहे. महिला क्रिकेटमध्ये अजूनही फारसे कसोटी सामने खेळले जात नाहीत. २१ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत मितालीला केवळ १० कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. मात्र, त्यातही तिने एक द्विशतक झळकावताना विक्रमाला गवसणी घातली होती. तिने २००२ मध्ये टॉन्टन येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत २१४ धावांची खेळी केली आणि महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आपल्या नावे केला होता. मात्र, त्यानंतर पाकिस्तानची खेळाडू किरण बलुचने (२४२) तो मोडला.

मितालीने आतापर्यंत १० कसोटीत ५१ च्या सरासरीने  ६६३ धावा केल्या आहेत. तिला फारसे कसोटी सामने खेळायला मिळाले नसले, तरी एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये तिने आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. तिला २१३ एकदिवसीय सामन्यांत ७०१९ आणि ८९ टी-२० सामन्यांत २३६४ धावा करण्यात यश आले असून यात ७ शतकांचा समावेश आहे. बरेचदा भारतीय संघाने लवकर विकेट गमावल्यावर मितालीला खेळपट्टीवर येत डाव सावरावा लागतो आणि ती हे काम अगदी शिताफीने करते. ती संयम राखून आणि सावध फलंदाजी करण्यासाठी ओळखली जाते. परंतु, शांत आणि संयमी वाटणारी मिताली आपल्यातील आक्रमकता दाखवायलाही घाबरत नाही.
२०१७ महिला एकदिवसीय वर्ल्डकपच्या वेळी मितालीला ‘तुझा आवडता पुरुष क्रिकेटपटू कोण?’ असा प्रश्न विचारला गेला. या प्रश्नाचे तिने जे उत्तर दिले, ते ऐकून तिचे चाहत्यांनी कौतुक केले. मिताली त्या प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाली, ‘तुम्ही पुरुष क्रिकेटपटूला तुझी आवडती महिला क्रिकेटपटू कोण, असा प्रश्न विचारता का?’ महिला क्रिकेटवर होणारा अन्याय, बीसीसीआय काही वर्षांपूर्वीपर्यंत महिला क्रिकेटवर करत असलेले दुर्लक्ष याबाबतही ती स्पष्टपणाने बोलते.
मिताली फलंदाज म्हणून महान आहेच. ती कर्णधार म्हणूनही तितकीच यशस्वी आहे. भारतीय महिला संघाला अजून एकदिवसीय वर्ल्डकप जिंकता आला नसला तरी २००५ आणि २०१७ असे दोनदा मितालीच्या नेतृत्वात भारताने वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली. २०१७ वर्ल्डकपनंतर देशातील महिला क्रिकेटचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. मागील काही वर्षांत भारतीय महिला क्रिकेटचा चढता आलेख पाहायला मिळत आहे. आता युवा खेळाडू पुढे येऊन भारताला सामने जिंकवत आहेत.
या सगळ्याचा पाया रचणाऱ्या महिला क्रिकेटपटूंमध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावणारी मिताली अजूनही या संघाचा भाग आहे आणि ती नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. आता तिने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून तिला भारताला एकदिवसीय वर्ल्डकप जिंकवून द्यायचा आहे. कोरोनामुळे एका वर्षाने लांबणीवर पडलेला महिला वर्ल्डकप पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणार आहे. मागील काही वर्षांत भारताला जेतेपदाने हुकवणी दिली आहे. परंतु, न्यूझीलंडमध्ये होणारा हा वर्ल्डकप भारत जिंकेल आणि मितालीसह भारतीय महिला क्रिकेट संघाचे स्वप्न पूर्ण होईल हीच आशा!

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -