घरफिचर्सकृष्णछायेची रुपेरी किनार...

कृष्णछायेची रुपेरी किनार…

Subscribe

एखादी प्रचंड आपत्ती जेव्हा ओढवते तेव्हा तिने होणारे नुकसान हे केवळ नैसर्गिक भौगोलिक नसते तर सामाजिक, राजकीय आणि आर्थिक असते. केरळमध्ये ओढवलेल्या प्रलयामुळे मानवी जीवन तर धोक्यात आलेच पण पर्यावरण, उद्योग, कृषी, पर्यटन सगळेच घटक संकटात असून त्यांना दीर्घकालीन आपत्तीचा सामना करावा लागणार आहे. अशी आपत्ती येते तेव्हा धुळीला मिळतात सर्वसामान्यांची स्वप्ने आणि आशा. पण म्हणतात की प्रत्येक कृष्णछायेला लहानशी का होईना रुपेरी किनार असते. जेव्हा अशा आपत्ती येतात तेव्हा त्या प्रभावित झालेल्या सर्व सामाजिक घटकांना एकाच स्तरावर घेऊन येतात मग ते कोणत्याही जातीधर्म, आर्थिक स्तर वा विचारसरणीचे असोत त्यातून त्यांच्या आयुष्यांची पुनर्बांधणी आणि सामूहिक विकासाच्या संधींची दारे खुलत जातात.

पंचवीस वर्षांपूर्वी भूकंपात सर्वस्व हरपलेल्या आणि पूर्वी कधी घराबाहेर न पडलेल्या अल्पशिक्षित ग्रामीण महिलांनी बचतगटांच्या आधारे फक्त आपल्या घरांचीच नव्हे तर आपल्या संपूर्ण आयुष्याची पुनर्बांधणी केली आणि विकासाचे नवे मार्ग शोधून काढत इतरांची आयुष्ये समृद्ध केली. ही महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातली एक मोठी स्फूर्तिदायक कहाणी आहे. त्यांनी सुरु केलेली ही परिवर्तनाची वाटचाल मराठवाड्यातल्या गावागावातून अतिशय शांतपणे सुरू आहे आणि त्यांची झेप एवढ्यावरच थांबलेली नाही .

भूकंपानंतर ज्या अनेक विकाससंस्था मराठवाड्यात धावून आल्या त्यातून ’स्वयंम शिक्षण प्रयोग (एसएसपी )’या संस्थेची निवड महाराष्ट्र शासनाने लोकसहभाग सल्लागार म्हणून केली होती. एसएसपीने पुनर्वसन प्रक्रियेत महिलांचे सक्षमीकरण व लोकसहभाग महत्वाचा आहे. हे सरकारला पटवून देत ग्रामीण महिलांना धीर देऊन ’संवाद सहाय्यक’ बनवून केंद्रस्थानी आणले. शासनाचे अधिकारी, अभियंते, बँक मॅनेजर, ग्रामस्थांशी संवाद साधायला शिकवून भूकंप-सुरक्षित घरे बांधण्याचे प्रशिक्षण देऊन घरांची पुनर्बांधणी करण्यासाठी प्रवृत्त केले आणि आत्मविश्वासाचे बळ जागवून महिला सक्षमीकरणाची पावले गावपाड्यातून उमटवत नेली. या प्रक्रियेत सामील झालेल्या सातशे संवाद सहाय्यकांमधल्या लक्ष्मीताई फुलसुंदर, कांताबाई पाटील , मंगलताई श्रीमंगले , सुदामती गोरे,शरिफा सय्यद या महिलांची नुसती नावे पहिली तरी त्यांच्या पार्श्वभूमीची कल्पना येते. या महिलांनी प्रत्येकी (फक्त!) वीस रुपये मासिक बचत करणार्‍या महिलांच्या बचतगटांची बांधणी करून आपल्या शेतीत रोजंदारीवर राबणार्‍या बहिणींना संघटित केले. पुढे गटांचे तालुकानिहाय महासंघ स्थापन केले आणि गटांना बँकेची कर्जे मिळवून दिली.

- Advertisement -

पंचायतीराजमुळे ग्रामसभेच्या नियमिततेबद्दल आग्रह धरला. पंचायती आणि शासनाच्या सहकार्याने पाणी, स्वच्छता, आरोग्यविषयक विकासाची कामे केली. महिलांना आपले कार्यक्रम राबवता यावेत म्हणून लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात सतरा माहितीकेंद्रे बांधली. यातून महिलांना गावात मान आणि प्रतिष्ठा मिळू लागली. एसएसपीने महिलांना संघटित करून त्यांच्या रोजंदारीतल्या अल्पशा कमाईतून नियमित बचतीची आणि कर्जफेडीची सवय तर लावलीच शिवाय ग्रामविकासासाठी सरकारच्या मदतीच्या तुकड्यांसाठी वाट बघण्याऐवजी संघटित होऊन गावाच्या विकासाच्या बाबी ठरवाव्यात, शासनाकडे पाठपुरावा करावा, लोकवर्गणी, लोकसहभागाची जबाबदारी उचलून स्थानिक प्रशासनाच्या मदतीने विकास साधून घ्यावा ही विचारधारा एसएसपीच्या माध्यमातून आणि महिलांच्या कार्यातून गावखेड्यात रुजली.
आज कांताबाई , मंगलताईंना पूर्वीइतके धडपडत राहण्याची गरज नाही. तरी त्या आजही महिला मंडळ आणि बचतगटाचे काम बघत आहेत.

कांताबाई म्हणतात भूकंपानंतर आम्ही पुनर्वसन व बचतगटासाठी एक झालो. सामाजिक बांधिलकी आम्ही तेव्हापासून आजही जपली आहे. आमच्या गावची लेक सुनीता मडोळे हिचे घर भूकंपात कोसळले. तीन दिवसांनी तिला शुद्ध आली. तेव्हा ती दवाखान्यात होती. भूकंपाने तिच्या पतीला हिरावून घेतले होते पण तिची तीन महिन्याची मुलगी बचावली होती. सरकारची मदत आपल्यालाच मिळावी म्हणून सासरच्यांनी सुनीताला घरातून बाहेर काढले. ती माहेरी आली. बचतगटाच्या साथीने सुनीता यशस्वी व्यावसायिक बनली. आज तिची बचावलेली मुलगी शिक्षिका आहे.

- Advertisement -

१९९६ साली संवाद सहाय्यक म्हणून या कार्यात सामील झालेली लोहारा गावची शरीफा म्हणते ,” आमच्या घरात गोषा पद्धती होती , एसएसपीत आले आणि घराबाहेर निघायचे बळ मिळाले आणि बुरखाही सुटला. माझे मालक सरपंच होते पण ते लोकांसाठी काम करत नव्हते. त्यांचा मार खाऊनही मी महिलांचा पाण्याचा प्रश्न सोडवला. आता मी उपसरपंच आहे. शिवाय रेशन कमिटी, पोलीस दक्षता कमिटीची सदस्य आहे. ’बेटी बचाव बेटी पढाव’ उपक्रमात सहभागी झाले आहे. या वर्षी गावात पंधराशे झाडे लावली. आता दारूबंदीवर लक्ष केंद्रित केले आहे “

बचतगटांशी संपर्क आणि त्यातून उद्योजकतेला सुरुवात त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वात होत गेलेले बदल आणि त्यांनी घडवून आणलेल्या सुधारणा अशी ही परिवर्तनाच्या टप्प्यांची कहाणी अजूनही सुफळ संपूर्ण झालेली नाही. पण पुढच्यास ठेच आणि मागचा शहाणा या न्यायाने या महिला पुढेच जात राहिल्या. ग्रामीण भागात केवळ शेतावर व ’मनरेगा’ मध्ये मजुरी करून प्रगती साधता येणार नाही . हे त्यांना समजत होते पण काय करावे ते उमजत नव्हते. या अल्पशिक्षित महिलांना कोण देणार होते, नियमित नोकर्‍या आणि रोजगार? कुठली शिक्षणसंस्था पुढे येणार होती कौशल्य प्रशिक्षण द्यायला? मग स्वयम शिक्षण प्रयोगनेच जवाबदारी उचलली आणि व्यवसाय उद्योजकतेचे प्रशिक्षण सुरु झाले. यातून अनेक महिला स्थानिक संसाधनांचा उपयोग करुन डाळ उद्योग, मसाला , भाकरी उद्योग, पापड,-कुरडई, चटणी, लोणचे, कापडी पिशव्या असे व्यवसाय यशस्वीपणे चालवत आहेत. किराणा दुकान, स्टेशनरी , बांगडी विक्री , पिठाची चक्की ,गांडूळखत निर्मिती ,मिरची कांडप,दूध ,कुक्कुटपालन असे व्यवसाय चालवून कमाईत मोलाची भर घालत आहेत . अपारंपरिक ऊर्जा उत्पादनांमध्ये निर्धूर चुली,सोलर दिवे ,वॉटर-हीटर,विद्युत उपकरणे,बायोगॅसचा समावेश आहे.

अतिशय बिकट परिस्थितीतून उभ्या राहिलेल्या उस्मानाबादच्या तेर गावच्या सुमित्रा शिराळने बचतगटाच्या कर्जातून केवळ तीनशे रूपयांच्या भांडवलावर नारळ , प्रसाद विक्री व्यवसाय सुरू केला, त्यातून आता दुकान उभे राहिले. बचतगटाच्या माध्यमातून काम करताना तिने महिलांना नेतृत्व विकासाचे प्रशिक्षण दिले. यापैकी पाचशे महिलांनी लेखनसाहित्य, भाजीपाला, छपाई, तयार कपडे विक्री असे व्यवसाय सुरु केले आहेत. तिच्या पुढाकाराने सुरु झालेल्या ’ सखी मंजिरी उत्पादक मार्फत भाजीपाला, अन्नधान्ये,व डाळींचे उत्पादन केले जाते. आरोग्यासाठीही गटाकडून अर्थसहाय्य घेता येते म्हणून तिने वेगवेगळ्या गावांमध्ये याबाबत जनजागृती करण्याची मोहिम हाती घेत प्रत्येक घरात शौचालय बांधण्यासाठी आग्रह धरला. जवळपास चार हजार महिलांना तिने आरोग्य व स्वच्छताविषयक सवयींबाबत प्रशिक्षित केले आहे. तर हिंगलजवाडी इथल्या कमल कुंभारने बांगड्याविक्रीच्या छोट्या व्यवसायापासून सुरू करत पुढे कपडे, लेखनसाहित्य विक्रीपर्यत मजल मारली, स्वत:ला बांगड्यांची वितरक म्हणून प्रस्थापित केले. आजपर्यत तिने जवळपास पाच हजार महिलांना व्यवसाय सुरू करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. उद्योगशीलतेच्या उर्मीतून कमलने कुक्कुटपालन, पशुखाद्य विक्री, शेळीपालन यासारखे कृषीसंलग्न व्यवसाय सुरू केले आणि ’सखी मंजिरी उत्पादन कंपनी’ची संचालक म्हणून ती कार्यरत झाली आहे. कमलला सीआयआय फाऊंडेशनच्या ’वुमन एक्झेम्प्लर ’ तसेच नीती आयोग , मायगव्ह आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणार्‍या विमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महिलांना उद्योजिका बनवून आर्थिक दृष्ठ्या स्वावलंबी बनवण्यासाठी स्वयम शिक्षण प्रयोग कार्यरत आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी व मोहोळ तालुक्यातील पाच हजार महिलांना उद्योजकतेचे प्रशिक्षण देऊन व्यवसाय उभे करण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘स्टार्ट-अप विलेज प्रोग्राम’ अंतर्गत सहाय्य मिळालेले आहे, एकूण एक लाख चार हजार महिलांना उद्योजकतेचे प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसाय उभे करून देण्यासाठी स्वयम शिक्षण प्रयोग प्रयत्नशील आहे.

गोदावरी डांगेनेही बचतगटातून महिलांना संघटीत करून, आरोग्य, पोषण, स्वच्छता, उपजीविकेची संसाधने यावर काम सुरू केले. एक एकर शेतावर प्रायोगिक तत्वावर सेंद्रीय शेतीचा अवलंब करून, अन्नसुरक्षा निर्माण करण्याचा पायंडा पाडणारी ती पहिली महिला आहे. महारष्ट्र राज्यातल्या सखी महासंघांची ती सचिव असून ‘विजया सखी महिला शेतकरी उत्पादक कंपनी’ ची संचालक आहे. हवामान संवेदनक्षम शेतीसाठी निधी उभारून, अन्नसुरक्षा, शाश्वत शेती, जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, तळागाळातल्या महिलांच्या उद्योजकतेसाठी या निधीतून मदत करण्याचे कार्य तिने हाती घेतले आहे. एवढेच नव्हे तर भारत व इतर पंधरा देशांतील तळागाळातील महिला संघटनांचे ती प्रतिनिधीत्व करीत आहे. असाच बदल घडवून आणण्याच्या ध्यासापायी, देवसिंगा गावच्या अर्चना भोसलेने स्वयम शिक्षण प्रयोगाच्या सेंद्रीय शेती, सेंद्रीय बियाणे प्रक्रिया, मृदपरिक्षण, जलगुणवत्ता परिक्षण, जैविक खतनिर्मिती व जमिनीची मशागत यात प्रशिक्षण प्राप्त केले. सेंद्रीय पद्धतीने बीजनिर्मिती, बीजप्रक्रीया, खतनिर्मिती व साठवणूक तसेच खताची योग्य मात्रा व पेरणीचा कालावधी याबाबतही माहिती करून घेतली. घरच्यांचा विरोध पत्करून सेंद्रीय शेतीला सुरुवात करत गावात सेंद्रीय क्रांती घडवून आणली आहे. यासाठी अर्चनाला या वर्षी आयसीआयसीआय बँकेकडून ’ ऍडव्हान्टेज वुमन ’ पुरस्काराने गौरवण्यात आले. सेंद्रीय शेतीचे फायदे पाहून वर्षानुवर्षे दुष्काळाचे चटके खाऊन होरपळणार्‍या मराठवाड्यतल्या शैलाताई नरवडे ,अर्चना माने अशा अनेक महिला एसएसपीच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीकडे वळल्या आहेत. ” माझ्याकडे असलेल्या सात गांडूळखताच्या बेडपासून मला दरवर्षी प्रत्येकी एक लाखापर्यंत उत्पन्न मिळते .शेतीबरोबर हा व्यवसायही माझ्यासाठी फायदेशीर ठरला आहे ” असे तुळजापूरची वैशाली घुगे सांगते.

स्वयम् शिक्षण प्रयोग महाराष्ट्र, गुजराथ, तामिळनाडु, बिहार व ओरिसा या राज्यामध्ये एक लाख पंचेचाळीस हजार महिला शेतकरी व व्यावसायिकांचे नेटवर्क तयार करून पाच लाख लोकांपर्यंत पोचली आहे. अशा विविधांगी कामगिरीबद्दल स्वयम शिक्षण प्रयोगला विविध जागतिक तसेच राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यात युएनडीपी ’एक़्वेटर प्राईझ’ (२०१७) आणि युएनएफसीसीसी ’मोमेंटम फॉर चेंज ’ पर्यावरण पर्याय पुरस्कार (२०१६) यांचा उल्लेख करता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -