घरCORONA UPDATEपल्स ऑक्सिमीटर उपयुक्तच, पण निष्काळजीपणा नको

पल्स ऑक्सिमीटर उपयुक्तच, पण निष्काळजीपणा नको

Subscribe

ऑक्सिजनचे योग्य प्रमाण हेच कोरोना रुग्णांसाठी अमृतासमान ठरत असते. हे प्रमाण मोजण्यासाठी फिंगर पल्स ऑक्सिमीटरचा वापर केला जातो. हाती यंत्र आले असले तरीही त्याचा वापर नेमका कसा करावा याची माहितीच अनेकांना नाही. त्यातून गंभीर चूका होण्याची शक्यता असते. म्हणून आजच्या या भागात रक्तातील ऑक्सिजनचे आदर्श प्रमाण किती असते, ते कसे मोजावे, ऑक्सिमीटर कसे काम करते यासंदर्भात माहिती घेणार आहोत.

शरीरातील प्रत्येक पेशीला ऑक्सिजनची गरज असते आणि श्वासाद्वारे घेतलेला ऑक्सिजन रक्तात एकत्र करण्याचं काम फुफ्फुस करते. त्यानंतर हे ऑक्सिजन भारीत रक्त ठराविक दाबाने शरीराच्या विविध अवयवांपर्यंत नेण्याचं कार्य हृदय करत असते. लालरक्तपेशींमध्ये (रेड ब्लड सेल्स किंवा आरबीसी) असलेले हिमोग्लोबिन ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करत असते. यालाच रक्तातील सॅच्युरेटेड ऑक्सिजन म्हणतात. याचे प्रमाण किती हे पल्स ऑक्सिमीटर आपल्याला दाखवत असते. हिमोग्लोबिनमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे, यावरुन रक्ताचा रंग फिकट किंवा गदड लाल दिसतो.

शरीरातील प्रत्येक पेशीला जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज भासत असते. जेव्हा हे प्रमाण कमी होते या अवस्थेला हायपोक्सिया म्हणतात. त्यानंतरही शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही तर मात्र अशावेळी पेशींचे कार्य मंदावून शरीरातील अवयव निष्प्रभ होऊ लागतात. अशावेळी मेंदूचे कार्यदेखील प्रभावित होते. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्यासाठी जे पल्स ऑक्सिमीटर वापरले जाते. त्याच्या एका बाजूने विशिष्ट प्रकारचे प्रकाश किरण सोडले जातात, जे दुसरी बाजू ग्रहण करत असते. एखाद्या क्लिपप्रमाणे असलेल्या या ऑक्सिमीटरच्या दोन्ही टोकांमध्ये बोट ठेवल्यानंतर त्याचे कार्य सुरू होते. लाल रक्तपेशींपार ज्या प्रमाणात प्रकाशकिरण पलिकडच्या बाजूला पोहोचतात, त्यावरुन ऑक्सिजनचे प्रमाण ठरत असते.

- Advertisement -

असे वापरा पल्स ऑक्सिमीटर

रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण आणि हृदयाच्या स्पंदनांची गती (पल्स) हे दोन्हीही परिमाण पल्स ऑक्सिमीटरद्वारे दिसत असतात. तांत्रिक त्रुटी वगळता हे यंत्र अत्यंत अचूक प्रमाण दाखवत असते. कोरोना रुग्णांमध्ये ऑक्सिजनचा पुरेसा स्तर सर्वाधिक महत्त्वपूर्ण ठरत असल्याने त्यांच्यासाठी हे साधन अत्यंत उपयुक्त मानले जाते. हे यंत्र किमान ३० ते ६० सेकंद कोणत्याही हाताची तर्जनी किंवा अंगठ्याला लावून ठेवावे. यावेळी रुग्ण एका स्थिर अवस्थेत असावा. जेणेकरुन अचूक प्रमाण दिसेल. त्यानंतर शेवटी ज्या आकड्यावर यंत्र स्थिर होईल त्यात पुन्हा पुन्हा बदल होणार नाही, ते प्रमाण ग्राह्य धरले जाते.

..तर वेळीच धोका ओळखा

सामान्य निरोगी माणसात रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण हे ९६ ते १०० असते. कोरोना विषाणू थेट फुफ्फुसांवर आघात करत असल्याने त्याचा परिणाम थेट ऑक्सिजनच्या पातळीवर होत असतो. अशावेळी पल्स ऑक्सिमीटर महत्त्वाचे ठरते. एखादा रुग्ण शांत अवस्थेत बसलेला असतानाही त्याची ऑक्सिजनची पातळी ही ९० पेक्षा कमी दिसत असेल तर मात्र वेळीच हा धोका ओळखून तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

एखाद्या कोरोनाबाधित व्यक्ती ६ मिनिट चालल्यानंतरही त्याचे ऑक्सिजनचे प्रमाण हे ९६ ते ९८ असेल तर त्याला होम क्वॉरंटाईन राहण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, एखादा रुग्ण एका जागी बसलेला असेल आणि त्याचे ऑक्सिजन सॅच्युरेशन हे ९० पेक्षा कमी असेल तर मात्र, तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
– डॉ. समीर चंद्रात्रे, जॉईंट सेक्रेटरी, आयएमए, महाराष्ट्र

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -