सामर्थ्याचे नाव महात्मा गांधी

टिळकांच्या नेतृत्वात तोपर्यंत स्वातंत्र्याचा लढा सुरू असतो तोपर्यंत स्वातंत्र्याच्या पडद्याआड आपले हितसंबंध सुरक्षित आहेत. याची खात्री उच्चवर्णियांना असते. त्यामुळे ते त्यात उत्साहाने सामील होतात. अथणी येथे ११ नोव्हेंबर १९१७ रोजी लोकमान्य टिळकांनी केलेले भाषण नमूद करण्यासारखे आहे. शेतकर्‍यांनी विधिमंडळात जाऊन काय नांगर धरायचा आहे ? शिंप्यांनी तेथे जाऊन काय शिलाई मशीन चालवायची आहे. आणि वाणी तेथे जाऊन काय तराजू धरणार ? असे टिळकांनी अथनी येथील सभेत म्हटले होते.

mahatma gandhi

मोहनदास करमचंद गांधी ते महात्मा गांधी, सुटाबुटातील बॅरिस्टर गांधी ते पंच्यातील महात्मा गांधी, दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रही गांधी ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सेनापती गांधी, विसाव्या शतकातील जगाने ठरवलेला सर्वश्रेष्ठ महापुुरुष गांधी, विलक्षण प्रेम आणि आंत्यतिक द्वेष या कात्रीत असलेले गांधी..असे कितीतरी प्रवास गांधींचा झाला आहे. ही विविध रुपे, पाहाणे, न्याहाळणे, तपासणे अतिशय महत्वाचे ठरते. गांधी महामानव होते. सत्य अहिंसेचे उपासक होते. वगैरे भाषा अती वापरामुळे गुळचट वाटते. गांधींसंबधीचे बरेचसे लिखाण अशा स्वरुपाचे आहे. तर दुसरे टोक म्हणजे विखारी टीका आणि निंदानालस्ती यातील खरा गांधी शोधणे म्हणूनच आवश्यक आहे. गांधींची स्फोटकता, दाहकता, विद्रोह, कृतीशीलता नेहमीच उपेक्षित राहिली. म्हणूनच सामर्थ्याचे नाव महात्मा गांधी असताना गुळचट, पुचाट, अळणी व निरस लिखाणामुळे मजबुरीका नाम महात्मा गांधी…असं हे नाव हिणावलं जातं.

विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ महापुरुष म्हणून जगाने ज्या महात्मा गांधींची निवड करावी त्याच गांधींचा आत्यंतिक तिरस्कार, निंदानालस्ती काही मंडळींकडून व्हावी, त्यातही महाराष्ट्रात ती जास्त व्हावी याची मिमांसा समजून घेतली पाहिजे. महाराष्ट्रात शनिवारवाड्यावर १८१८ साली ब्रिटिशांचे निषाण फडकेपर्यंत पेशव्यांच्या हातात सत्ता होती. त्यामुळे एक दिवस ब्रिटीशांची सत्ता जाईल. ती पुन्हा आपल्या हातात येईल. पेशवाईची स्थापना होईल, असे मनसुबे पाहाणार्‍यांच्या इच्छा गांधींनी स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व स्विकारताच उधळून लावले. या देशाच्या सर्वोच्च पदावर हरिजनाची मुलगी बसलेली पाहाणे हे माझे स्वप्न आहे. असे हा स्वातंत्र्यलढ्याचा सेनापती म्हणतो. तेव्हा स्वातंत्र्य जरी मिळाले तरी सत्ता हातात येणार नाही.

याची जाणीव उच्चवर्णीयांना होऊन जाते. स्वाभाविकच ते गांधीचे हाडवैरी बनतात. टिळकांच्या नेतृत्वात तोपर्यंत स्वातंत्र्याचा लढा सुरू असतो तोपर्यंत स्वातंत्र्याच्या पडद्याआड आपले हितसंबंध सुरक्षित आहेत. याची खात्री उच्चवर्णियांना असते. त्यामुळे ते त्यात उत्साहाने सामील होतात. अथणी येथे ११ नोव्हेंबर १९१७ रोजी लोकमान्य टिळकांनी केलेले भाषण नमूद करण्यासारखे आहे. शेतकर्‍यांनी विधिमंडळात जाऊन काय नांगर धरायचा आहे ? शिंप्यांनी तेथे जाऊन काय शिलाई मशीन चालवायची आहे. आणि वाणी तेथे जाऊन काय तराजू धरणार ? असे टिळकांनी अथनी येथील सभेत म्हटले होते. याचा अर्थ स्पष्ट आहे. आणि म्हणून स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. असे जेव्हा टिळक म्हणतात. तेव्हा स्वराज्य हा ब्राह्मणांचा जन्मसिद्ध अधिकार आहे तसा तो महारांचाही आहे का? असा प्रश्न त्या काळात विचारला जातो. टिळकांच्या काळात आधी राजकीय स्वातंत्र्य कि सामाजिक स्वातंत्र्य हा वाद झडला होता.

लोकमान्य टिळक प्रथम राजकीय स्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते तर महात्मा गांधी फुले, आगरकर हे सामाजिक स्वातंत्र्य म्हणणारे. या बाबतीत टिळक व आगरकरांचा वाद सर्वांना माहित आहे. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्यामध्ये कोणताही भेद करत नाहीत. तेव्हा सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्‍यांच्या वाट्याला आलेली निंदानालस्ती वारसा हक्काने त्यांच्याही वाट्याला येते. सर्व सामान्य जनतेवर गांधीचे असलेले गारुड उच्चवर्णीयांना अधिकच गांधीविरोधी बनवून जाते. गांधींचा सर्वसामान्य जनतेवरील विश्वास तर सर्वसामान्य जनतेचा गांधींवरील विश्वास या अभेद्य गोष्टी होत.

या उलट शिकल्यासवरलेल्यांचा सर्वसामान्यांवरील अविश्वास व गांधींवरील राग वेळोवेळी प्रकट होताना दिसतो. मूठभर एत्तदेशीय लोकांनी सत्ता हस्तगत केल्याने खरे स्वातंत्र्य येणार नसून सत्तेचा दुरुपयोग झाल्यास तिला विरोध करण्याचे सामर्थ्य सर्व लोकांत आल्यानेच ते येणार आहे. अशी गांधींची ठाम धारणा होती, या मुद्द्यावर सुशिक्षित उच्चवर्णीय वर्ग गांधींशी कधीच सहमत झाला नाही. हिंसात्मक चळवळीच्या यशातून सत्ता मूठभर लोकांच्या हातात केंद्रित होण्याचा धोका असतो. त्यामुळेच सर्वच जनतेचा सत्तेत सहभाग हवा असेल तर ही गोष्ट अहिंसात्मक मार्गानेच साध्य होऊ शकते. यावर त्यांची दृढ श्रद्धा होती. गांधींच्या जीवनापासून व शिकवणीपासून सुशिक्षित उच्च वर्णिय आणि वर्गीय कायम फटकू राहिला. सत्य अहिंसा, असहकार, सत्याग्रह, विदेशी कापडांची होळी, अस्पृश्यता निवारण, खादी , चरखा, संयम, साधेपणा इत्यादी सर्व गांधीचे खूळ आहे असे मानत.

गांधींचा मिठाचा सत्याग्रह ऐतिहासीक होता. परंतु या मिठाच्या सत्याग्रहाची उच्चवर्णियांनी यथेच्छ टिंगलटवाळी केली आहे. गांधींचा मिठाचा सत्याग्रह संपताच पुढे हळदीचा सत्याग्रह करतील, त्यानंतर तिखटाचा सत्याग्रह करतील. हळदी, तिखट, मिठाचा सत्याग्रह करून स्वातंत्र्य थोडंच मिळणार? रणाविना स्वातंत्र्य कोणा मिळाले? असा युक्तीवाद करत जेवढा गांधींचा मानभंग करता येईल तेवढा केला गेला. इंग्रजांची सत्ता जाताच ती आपल्या ताब्यात येईल, या उच्चवर्णियांच्या स्वप्नांचा चुराडा गांधीजींनी केला. गांधींच्या नेतृत्वात स्वातंत्र्य मिळाले तरी त्याला काही अर्थ नाही. असे उच्चवर्णियांनी ओळखले होते. १९२० च्या दरम्यान स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व महात्मा गांधीकडे येते आणि पाच वर्षातच १९२५ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होते. हा निश्चितच योगायोगाचा भाग नसतो.

गांधींच्या मते केवळ राजकीय स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. तर श्रमिकांचे, कष्टकर्‍यांचे, शेतकर्‍यांचे व या देशातील शेवटच्या माणसांचे स्वातंत्र्य म्हणजे खरे स्वातंत्र्य ही त्यांची श्रद्धा व धारणा होती. श्रमाला व श्रम करणार्‍यांना चातुवर्णाच्या उरंतडीत शूद्र म्हणून खालचे स्थान होते. अशा अवस्थेत महात्मा गांधी श्रमनिष्ठा, श्रमप्रतिष्ठा यासारख्या गोष्टींचा आग्रह धरतात तेव्हा ज्यांच्या आठदहा पिढ्यांमध्ये चमचाभर घाम गाळला नसले त्यांचा तीळपापड होणे स्वाभाविक आहे. गांधींच्या लिखाणातून या गोष्टी वेळोवेळी उमटत होत्या. स्वातंत्र्याच्या लढ्यात श्रमप्रतिष्ठा हे मूल्य रुजवण्याचा प्रयत्न गांधीजी करतात. स्वतः भंगी वस्तीत राहातात. भंगीकाम करतात. तेव्हा या माणसाचा स्पर्शच काय? पण सावलीचाही विटाळ असलेल्यांना ते रुचणे शक्य नव्हते.

वकिलीचा व्यवसाय अनितीचा व्यवसाय आहे. एखाद्या वकिलीच्या कामाला न्हाव्याइतकीच किंमत आहे. भारतामध्ये भंगी, डॉक्टर, शिक्षक, वकिल, इंजिनियर, व्यापारी आदी सर्वांना दिवसभराच्या प्रामाणिक कष्टासाठी सारखीच मजुरी मिळायला हवी. शेतकर्‍यांच्या मुक्तीतच आपली सर्वांची मुक्ती आहे. वकिल, डॉक्टर किंवा धनाढ्य जमिनदार ती आपल्याला कधीच मिळवून देणार नाही. अशा प्रकारच्या महात्मा गांधींच्या विधानांनी आणि त्या अनुरूप कार्यक्रमांनी सत्ताकामसू उच्चवर्णिय, वर्गिय शिक्षितांच्या आशा आकांक्षेवर पाणी फिरवले गेले. ज्या काळात डॉक्टर, इंजिनियर, वकिल हा सुशिक्षित वर्ग प्रामुख्याने उच्चवर्णिय होता. तोच वर्ग नेतृत्वातही होता. त्याच काळात त्या सर्वांना गांधी, न्हाव्याच्या व भंग्याच्या बरोबरीने बसवत असतील. त्यातील स्फोटक समजून घेणे आवश्यक आहे. प्रत्येकाने शरीरश्रम केलेच पाहिजे असा माझा आग्रह आहे. या कर्तव्यातून कोणालाही वगळू नये, असे मला वाटते. बौद्धीक काम करणार्‍यांनी शरीरश्रम केल्यास बौद्धीक कामाचा दर्जाही वाढण्यास मदत होईल. प्राचीन काळात ब्राह्मण डोक्याने आणि हाताने काम करत असत, असे म्हणण्याचे धाडस मी करतो. पण समजा तेव्हा ते करत नसले तरीही, वर्तमान काळात प्रत्येकाने शरीरश्रम करण्याची आवश्यक आहे. असे गांधीजींनी एका ठिकाणी म्हटले आहे.

मताधिकार कोणास असावा. हा त्या काळात झडलेला एक प्रमुख वाद. शिक्षण उत्पन्न व सामाजिक दर्जा, ही मताधिकार प्राप्तिची कसोटी असावी. हा सुशिक्षितांचा आग्रह. त्या काळात या तिन्ही गोष्टी प्रामुख्याने कोणाकडे होत्या हे लक्षात घेतले तर मताधिकार कोणाला होता? या प्रश्नाचे उत्तर मिळून जाते. या पार्श्वभूमीवर गांधी जेव्हा शरीरश्रम करणार्‍यांना मतदानाचा अधिकार हवा अशी ठाम व आग्रही भूमिका घेतात तेव्हा उच्चवर्णीयांचा क्षोभ समजून घेणे गरजेचे आहे. महात्मा गांधींनी काँग्रेसच्या अंतर्गतसुद्धा काँग्रेसचा सभासद श्रमनिष्ठ असावा हा आग्रह धरला होता. बेळगावच्या अधिवेशनात त्यांनी मांडलेला ठराव बारगळला. स्वतः कष्ट न करता जे दुसर्‍याच्या श्रमावर जगतात ते चोर आहेत. श्रम न करणार्‍यांना अन्न नाही. ही भूमिका गांधीजी घेतात. तेव्हा ते कष्टकर्‍यांना सत्ता, सन्मान आणि प्रतिष्ठा देत असतात. त्याच वेळेस जन्माधारीत श्रेष्ठत्वाला त्यांची जागा दाखवत असतात. गांधीजींची ही दाहकता निश्चितच प्रस्थापितांना हादरा देणारी आहे व त्यांच्या तीव्र जोशास कारणीभूत ठरत असेल तर नवल नाही.

चंद्रकांत वानखडे