घरफिचर्समायमहानगर ब्लॉगबॉलिवूडला ड्रग्सची नशा !

बॉलिवूडला ड्रग्सची नशा !

Subscribe

स्वप्नांची नगरी म्हणून मुंबईची ओळख आहे. स्वप्नांच्या या नगरीतच बॉलिवूड नावाची देशातील सर्वात मोठी सिनेसृष्टी असल्यानं तिचे वेड जगभरातील कलाकारांना असते. सिनेमा जगतात आपले नाव उंचावण्यासाठी देश-विदेशातील कलाकारांना भूरळ घालणारी ही नगरी बॉलिवूड नाही तर ‘ड्रग्स’ची नशा करणारी ‘इंडस्ट्री’ बनली आहे. या विश्वात रममान झालेल्या दिग्गज अभिनेत्यांना व अभिनेत्रींना या ‘नशेने’ आपल्या कवेत घेतल्याची दिवसागणिक उदाहरणे समोर येत असतात. नुकतेच इगतपुरी येथील एका खासगी बंगल्यात ड्रग्सची पार्टी पोलिसांनी उधळून लावली. पार्टीच्या नावाखाली सुरू असलेला नाच जगासमोर आला. याच पार्टीत सहभागी असलेली बॉलिवूडची अभिनेत्री हिना पांचाल हिचा चेहरा त्यानिमित्ताने तिच्या चाहत्यांना दिसला. सिनेसृष्टीत हा प्रकार काही नवं नाही. संजूभाई अर्थात संजय दत्त यालाही ड्रग्स आणि सिगरेट्सचं व्यसन होतं. स्त्री व्यक्तिरेखेसोबत काम करताना अवघडल्यासारखं वाटू नये म्हणून संजयने ड्रग्स घेण्यास सुरुवात केल्याचं बोललं जातं.

पण तो आता यातून पूर्णपणे बाहेर आला आहे. फरदीन खानलाही चित्रपटात काम करत असताना ड्रग्सचं व्यसन लागलं होतं. या व्यसनामुळे मुंबई पोलिसांनी 2001 मध्ये त्याला अटकही केली होती. यानंतर त्याने निर्व्यसनीकरणासाठी काही कोर्स केले. इतकेच काय तर अभिनेत्रीही या व्यवसायापासून स्वत:ला दूर ठेवू शकलेल्या नाहीत. प्रसिध्द अभिनेत्री मनीषा कोईराला ही दर्जेदार चित्रपट करत असताना मनीषाला ड्रग्स आणि मद्याचं व्यसन लागलं होतं. अंडाशयाचा कॅन्सर झाल्यानंतर तिने या सगळ्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. केवळ अभिनय क्षेत्रातील व्यक्तिच या सर्व गोष्टी करते असे म्हटले तर त्यांना ते ‘पेटंट’ मिळाल्यासारखं होईल. राजकीय घरातील व्यक्तीही यात अनेकदा आढळून आल्या. त्यातीलच एक म्हणजे भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन. वडिलांच्या मृत्यूनंतर राहुल चांगलाच चर्चेत आला. वडिलांचा सेक्रेटरी विवेक मोईत्रासोबत राहुलने मद्याचं आणि कोकेनचं मिश्रण एकत्रित सेवन केलं. त्यात विवेकचा मृत्यू झाला व राहुल थोडक्यात बचावला. यानंतर राहुलवर गुन्हाही दाखल झाला होता.

- Advertisement -

अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणापासून बॉलिवूडमधील कलाकारांवर बर्‍याच प्रमाणात चिखलफेक झाली. या ड्रग्स प्रकरणाशी अनेक कलाकारांची नावं जोडली गेली. आरोपांची ही राळ थेट बॉलिवूड उत्तर प्रदेशात हलवण्यापर्यंत पोहोचली. परंतु, मुंबई इतक्या सुविधा उत्तर प्रदेशात मिळतील का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. बॉलिवूड आणि ड्रग्स माफिया यांचा जवळचा संबंध आहे. ते एकमेकांना ओळखतात. अनेक कलाकार यामध्ये सामील आहेत. यापैकी अनेकजण लहानपणापासून ड्रग्स घेतात आणि मोठेपणी अभिनेते, दिग्दर्शक बनतात. या अभिनेत्यांपैकी एका सोबत मी डेटवर जात असल्याचा खुलासा अभिनेत्री कंगना रनौतने केला. त्यानंतर बॉलिवूडमधील अनेक किस्से बाहेर आले. त्यातून ही सिनेसृष्टी बदनाम झाली. ज्या सिनेसृष्टीने आपल्याला ओळख निर्माण करुन दिली तिच्याविषयी अशाघ्य भाषेत बोललं गेलं. खरं तर हे फक्त आपल्याच देशात होऊ शकतं. त्याचं कारणही तसेच आहे.

राजकीय पुढारी आणि बॉलिवूड अभिनेते यांच्यातील संबंध येथे प्रस्थापित होतात. त्यातूनच पुढे अंडरवर्ल्डपर्यंत हे कनेक्शन जोडले जाते. कोणाचातरी वरदहस्त असल्याशिवाय या इंडस्ट्रीत निभाव लागणे तसे कठीणच म्हटले जाते. या सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी ज्या हेतूने चित्रपटसृष्टी निर्माण केली, त्या हेतूपासून आता ती फार दूर पोहोचली आहे. म्हणूनच महाराष्ट्रात बॉलिवूडसारखी सिनेसृष्टी असूनही मोजकेच मराठी कलाकार पाय रोवून उभे आहेत. मराठी सिनेमासृष्टी ही बॉलिवूडच्या तुलनेत खूपच मागे असल्याचे त्याचे हे एक कारण आहे. सिनेमातील बोलबाला संपल्यानंतर सुरू होतो खरा संघर्ष! अभिनेत्री झाल्यानंतर चैनीची जीवनशैली कालांतराने अवघड होऊन बसते. खर्च करण्याची ऐपत शिल्लक राहत नाही.

- Advertisement -

समाजातील आभासी ‘स्टेटस’ जपण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा सहारा घ्यायला सुरुवात होते. त्यातून मग नको त्या गोष्टी करण्याची वेळ येऊन ठेपते आणि मिळालेला नावलौकिक धुळीस मिसळायला सुरुवात होते. ‘बीग बॉस’मधून बॉलिवूडची एन्ट्री होते. किंबहुना, बॉलिवूडनंतर ‘बीग बॉस’मधून अभिनय क्षेत्रातील करिअरच्या कक्षा अधिक विस्तृत करण्याचा हा मार्ग समजला जातो. याच ‘बीग बॉस’मधून करिअरच्या वाटेवर स्वार झालेली अभिनेत्री हिना पांचाल ही इगतपुरी येथील एका बंगल्यात ड्रग्सच्या पार्टीत आढळली. तिच्यासोबत 22 जण होते. त्या सर्वांची न्यायालयाने कोठडीत रवानगी केली. कोठडीत गेल्यानंतरही हिनाला वेस्टर्न फूड पाहिजे असल्याच्या बातम्या आता बाहेर येत आहेत. इगतपुरीतील निसर्गरम्य अल्हाददायक वातावरणात असलेल्या स्काय ताज व स्काय लगून व्हिला हे दोन अलिशान बंगले बॉलिवूडशी संबंधित व्यक्तींना बंगलामालक संशयित रणवीर सोनी यांनी दोन दिवसांकरिता भाडेतत्त्वावर दिले. एका दिवसासाठी 57 हजार रुपये इतकं भांड होतं. दोन दिवसांसाठी संबंधितांकडून एक लाख 14 हजार रुपये मोजले जाणार होते.

मुंबईतील व्यावसायिक संशयित पीयूष शेठिया यांच्या वाढदिवसानिमित्त इगतपुरीतील या दोन बंगल्यांवर शुक्रवारपासून सलग दोन ते तीन दिवसांकरिता रेव्ह पार्टी रंगवण्यात आली होती. ‘हवाईयन थीम’वरील या पार्टीत बॉलिवूडशी संबंधित संशयित अभिनेत्री हिना पांचालसह कोरिओग्राफर, कॅमेरामन, मेकअपमॅन, अशा सुमारे 12 महिला आणि 10 पुरुषांना ड्रग्स आणि कोकेनसारख्या अमली पदार्थांचे सेवन करताना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी पडकल्यानंतर हे सगळे ज्या अर्विभावात गाडीमध्ये बसले त्यावरुन हे प्रकरण कसं अगदी सहज चाललंय असे भाव त्यांच्या चेहर्‍यावर दिसले. मुंबईत सर्रासपणे चालणार्‍या गोष्टी मुंबईबाहेर फक्त नियमबाह्य होत असल्याचा ‘फिल’ त्यांना आला असावा. ड्रग्स आणि कोकेनच्या पार्ट्या या बॉलिवूडला नवीन नाहीत. पण सर्वसामान्य व्यक्तिंनी ही नावेसुध्दा ऐकलेली नसतील. अभिनेत्यांच्या जीवनशैलीचं अनुकरण करणार्‍या युवकांच्या आयुष्यात अशा घटना परिणामकारक ठरतात. त्याचाही थोडाफार विचार करायला हवा. नाहीतर संपूर्ण इंडस्ट्रीलाच डाग लागेल.

येथे काम करणारे ‘एकाच माळेचे मणी’ म्हणून बट्टा लावून घेण्यापेक्षा घाणेरड्या प्रवृत्तीनाच धडा शिकवला पाहिजे. सर्वसामान्य व्यक्ती कलाकारांना डोक्यावर घेतात तसे पायाखाली तुडवायलाही मागेपुढे बघत नाहीत. प्रेक्षकांच्या जीवावर मोठे होणारे कलाकार आयुष्यभर त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतात. पण मनातून उतरल्यावर त्यांच्या पोस्टर्सची होळी करायलाही मागेपुढे बघत नाहीत. त्यामुळे सिनेसृष्टीत वावरताना या सर्व गोष्टींची जाणीव ठेवायलाच हवी. करिअर आणि फिटनेस याबाबत सजग असलेल्या बॉलिवूडमधील कलाकार व्यसनाच्या आहारी का जातात? हा खरंतर संशोधनाचा विषय आहे. काम न मिळाल्यानं येणारं ‘डिप्रेशन’ आणि त्यातूनच व्यसनाधिनता वाढीस लागते. काम मिळवण्यासाठी कराव्या लागणार्‍या अनेक गोष्टींमध्ये पार्ट्या आणि ड्रग्स सेवन हादेखील सवयीचा भाग बनलाय. त्यामुळे संपूर्ण इंडस्ट्री आता बदनाम झालीय. सिनेसृष्टीला नाव ठेवण्यापेक्षा तिला दूषित करणार्‍या कलाकारांना धडा शिकवला पाहिजे. कारवाई करताना पोलिसांना मर्यादा येत असल्या तरी कलाकारांना डोक्यावर घेऊन नाचणार्‍या प्रेषकांच्या हातात बरेच काही आहे. बरे आणि वाईट यातील फरक आपण लक्षात घेतला तरी कलाकरांना या गोष्टींपासून दूर राहण्यास भाग पाडू शकतो. पण इतका गांभीर्याने आपण विचार करणार का, हाच खरा प्रश्न आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -