घरठाणेमातृत्व मिळवण्याच्या नादात गमावले लाखो रुपये

मातृत्व मिळवण्याच्या नादात गमावले लाखो रुपये

Subscribe

विवाहितेला अमेरिकेतून घातला ऑनलाईन गंडा

एका विवाहितेने मातृत्व मिळवण्याच्या नादात लाखो रुपये गमावल्याची घटना मीरा रोड येथे उघडकीस आली आहे. या विवाहितेची फेसबुकवर ओळख झालेल्या एका कथित डॉक्टरने मुले होण्यासाठी अमेरिकेतून औषध पाठवतो असे सांगून तिची ऑनलाईन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मीरा रोड पूर्व येथे राहणार्‍या ३० वर्षीय विवाहितेच्या लग्नाला अनेक वर्षे उलटून देखील तिला मूल होत नव्हते. त्यामुळे ही विवाहिता निराश होती. स्थानिक डॉक्टरकडे त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान मार्च महिन्यात तिची अमेरिकेतील कथित डॉक्टर सेना गलाय याच्यासोबत फेसबुकवर ओळख झाली होती. सेना गेलाय हा एक डॉक्टर असल्याचे त्याने या विवाहितेला सांगितले होते. म्हणून तिने विश्वास ठेवून आपले दुःख त्याच्याकडे सांगितले आणि मुले होण्यासाठी काही औषध असेल तर सांगा असे तिने या कथित डॉक्टरला सांगितले. त्याने तिच्याकडे तिचा मोबाईल क्रमांक मागितला आणि दोघे व्हॉट्स अ‍ॅप कॉलवर एकमेकांशी बोलू लागले.

- Advertisement -

त्याने तिला मी एक औषध पाठवतो त्यातून तुला मातृत्व प्राप्त होईल असे त्याने सांगितले आणि तिच्या घराचा पत्ता लिहून घेतला. दुसर्‍या दिवशी त्याने तिला कॉल करून औषधे कुरिअरने पाठवले आहे, तुला कुरिअर कंपनीकडून फोन येईल असे सांगितले. ७ एप्रिल रोजी या विवाहितेला एक फोन आला आणि दिल्ली एअरपोर्टवरून कस्टम्समधून बोलत असल्याचे सांगून तुमचे एक पार्सल आले आहे. त्यासाठी तुम्हाला पार्सलसाठी ४० हजार रुपये भरावे लागतील असे सांगून तिला बँक खाते क्रमांक दिला.

या विवाहितेने आनंदाने ४० हजार रुपये त्या खात्यात भरले, त्यानंतर पुन्हा फोन आला की तुम्हाला १ लाख रुपये भरावे लागतील, विवाहितेने स्वतःचे दागिने गहाण ठेवून एक लाख रुपये भरले. त्यानंतर देखील फोन आला की अजून २ लाख रुपये भरावे लागतील. विवाहितेने एक लाखाचे कर्ज काढून ते भरले व आता एवढेच पैसे आहे, पार्सल पाठवा नंतर भरते असे सांगितले. मात्र, पूर्ण पैसे भरल्याशिवाय पार्सल मिळणार नाही असे सांगण्यात आले म्हणून विवाहितेने अमेरिकेत असलेल्या कथित डॉक्टरला फोन केला असता त्याचा फोन बंद येऊ लागला.

- Advertisement -

तिने झालेला प्रकार आपल्या एका जवळच्या मैत्रिणीला सांगितला असता तुझी फसवणूक करण्यात आली असल्याचे तिने सांगितले. या विवाहितेने याप्रकरणी आपल्या पतीला विश्वासात घेऊन काशीमीरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -