घरफिचर्ससारांशआयनाच्या बायना घेतल्याशिवाय जायना!

आयनाच्या बायना घेतल्याशिवाय जायना!

Subscribe

महाशिवरात्रीची कुणकेश्वर जत्रा संपली की, मालवणी माणसाला वेध लागतात ते होळीचे. होळी आणि गणपतीला कोकणी माणूस गावी जाण्यासाठी एसटी किंवा ट्रेनच्या तिकीटासाठी का धडपडतो हे त्या किनारपट्टीवर एक मोठा फेरा मारल्याशिवाय नाही कळायचे. ह्या उत्सवाची झिंग काही वेगळीच! आयनाच्या बायना घेतल्याशिवाय जायना, म्हणत गावभर फिरणारी ती मुलं, त्यांच्यामागून होणारे राधाखेळे ही बघण्याची मजा फक्त कोकणात.

होळी सणाच्या मुळाशी असणारी संस्कृती ती ग्रामसंस्कृती, कृषीसंस्कृती यांच्याशी मुख्यत: जोडली गेली आहे. त्यामुळे कोकणातील विशेषतः तळकोकणात तिथल्या तालुक्यानुसार होळीचे खेळे हे बदललेले दिसतात. सिंधुदुर्ग अर्थात मालवणी मुलखातली होळी हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे, कधी खळ्यात आम्ही भावंडे एकत्र बसलो की, थोरली काकी नाहीतर माईआजी येऊन तिथे गावच्या गजाली सांगायची. तिच्या गजाली सांगण्यामागे एक मूळ हेतू असायचा तो म्हणजे घराचा मोठेपणा आम्हा मुलांना कळावा.

आजी सांगायची अरे आमी ईनामदार, आमी देवाधर्माच्या कामात मधे जाणारे नाय….देवाधर्माचा सगळा काम पयलाडचे साटम करायचे, ते मानकरी. राजसत्ता त्यांच्याकडे. लोकांका कर लावल्यानी, पण आमच्या ईनामदारान कर देवक नाय, तो म्हणालो, आमी तुझ्या बरोबरीचे, तुझी प्रजा नाय. मी कर नाय देतलय. आजीच्या ह्या इतिहासात ईनामदार किती मोठे असतात, त्यांची गावात पत काय असते हे सांगण्यासाठी तिचा हा घोका चालू राहायचा. आजीच्या ह्या इतिहासातून एक गोष्ट कळली की, ईनामदाराने मानकर्‍यांना कर द्यायला नकार दिला आणि मानकर्‍यांनी ईनामदारांच्या घरासमोर निशाण न्यायला बंदी केली.

- Advertisement -

मालवणी मुलखातली शंभर वर्षापूर्वीची पद्धत ही अशी होती. तिथे राजसत्ता मोठी होती. होळीच्या मुळाशी ही ग्रामसंस्कृती होती. त्याला जातीव्यवस्थेचा दुर्गंध होता, पण ग्रामसंस्कृती ह्या कारणाने टिकून होती. होळी हा काही एकदिवसाचा सण नाही कोकणात पाच दिवस होळी चालते. कोकणातल्या ह्या उत्सवाला शिमगा म्हणतात. ह्या शिमग्याची तयारी किती मोठी. बहुतेक गावात गावहोळी केली जाते, म्हणजे हा सण जनवेद आहे. संपूर्ण गाव एकत्र येऊन हा सण साजरा करतात. आज बलुतेदार पद्धत नष्ट होत असतानादेखील सण-सोहळे आले की, बलुते आज एकत्र येताना दिसतात. जंगलात जाऊन होळीसाठी मोठं झाडं तोडून त्याचा वासा होळीच्या मध्ये उभा करण्याअगोदर त्याच्यावर गावातल्या सुताराने हात फिरवावा लागतो, त्या मोठ्या सरळसोट लाकडाला छेदण्याचे काम हे त्यांचेच.

ह्या उभ्या केलेल्या गावहोळीचे स्वरूप तेव्हाच प्राप्त होते जेव्हा ह्या लाकडाला बाजूने आंब्याच्या टाळाने सजवले जाते. एकदा होळी उभी राहिली की, गावाचे मानकरी, बारा पाच आणि बाकीची जनता उभी राहते, एकदा ह्या सगळ्याला मूर्त स्वरूप आलं की, गावचा गावकर कमरेला बांधलेला टॉवेल सोडून कपाळाचा घाम पुसत ‘सगळे इले, सगळ्यांनी नारळ हाडून ठेवा हय…..आणि गारांना घालूक उबे र्‍हवा, असं म्हटलं की, गावकरी सगळे होळीच्या पुढ्यात जाऊन नारळ ठेऊन गावकर सांगेल तसे उभे राहतात, आता गावकर स्पुरण पावतो. आपल्या शब्दाला मान मिळाला ह्याचा त्याला आनंद असतो, शेवटी पुन्हा एकदा कपाळाला आठ्या चढवत तिथे उभ्या असलेल्या मानकर याला पुढे यायला सांगतो, मानकरी जर मुंबईहून गावी गेला असेल तर गावकर्‍याच्या शब्दाला विशेष धार येते मग रे बाबी, असो पाटी काय र्‍हावत. तुझी बायल काय म्हणाची नाय, हात जोड नी फुडे ये असो …. गावकरच्या ह्या शब्दाने मनातून घायाळ झालेला तो मानकरी पुढे येतो, ह्या गावच्या रहाटीत त्याला फारसा रस नसतो. त्याला मुळात गावरहाटी मान्य नसते. गावागावातून होणारे जाती-पतीची राजकारणे, त्यातून धुमसणारी आग ह्या पासून त्याला लांब राहायचे आहे, पण आज त्याला ही पूर्वापार आलेली परंपरा आपल्या खांद्यावर वागवायची आहे,

- Advertisement -

एकदा ही तयारी झाली की, मग गावकर गाराण्याला सुरुवात करतो. हल्ली समाजमाध्यमावर अनेक होळीची गर्‍हाणी पोस्ट केली जातात, पण गावातल्या होळीसाठी राठीचे एक विशिष्ठ गार्‍हाणे ठरले आहे. गावातले गावकर तेच गार्‍हाणे होळीच्या समोर घालतो.

बा ! लिंगा, जैना, ब्राम्हणा
पाच पुरी बारा आकार
रवळनाथा, आई पावणाई. तू सर्व समर्था बाबा नागेश्वरा
तू चौर्‍यांशी खेड्याचो सत्ताधीश
तुझ्या हातातली सत्ता
तू मूळपुरुष, चाळो
बाय मावले ह्या वार्षिकाचा फळ तुझ्या पायी ठेयाला हा
ता मान्य करून घी
लेकरा बाळा, राय रयत, ढोरा वासरा सुखी ठेव.
शेती भाती राख
ह्या लेकरांनी तुझी सेवा चाकरी केल्यानी ती मान्य करून घी
नोकरीधंद्याच्या निमतान ही रयत गाडी घोड्यात्सून फिरता त्याची रखवाली कर
नी कोणाचा चुकला माकला असात ता पायाखाली घी
नी मावले सगळ्यांची रखवाली कर

असं कडकडीत गार्‍हाणं झालं की, पुन्हा मानकरी पूजा करून त्यादिवशी होळीचा कार्यक्रम संपतो. पण शिमग्याची खरी मजा नंतरच्या दिवसात असते. शिमग्याची खरी मजा दुसर्‍या दिवशी गावातल्या चव्हाट्यावर एका विशिष्ठ जागेवर वाडीची होळी उभारली जाते, गावहोळी झाल्यावर वाडीची होळी उभारण्याची पद्धत आहे. ह्या वाडीच्या होळीच्या बाजूला एक रिंगण आखले जाते आणि गावातली पोरं त्या होळीच्या बाजूने बसलेली असतात, कोणाचा पाय त्या रिंगणात पडला की, बाजूची पोरं शबय …शबय म्हणून ओरडत त्या माणसाकडून पैशाच्या स्वरुपात बक्षिशी मिळवतात. शबय ह्या शब्दाची उत्पत्ती कशी झाली याबद्दल सांगताना भाषातज्ञ विद्या प्रभू म्हणतात की, मालवणी बोलीत काही शब्द हे फारसी बोलीतून आलेले आहेत, त्यातील सबाह-अल-खैर हा शब्द फारसी भाषेत आहे. याचा अर्थ सुप्रभात असा मानला गेला आहे ह्यातील सबाह हा शब्द घेऊन त्याचे रूप सबाह-सबह-सबय-शबय याचा अर्थ शुभ हो असा प्रचलित झाला असावा.

शबय हा शब्द तशा अर्थाने घेतला तर संदर्भ तितकाच समर्पक वाटतो, हा शब्द आशीर्वाद प्रयोजन वाटण्याची शक्यता जास्त आहे. ह्या शिमग्याच्या सणाचं सांस्कृतिक विशेष लक्षात घेताना सामाजिक विशेष जास्त अधोरेखीत होताना दिसते. समाजाची ग्रामीण रचना आजच्या काळातदेखील जातीव्यवस्थेवर अवलंबून आहे. त्यामुळे ह्या शिमग्याच्या निमित्ताने सराव ग्रामव्यवस्था एका छत्राखाली येते. आयनाची बायना घेतल्याशिवाय जायना म्हणत येणारे राधाखेळे गावभर फिरत असतात. एखादे पौराणिक पात्र नाचवत गावभर खेळे करणारी पोरं म्हणजे ह्या संस्कृतीचा एक मोठा भाग आहे. ह्या संस्कृतीच्या तळाशी कुठेतरी दातृत्वाचे समाजभान आहे. ह्या समाजभानातून अनेक लोक एकत्र येतात हा एक सांस्कृतिक भाग ह्या सणाचा आहे.

गावागावात होणारे गोमू खेळे यांची गाणी ऐकली तर ह्या संस्कृतीचा एक मोठा भाग दिसून येतात. गोमुच्या खेळात लहानपणापासून एक गाणे ऐकत आलो आहे त्या गाण्यातून मालवणी मुलखातील माणसाला मुंबईची किती ओढ आहे हे लक्षात येईल, गावच्या माणसाला असणारी ओढ पूर्वी अनेक लोकगीतातून आली तशी राधा खेळातूनदेखील ती तितक्याच ताकदीने प्रकट झाली आहे,

गोमू चल जाऊ या
चौपाटी बंदराला
तेथे उभा आहे गो
यशोदेचा कान्हा

कान्हा मारेल गो
रंगाची पिचकारी
तुझी भिजेल गो
रेशमाची लाल साडी

ही गीते तशी मालवणी मुलखात कित्येक पिढ्या गायली जातात, त्यातून तेथील अर्थसंस्कृतीचा पट डोळ्यासमोरून जातो. आज मालवणी मुलुखातील अर्थसंस्कृती, राजकारण, ग्रामसंस्कृती बदलत चालली आहे, त्यातून संस्कृतीचे एक अनोखे दर्शन होत आहे. आजी किंवा काकीने सांगितलेला ईनामदार बदलला, तिथला मानकरी आता लोकशाही समाजाचा घटक झाला आहे. हल्ली तो गावकीकडून कराच्या स्वरूपात काही घेत नाही. कारण जनवेद संस्कृतीचे आता रुपांतर लोकसंस्कृतीत होत आहे. त्यामुळे ते दृश्य आता बदलतं चाललं आहे . तरी शिमग्याची खरी मजा ही मालवणी मुलखातच !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -