घरक्रीडाIND vs SL : शिखर धवनची कमाल; एकाच सामन्यात केले दोन अनोखे...

IND vs SL : शिखर धवनची कमाल; एकाच सामन्यात केले दोन अनोखे विक्रम

Subscribe

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धवनने नाबाद ८६ धावांची खेळी केली.

भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेची विजयी सुरुवात करण्यात यश आले. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ७ विकेट राखून विजय मिळवला. या सामन्यात भारताने श्रीलंकेला ५० षटकांत ९ बाद २६२ धावांवर रोखले आणि २६३ धावांचे आव्हान ३६.४ षटकांतच पूर्ण करत सामना जिंकला. भारताच्या या विजयात कर्णधार शिखर धवनने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ९५ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ८६ धावांची खेळी केली. धवनसाठी हा सामना खास ठरला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवण्याची ही त्याची पहिलीच वेळ होती आणि त्याची सुरुवात विजयाने झाली. त्याचप्रमाणे धवनने या सामन्यात दोन विक्रमही केले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा

पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाबाद ८६ धावांच्या खेळीदरम्यान धवनने सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पार केला. ही कामगिरी करणारा तो सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मानंतर पाचवा भारतीय सलामीवीर ठरला. तसेच या खेळीदरम्यान त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सहा हजार धावाही पूर्ण केल्या.

- Advertisement -

वनडेत सहा हजार धावा करणारा दहावा भारतीय

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सहा हजार धावांचा टप्पा पार करणारा धवन हा भारताचा दहावा फलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत १४३ एकदिवसीय सामन्यांत ६०६३ धावा केल्या आहेत. त्याच्याआधी सचिन (१८४२६ धावा), विराट कोहली (१२१६९), सौरव गांगुली (११२२१), राहुल द्रविड (१०७६८), महेंद्रसिंग धोनी (१०५९९), मोहम्मद अझरुद्दीन (९३७८), रोहित शर्मा (९२०५), युवराज सिंग (८६०९) आणि सेहवाग (७९९५) यांना एकदिवसीय क्रिकेटमध्ये सहा हजार धावांचा टप्पा पार करण्यात यश आले होते.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -