घरमुंबईचिरनेरच्या आदिवासींची वाट बिकट

चिरनेरच्या आदिवासींची वाट बिकट

Subscribe

चिरनेर गावापासून अवघ्या तीन किमी अंतरावर डोंगर कुशीत वास्तव्य करणाऱ्या केल्याचा माळ आदिवासी वाडीवरील कातकरी आदिवासींना चिखलाची वाट तुडवीत आपले घर गाठावे लागत आहे.

लाखो रुपये खर्च करून उरण तालुक्यातील रस्ते चकाचक करण्यात आले असून त्यांना नवा थाट लाभला आहे. मात्र चिरनेर गावापासून अवघ्या तीन किमी अंतरावर डोंगर कुशीत वास्तव्य करणाऱ्या केल्याचा माळ आदिवासी वाडीवरील कातकरी आदिवासींना चिखलाची वाट तुडवीत आपले घर गाठावे लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्यासाठी रायगड जिल्हा परिषदेतून दोन वर्षांपूर्वीच सुमारे १७ लाखांचा निधी मंजूर होऊनही कमिशनच्या वादात या निधीतील एक रुपयासुद्धा या रस्त्यावर खर्च न केल्याने या आदिवासींना हे भोग भोगावे लागत असल्याने आदिवासी समाजात संताप व्यक्त होत आहे. प्रत्येक वाडी वस्तीवर रस्ता हे शासनाचे धोरण असतानाही चिरनेरच्या आदिवासींना अजूनही रस्त्याविना रहावे लागले आहे.

चिरनेर ग्रामपंचायत हद्दीत पाच आदिवासी वाड्या असून त्यापैकी केल्याचा माळ या आदिवासी वाडीवर अजूनही पक्का रस्ता नाही. चिरनेर गावातून ते आदीवासी पायवाटेने त्यांच्या तीन किमी दूर डोंगरात असलेल्या वाडीवर मार्गस्थ होतात. त्याचबरोबर रानसईचे आदिवासी बांधवही याच रस्त्यातून आपल्या डोंगरातील गावात जातात. या आदिवासी वाडीपर्यंत रस्ता व्हावा म्हणून चिरनेर गावातील शेतकऱ्यांनी दातृ भावनेतून आपल्या शेत जमिनीतील काही जागा रस्त्यासाठी दिल्याने गावातील पी. पी. खारपाटील व राजेंद्र खारपाटील यांनी या आदिवासींसाठी कच्चा रस्ता बनविला.

- Advertisement -

आमचा समाज हा अत्यंत गरीब व मोलमजुरी करून जगतो. गावात येऊन लाकडाच्या मोळ्या विकल्यावर काही पैसे मिळतात. मात्र सध्या कच्च्या रस्त्यात चिखल झाल्याने ओझे घेऊन रस्त्यातून चालणे धोक्याचे ठरत आहे. आमच्या वाडीपर्यंत सरकारने लवकर डांबरी रस्ता करावा.
– सिद्धेश कातकरी, गावकरी तरुण

हा रस्ता पक्का करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या निधीतून या रस्त्यासाठी सुमारे १७ लाखांचा निधी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी यांनी मंजूर करूनही आणला. मात्र चिरनेर ग्रामपंचायत या रस्त्याच्या कामाबाबत गेली दोन वर्षे उदासीनता दाखवत असून आदिवासींच्या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे भर पावसात या आदिवासींना गुडगाभर चिखलातून वाट शोधत आपले घर गाठावे लागत आहे.

- Advertisement -

चिरनेर-केल्याचा माळ आदिवासी वाडीपर्यंतच्या रस्त्याला निधी मंजूर झाला आहे. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे रस्त्याचे काम सुरु होऊ शकले नाही. लवकरच हा रस्ता करण्यात येईल.
– बाजीराव परदेशी, जिल्हा परिषद, सदस्य, रायगड

उरणचे रस्ते चकाचक नि आदिवासी वाडीवरील रस्ता चिखलमय हा दुराभास दिसत असल्याने चिरनेर ग्रामपंचायतिचा नाकर्तेपणा यातून दिसून येत आहे. पक्का रस्ता द्याल तेव्हा द्याल, किमान या कच्च्या रस्त्यावरील चिखलाच्या वाटेवर दगड मातीचा भराव केला तरी चालणे शक्य होईल, अशी संतप्त प्रतिक्रिया आदिवासींमधून व्यक्त होत आहे.

हेही वाचा –

शिवाजी मंडईतील मासेविक्रेत्यांचे क्रॉफर्ड मार्केटमध्ये होणार कायमस्वरुपी स्थलांतर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -