घरताज्या घडामोडीसरकार आंधळ झालयं, शिक्षेएवजी सचिन वाझेला दिली नोकरी, ख्वाजा युनूसच्या आईचा टाहो

सरकार आंधळ झालयं, शिक्षेएवजी सचिन वाझेला दिली नोकरी, ख्वाजा युनूसच्या आईचा टाहो

Subscribe

ख्वाजा युनूसच्या एन्काऊंटर प्रकरणात आरोपी असलेले सचिन वाझे यांना सेवेत घेतलेच नसते तर सरकारवर दुसऱ्यांदा निलंबनाची कारवाई करण्याची वेळ आली नसती. शिक्षा देण्याएवजी सरकारने त्याला सेवेत घेतले म्हणूनच या सरकारवर विश्वास नाही असा आरोप ख्वाजा युनूसची आई आशिया बेगमने केला आहे. ख्वाजा युनिस प्रकरणाचा निकाल लावून या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी ख्वाजा युनूसच्या आईने केली आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये या संपुर्ण प्रकरणात कायदेशीर लढाई लढताना आमच्या संपुर्ण कुटूंबाचे हाल झाले. पण माझ्या जीवनाच्या शेवटच्या घटकेपर्यंत या प्रकरणात पाठपुरावा करणार असल्याचे आशिया बेगम म्हणाल्या. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची वेळ आली तरीही या प्रकरणातील लढाई थांबवणार नाही असे त्यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

माझ्या मुलाचा म्हणजे ख्वाजा युनूसचा एन्काऊंटर केल्या प्रकरणात सचिन वाझे या संपुर्ण कायदेशीर लढाई दरम्यान अनेकदा पोलिसांवर दबाव आणत होते. पोलिसांना धमकावत होते. म्हणून या प्रकरणी वारंवार तारखा मिळत गेल्या. सरकार आंधळ झाले आहे, म्हणूनच माझ्या मुलाला न्याय मिळण्याएवजी सचिन वाझे यांना पोलिस दलात पुन्हा सेवेसाठी सामावून घेण्यात आले. मधल्या काळात आमच्या कुटूंबाची अतिशय वाईट अवस्था झाली. दरम्यानच्या काळात माझ्या पतीचे निधन झाले. राहते घरदेखील हातातून गेले, अशा स्वरूपात संपुर्ण प्रकरणात लढाई सुरू असल्याची वास्तविकता आशिया बेगम यांनी मांडली. आज संपुर्ण प्रकरणाला १८ वर्षे झाली, या प्रकरणातला निकाल लागलेला नाही. म्हणूनच आमच्या प्रकरणातील न्याय लवकर मिळावा अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली आहे. आमचा सरकारवर विश्वास नाही, पण न्यायालयावर आणि कायद्यावर नक्कीच विश्वास आहे. त्यामुळेच जोपर्यंत न्याय मिळत नाही तोवर या प्रकरणात लढतच राहणार असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

काय आहे ख्वाजा युनूस एन्काऊंटर प्रकरण ?

२ डिसेंबर २००२ रोजी घाटकोपर येथे बसमध्ये बॉम्बस्फोट झाले होते. यात दोण जणांचा मृत्यू झाला तर ३९ जण जखमी झाले होते. यावेळी आठजणांना अटक करण्यात आली होती. त्यात ख्वाजा युनूस (२७) या व्यवसायाने इंजिनियर असलेल्या तरूणाचाही समावेश होता. युनूस मूळचा परभणीचा होता पण दुबईत नोकरी करत होता. २५ डिसेंबर २००२ ला त्याला पकडण्यात आले होते. पोटा अंतर्गत त्यांना अटक करण्यात आले होते. ६ जानेवारीला घाटकोपर पोलीस ठाण्यात युनूससह अन्य तीनजणांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर युनूस कोणाला दिसलाच नाही. ७ जानेवारीला तो फरार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर चौकशीसाठी औरंगाबादला नेत असताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. याच संधीचा गैरफायदा घेत युनूस तिथून पळून गेला. असा दावा पोलिसांनी केला.

मात्र, युनूसबरोबर असलेल्या त्याच्या साथीदाराने पोलिसांनी युनूसला नग्न करून बेदम मारहाण केल्याचे सांगितले. तसेच त्याच्या तोंडातून रक्त येत असतानाही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे न्यायालयाला सांगितले.
त्यानंतर युनूसच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयाकडे हे प्रकरण सोपवण्याची विनंती केली. उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग केलं. सीआयडीच्या तपासात युनूसचा मृत्यू पोलीस कोठडीतच झाल्याचे समोर आले. तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर खटला दाखल करण्यात आला. त्यांच्यावर हत्या व पुराव्यांशी छेडछाड केल्याचा आरोप ठेवण्यात आला. २००४ साली वाझे यांच्यासह अन्य तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले. मात्र २०१८ नंतर याप्रकरणी सुनावणी झालीच नाही.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -