घरफिचर्सगडकरी...पूलकरी... रोडकरी...!

गडकरी…पूलकरी… रोडकरी…!

Subscribe

कोणत्याही परिसराचा विकास करताना साधारणपणे सत्ताधारी पक्ष स्वतःच्या पक्षाला अनुकूल स्थिती असलेल्या जिल्ह्यांमध्ये राज्यांमध्ये अधिक विकासाचा निधी देत असतो. मात्र केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरींचे मोठेपण हे म्हणता येईल की देशाचे रस्ते बांधणी मंत्री झाल्यानंतर कोणत्याही राज्याला विकास निधी देताना त्यांनी कधीही त्या राज्यांमध्ये कोणत्या पक्षाचे सरकार आहे याचा विचार न करता त्या राज्याच्या विकासासाठी कामांची गरज किती अधिक आहे याकडे अधिक लक्ष दिले. त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार असतानादेखील गडकरींनी महाराष्ट्राच्या रस्तेबांधणीसाठी, नव्या उड्डाणपुलाच्या बांधणीसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला.

देशाचे रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील रस्ते बांधण्यासाठी २ हजार ७८० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. कोकण आणि विदर्भ या विभागातील महामार्गांचे काम मार्गी लागण्यासाठी तसेच नव्याने काही महामार्ग बांधण्यासाठी या निधीचा मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राला उपयोग होणार आहे. नितीन गडकरी हे देशातील तसेच महाराष्ट्रातील देखील भाजपचे वरिष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. १९९५ सली जेव्हा राज्यात पहिल्यांदाच शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात नितीन गडकरी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. सत्तेद्वारे मिळालेल्या संधीचे सोने कसे करायचे हे जर कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्याला शिकायचे असेल तर ते त्याने आवर्जून नितीन गडकरी यांच्याकडून शिकावे. कारण १९९५ साली राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होताच गडकरींनी मुंबईतील पंचावन्न उड्डाणपुलांचे जाळे उभारण्याचा निर्धार केला. आणि केवळ निर्धार करून ते थांबले नाहीत तर फक्त प्रत्यक्षात मुंबईमध्ये त्यांनी ५५ उड्डाणपूल अल्पावधीत उभे करून दाखवलेदेखील. वरळी वांद्रे सी लिंक हा देखील त्यांचाच एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणता येईल. यावेळी विरोधकांनी गडकरींवर टोलकरी अशी टीका केली. मात्र होणार्‍या टीकेने किंचितही खचून न जाता गडकरींनी स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर टीकाकारांची तोंडे बंद केली. राज्याला महानगरांना जर गतिमान बनवायचे असेल, व्यापार उद्योग भरभराटीला आणायचा असेल, रियल इस्टेट क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीच्या संधी निर्माण करायच्या असतील तर राज्यामध्ये महानगरांमध्ये आणि शहरांमध्ये दळणवळणाची व्यवस्था ही अधिक गतिमान असली पाहिजे यावर त्यांचा नेहमी भर राहिला. त्यामुळेच त्यांनी प्रथम युती सरकारच्या काळामध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेस वे सारखा सुपरफास्ट एक्सप्रेस वे बांधून दाखवला. त्यामुळे मुंबईहून पुण्याला जायचे असेल तर जिथे सहा ते सात तास लागायचे ती वेळ अवघ्या तीन-साडेतीन तासांवर आली. मुंबई-पुणे करांचा प्रवास अधिक सुरक्षित व गतिमान झाला. वाहनचालकांना प्रवाशांना जर चांगले रस्ते, उड्डाणपूल मिळत असतील आणि त्यातून त्यांचा प्रवास गतिमान आणि सुरक्षित होत असेल तर टोल भरायला सर्वसामान्य माणूस हा कधीच मागे हटणार नाही याची गडकरींना खात्री होती. त्यामुळेच राज्यात टोलला विरोध झालाही आहे आणि यापुढेही सुरू राहील मात्र तो राजकीय विरोध असेल याची जाणीव गडकरींना आहे.

नितीन गडकरींना महाराष्ट्राचे विकास पुरुष म्हटले जाते. वास्तविक राजकीय नेते स्वतःला विकास पुरुष ही उपाधी लावून घेतात. मात्र गडकरींचे वैशिष्ठ्य असे आहे की त्यांना विकास पुरुष ही उपाधी जनतेने बहाल केलेली आहे. गडकरी हे महाराष्ट्रातून देशाच्या राजकारणात गेले असले तरी त्यांचे बारीक लक्ष महाराष्ट्रातल्या घडामोडींवर तसेच विकास कामांवर अधिक असते. कोणत्याही परिसराचा विकास करताना साधारणपणे सत्ताधारी पक्ष स्वतःच्या पक्षाला अनुकूल स्थिती असलेल्या जिल्ह्यांमध्ये राज्यांमध्ये अधिक विकासाचा निधी देत असतो. मात्र गडकरींचे मोठेपण हे म्हणता येईल की देशाचे रस्ते बांधणी मंत्री झाल्यानंतर कोणत्याही राज्याला विकास निधी देताना त्यांनी कधीही त्या राज्यांमध्ये कोणत्या पक्षाचे सरकार आहे याचा विचार न करता त्या राज्याच्या विकासासाठी कामांची गरज किती अधिक आहे याकडे अधिक लक्ष दिले. त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार असतानादेखील गडकरींनी महाराष्ट्राच्या रस्तेबांधणीसाठी, नव्या उड्डाणपुलाच्या बांधणीसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला. त्यातही सरकार म्हटले की विकास कामांना निधीची टंचाई ही हमखास ठरलेली असते. मात्र गडकरींनी त्यांनी जाहीर केलेल्या कोणत्याही विकास कामांना कधीही निधीची कमतरता भासू दिली नाही. वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून असो की खासगी सहभागातून असो , कोणत्याही माध्यमातून जाहीर केलेल्या प्रकल्पांना पूर्णत्वास नेण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करत निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळेच गडकरींनी घोषणा केलेले प्रकल्प कधी फारसे रखडले नाहीत. हे गडकरींच्या कामाचे आणखी एक आगळेवेगळे वैशिष्ठ्य म्हणता येईल.

- Advertisement -

केवळ महाराष्ट्र राज्या पुरते बोलायचे झाल्यास गडकरींनी केवळ मुंबई-पुण्याकडे लक्ष दिले असे नव्हे तर दुर्लक्षित विदर्भ आणि कोकणातील दळणवळणाच्या सुविधा अधिक गतिमान करून हे दोन्ही प्रदेश मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीशी झटपट कसे जोडले जातील यावरही त्यांनी अधिक जोर दिला. त्यामुळेच मुंबई-पुणे याप्रमाणे त्यांनी नागपूरमध्ये उड्डाणपुलांचे जाळे उभे केले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे मुंबईच्या विकासाचा वेग हा प्रचंड आहे, मात्र त्या तुलनेत आपला विदर्भ आणि त्यातही विशेष करून नागपूर सारखे महानगर विकासाच्या प्रक्रियेत मागे राहू नये यासाठीच त्यांनी विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया,अमरावती, अकोला आणि अगदी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या विकासासाठी देखील भरीव निधी उपलब्ध करून दिला. अगदी परवाच त्यांनी घोषणा केलेल्या जळगाव मनमाड राष्ट्रीय महामार्गासाठी त्यांनी २८२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. लातूर ते चारठाणा दरम्यानच्या रस्त्याच्या कामासाठी २२८ कोटी रुपये तर तिरोरा ते गोंदिया दरम्यान च्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन पदरी रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी २८२ कोटींचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आहे. तर तिरोडा गोंदिया दरम्यानच्या राज्य महामार्गाच्या बांधकामासाठी २८८ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे.

केवळ विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील रस्ते महामार्गांवर निधी उपलब्ध करून देऊन ते थांबले नाहीत तर दुर्लक्षित कोकणच्या विकासाकडे ही त्यांनी आवर्जून लक्ष घातले आहे. विदर्भ कोकण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र यांचा खरा विकास साधायचा असेल तर तेथील दळणवळणाची साधने अधिक सक्षम असली पाहिजेत याकडे गडकरींनी कटाक्षाने लक्ष दिले. प्रगती का हायवे या अंतर्गत नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या रस्त्यांची पुनर्बांधणी आणि विस्तारीकरण करण्याचा सपाटाच लावला आहे. कोकणातील तळेरे गगनबावडा कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी १६७ कोटी तर गुहागर चिपळूणला जोडणार्‍या रस्त्याच्या कामासाठी १७१ कोटी निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर कोकणातील आणि विशेषत: गोव्यातील जनतेसाठी जिव्हाळ्याचा असलेला मुंबई कोकण गोवा हायवे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी हायवे अथोरिटीला तसेच केंद्र व राज्य सरकारच्या यंत्रणांना त्यांनी युद्धपातळीवर कामाला जुंपले आहे.

- Advertisement -

मुंबई कोकण गोवा या महामार्गाचे काम गडकरींनी ज्या जिद्दीने हाती घेतले ते पाहता या महामार्गाच्या बांधणीत येणार्‍या मानवी आणि नैसर्गिक अडथळ्यांवर मात करण्याची जी अनोखी जिद्द नितीन गडकरींमध्ये आहे तशी ती राजकीय नेत्यांमध्ये क्वचितच पाहायला मिळते. मुंबई कोकण गोवा हायवेचे काम मध्यंतरी संपादनात येणार्‍या अडचणी मुळे काही काळ रेंगाळले होते. मात्र हार मानतील तर ते गडकरी कसले? त्यांनी या महामार्गाच्या कामात आलेल्या सर्व अडचणींवर मात करत आत्तापर्यंत ७० ते ७५ टक्के महामार्गाचे काम यशस्वीपणे पूर्ण करून घेतले आहे. शिल्लक असलेले या महामार्गाचे कामही युद्धपातळीवर सुरू असून कामाचा वेग आणि उरक असाच राहिल्यास येत्या वर्षभरात मुंबई कोकण गोवा हायवे चे काम हे शंभर टक्के पूर्ण झालेले दिसून येईल. आणि एकदा का हा गोवा हायवे बांधून पूर्ण झाला त्यानंतर मात्र कोकणच्या विकासाची दारे पूर्णतः उघडली जातील. मुंबई कोकण गोवा हायवे वर ज्या दर्जाचे उड्डाणपूल तसेच या संपूर्ण महामार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे ते पाहता मुंबई-पुणे एक्सप्रेस वेच्या तोडीस तोड मुंबई कोकण गोवा हायवे गडकरी बांधत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -