घरताज्या घडामोडीवांगणी घटना : एमर्जन्सी ब्रेकने लागले, अन् 'त्या' २ सेकंदाने वाचले दोन...

वांगणी घटना : एमर्जन्सी ब्रेकने लागले, अन् ‘त्या’ २ सेकंदाने वाचले दोन जीव

Subscribe

ताशी १०५ किलोमीटर वेगाने धावणारी मुंबईच्या दिशेने धावणारी उद्यान एक्सप्रेस. समोर ट्रॅकवर पडलेला लहान मुलगा आणि त्या मुलाला वाचवण्यासाठी धावणारा मयुर शेळके. वांगणी स्टेशनमध्ये घडलेल्या १३ सेकंदातल्या मयुर शेळकेच्या शौर्यामध्ये आणखी एक बाब समोर आली, ती म्हणजे एक्सप्रेसच्या ट्रेन लोको पायलटची समयसूचकता. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या उद्यान एक्सप्रेसच्या लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मयुरला आणखी अतिरिक्त २ सेकंदाचा वेळ मिळाला. एरव्ही झेंडा दाखवणारा पॉईंट्समन मयुर शेळके धावत लहान मुलाला वाचवायला येत असल्याचे पाहिल्यानेच ट्रेन लोको पायलटने एमर्जन्सी ब्रेक लावला. या ब्रेकमुळेच मयुरला अतिरिक्त असा २ सेकंदाचा कालावधी मिळाला. लहान मुलाला ट्रॅकवरून प्लॅटफॉर्मवर उचलून ठेवल्यानंतर मयुरकडे अवघ्या २ सेकंदाचाच कालावधीत होता. पण लोको पायलटने दिलेल्या त्या २ सेकंदाच्या जोरावरच मयुरला रेल्वे ट्रॅक ते प्लॅटफॉर्म हे अंतर गाठणे शक्य झाले. या ट्रेनचा लोको पायलट असलेल्या विनोद कुमार जनगिंद यांचेही योगदान या सगळ्या घटनेत मोलाची मदत करणारे ठरले. लोको पायलटने एमर्जन्सी ब्रेक मारल्यानेच एक्सप्रेसचा ताशी १०५ किमी वेग ८५ किमी पर्यंत कमी झाला. या कमी झालेल्या वेगाचाच फायदा हा मयुरला झाल्याचे वृत्त मिड डे या इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

ज्या वेगाने मयुर लहान मुलाला वाचवण्यासाठी जात होता, त्यापेक्षा अधिक वेगाने एक्सप्रेस मयुरच्या दिशेने येत होती. पण या कालावधीत लोको पायलटची समयसूचकता मयुरचेही प्राण वाचवण्यासाठीही उपयोगी ठरली. मयुरने आधीच मुलाला प्लॅटफॉर्मवर ठेवले होते. पण मयुर ट्रॅकवर असल्याने त्या २ ते ३ सेकंदाचा मयुरला फायदा झाल्याची प्रतिक्रिया रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्या प्रसंगी प्रत्येक प्रसंग हा महत्वाचा होता. लोको पायलटचे प्रसंगावधान मयुरला आणि त्या लहान मुलाला तारक ठरले. उद्यान एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने नेण्यासाठी विनोद कुमार यांनी पुण्यातून त्या एक्सप्रेसचा ताबा घेतला होता. वांगणीच्या पट्ट्यात एक्सप्रेसचा वेग हा सरासरी ताशी १०० किमी ते १०५ किमी यादरम्यान असतो. वांगणी स्टेशन येण्याआधी त्याठिकाणी एक वळण आहे. घटनेच्या वेळी मला दिसत होते की, एक अंध महिला आपल्या खाली पडलेल्या मुलाला चाचपडत आहे. त्याच प्रसंगी मयुरने दिलेल्या लाल झेंड्यामुळे मी सतर्क झालो. पॉईंट्समन असलेला मयुर लाल झेंडा दाखवत ट्रेनच्या दिशेने पळत येत होता. परिणाम एक्सप्रेसला एमर्जन्सी ब्रेक लावण्याचा निर्णय मी घेतला. एमर्जन्सी ब्रेक अप्लाय केल्यानंतर एक्सप्रेसचा वेग कमी होण्यासाठी मदत झाली. पण केवळ धाडसी आणि शूरता दाखवणारा असा मयुरचा हा निर्णय होता असे सांगताना लोको पायलटच्या अंगावरही काटे उभे राहिल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

इतक्या कमी अंतरामध्ये ट्रेन जागीच थांबणे शक्य नव्हते. पण एमर्जन्सी ब्रेक लावल्याने एक्सप्रेसचा वेग कमी होण्यासाठी मदत झाली. या कमी झालेल्या वेगाचाच मयुरला फायदा झाला. जेव्हा एक्सप्रेस प्लॅटफॉर्मला पोहचली तेव्हा एक्सप्रेसचा वेग ताशी ८५ किमीपर्यंत कमी झाला होता. हे सगळ माझ्या डोळ्यांसमोर घडत होते. पण मी असे धाडस कधीच पाहिल नव्हत असे लोको पायलटने सांगितले. या शौर्यासाठी आमचा मयुरला सलाम आहे. मला या शौर्यासाठी मयुरशी बोलायला आवडेल असेही त्या लोको पायलटने स्पष्ट केले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -