घरमुंबईनाव आहे पण गाव नाही, गाव आहे तर नोंद नाही

नाव आहे पण गाव नाही, गाव आहे तर नोंद नाही

Subscribe

सावली गाव हे फक्त शासनाच्या कागदावरच राहिले असताना बोरवली, चिंचवली, टेटवली सारखी काही गावे तर एमआयडीसी आल्यानंतर गायबच झाली. त्यामुळे ‘गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी’ असे म्हणण्याची वेळ प्रकल्पग्रस्तांवर येऊन ठेपली आहे.

नवी मुंबई : नाव आहे पण गाव नाही,तर गाव आहे पण नोंद नाही अशी काहीशी परिस्थिती नवी मुंबई शहरातील अनेक गावांची झाली असून अनेक गावे एमआयडीसीच्या पट्ट्यात अडकली आहेत. तर काही राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडली आहेत. सावली गाव हे फक्त शासनाच्या कागदावरच राहिले असताना बोरवली, चिंचवली, टेटवली सारखी काही गावे तर एमआयडीसी आल्यानंतर गायबच झाली. त्यामुळे ‘गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी’ असे म्हणण्याची वेळ प्रकल्पग्रस्तांवर येऊन ठेपली आहे.

सिडकोकडून नवी मुंबई शहरातील गावांचे भूसंपादन होत असताना काही गावांची नावे आणि ओळखच पुसली गेल्याने त्यासाठी पुन्हा ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. 70 च्या दशकात सिडकोने भूसंपादन करण्याची कारवाई सुरु केल्यावर 16 हजार हेक्टरपेक्षा अधिक जागा संपादित केली होती. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील 95 गावांचा यामध्ये समावेश होता. नवी मुंबईतील 29 मूळ गावठाणातील बोरवली, चिंचवली, टेटवली, सावली या पाच गावांचे अस्तित्व नवी मुंबई शहर उभारणीच्या वेळी नाहीसे झाले.

- Advertisement -

नवी मुंबईतील अनेक नागरिकांना ही पाच गावे कधी अस्तित्वात होती हेच माहित नाही. सावली गावाच्या वेशीवरच बोन्सारी, बोरीवली, टेटवली या गावांची हद्द दर्शवली जात असली तरी यापैकी अनेक गावांच्या जागेवर दगडखाणी सुरु आहेत. त्यामुळे या गावांचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. कोपरखैरणे -घणसोलीच्या मधोमध असलेल्या सावली गावात यापूर्वी आठ घरांचे अस्तित्व असल्याचे दाखविण्यात आले होते. मात्र सिडकोने कारवाई करून ही घरे पडल्यावर आता या गावाचे अस्तित्वच नष्ट झाले आहे.

ऐरोली, गोठवली आणि तळवली या तीन गावांचा अविभाज्य घटक असलेल्या चिंचवली गावाचा समावेश आहे. खूप मोठ्या प्रमाणात असलेल्या चिंचेच्या झाडांमुळे या छोटयाशा गावाला चिंचवली म्हटले जात होते. बोरवली, बोनसरी आणि अडवली भुतवलीच्या उत्तर बाजूस असलेल्या टेटवलीतील आदिवासी लोकवस्तीला काही भूमाफियांनी त्यावेळी हुसकावून लावल्याने या गावांच्या जमीन संपादनामध्ये एमआयडीसीला विशेष अडचण आली नाही.यातील काही जमिनी तर भूमाफियाची हडप केल्याचे समोर आले आहे. टेटवली गावाच्या जमिनीवर भंगार माफियांनी आपले साम्राज्य तयार केले आहे. या परिसरातील मूळ रहिवाशी असलेल्या आदिवासी नागरिकांना हुसकावून लावल्याने आजमितीस या जागेवर भूमाफियांचा कब्जा आहे.

- Advertisement -

सावली गावाप्रमाणे आजही अनेक गावांची नोंद, त्यांची ओळख केवळ दप्तरी आहे. मात्र गावांची ओळख त्यातील वास्तूंच्या माध्यमातून जपली जात आहे. हीओळख कायम राहावी यासाठी महापालिका प्रयत्न करणार आहे. अनेक गावांच्या वेशीवरच त्या गावाच्या नावाचे प्रवेशद्वार बांधण्यात येणार आहे.
– दादासाहेब चाबुस्कवार, उपायुक्त,नवी मुंबई महापालिका

सावली गावाप्रमाणे आजही ज्यांची गावे गेली त्या गावातील ग्रामस्थ मिळणार्‍या सुविधांपासून वंचित आहेत. ज्या प्रमाणे सावली गावातील ग्रामस्थ हक्काच्या मागणीसाठी पुढे येत आहेत, त्याचप्रमाणे इतर वंचित गावातील ग्रामस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. असे ग्रामस्थ पुढे आलेत तर त्यांची नक्कीच मदत करता येईल आणि त्यांना त्यांचा अधिकारही मिळवून देता येईल.
– निलेश पाटील, अध्यक्ष,आगरी कोळी युथ फाउंडेशन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -