घरठाणेमुंबईतून 100 कोटी तर ठाण्यातून किती?

मुंबईतून 100 कोटी तर ठाण्यातून किती?

Subscribe

परमबीर सिंह यांच्या ठाण्यातील कारकिर्दीवरही प्रश्नचिन्ह

मुंबई क्राईम ब्रँचमधील निलंबित व सध्या अटकेत असलेले वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणात वादग्रस्त ठरलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या ठाण्यातील आयुक्तपदाच्या कारकिर्दीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मुंबईतून जर 100 कोटी वसूल करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांच्यामार्फत पोलिसांना दिले होते तर परमबीर सिंह ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना ठाणे जिल्ह्यातून किती कोटींची कमाई करण्यात आली असा प्रश्न आता विचारला जात आहे.

परमबीर सिंह हे ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याला खंडणीच्या प्रकरणांमध्ये ठाणे पोलिसांनी अटक केली होती. तसेच बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आरोपी असलेल्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाशही परमबीर सिंह यांच्या काळातच ठाणे पोलिसांनी केला होता. परमबीर सिंह यांचा ठाण्यातील पोलीस आयुक्त पदाच्या ठाणे गुन्हे शाखेचा कारभार हा एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्याकडे होता. तर ठाणे पोलीस आयुक्तालयातील खंडणीविरोधी पथकाचे राजकुमार कोथमिरे या अधिकार्‍याकडे होते. या दोन्ही पोलीस अधिकार्‍यांची ठाण्यातील कारकीर्द अत्यंत वादग्रस्त होती.

- Advertisement -

त्या काळामध्ये राज्यात भाजप-शिवसेना युतीचे अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार होते. त्यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षाही ठाणे क्राईम ब्रांचचे प्रमुख असलेल्या एन्काऊंटर फेम प्रदीप शर्मा यांचा दबदबा मुंबई व ठाणे जिल्ह्यातील बिल्डर्स लॉबी, बडे उद्योजक, व्यापारी, डान्स बार मालक तसेच हॉटेल व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणावर होता. त्यामुळे प्रदीप शर्मा यांच्या कार्यालयात तसेच निवासस्थानी देखील मोठ्या बिल्डर्स मंडळींचा, उद्योजकांचा, हॉटेल व्यावसायिक आणि बार मालकांचा मोठ्या प्रमाणावर राबता असे.

बहुचर्चित सूरज परमार आत्महत्या प्रकरण देखील याच काळात अधिक तापवले गेले. आणि त्यातूनही उद्योजक, वरिष्ठ सरकारी अधिकारी, बिल्डर, ठाण्यातील नगरसेवक आणि त्याहीपेक्षा म्हणजे ठाण्यातील दोन बड्या नेत्यांकडून देखील परमार प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वसुली करण्यात आल्याची चर्चा होती.

- Advertisement -

ठाणे खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख राजकुमार कोथमिरे यांच्या विरोधात तर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी उघड तक्रार केली होती. मात्र, त्यानंतरही परमबीर सिंह यांचा वरदहस्त असल्यामुळे एन्काऊंटर फेम प्रदीप शर्मा आणि राजकुमार कोथमिरे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

त्यामुळेच आता मुंबईप्रमाणेच परमबीर सिंह यांच्या ठाणे पोलीस आयुक्त पदाच्या कारकिर्दीबाबतही प्रश्नचिन्ह उभे राहिले असून येथील वादग्रस्त पोलीस अधिकार्‍यांना अभय देऊन परमबीर सिंह यांनी काय हस्तगत केले? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे त्यांच्या ठाण्यातील पोलिस आयुक्त पदाच्या कारकिर्दीची ही चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे.
सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळ्यामध्ये प्रमुख आरोपी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासह अन्य मंडळींना या घोटाळ्यामधून क्लीन चिट देण्यात आली. त्यावेळी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा कारभार अतिरिक्त पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांच्याकडे होता. त्यामुळे ही क्लीन चिट कशी देण्यात आली, अशी चर्चा रंगली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -