घरताज्या घडामोडीCovid-19 दुसऱ्या लाटेत सर्वाधिक बायोमेडिकल कचरा महाराष्ट्रातून

Covid-19 दुसऱ्या लाटेत सर्वाधिक बायोमेडिकल कचरा महाराष्ट्रातून

Subscribe

भारताने कोरोनाच्या संकटकाळात एका वर्षाच्या कालावधीत म्हणजे जून २०२० ते जून २०२१ या कालावधीत जवळपास ५६ हजार ८९८ टन इतक्या मोठ्या प्रमाणात Covid-19 बायोमेडिकल वेस्ट निर्माण केला आहे. केंद्राच्या पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल विभागामार्फत मांडण्यात आलेल्या डेटामध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे. हा बायोमेडिकल कचरा संसर्गजन्य अशा स्वरूपाचा आहे. महत्वाचे म्हणजे सर्वाधिक बायोमेडिकल कचरा निर्माण करणाऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक कचरा निर्माण झाल्याची आकडेवारी आहे. महाराष्ट्राने या वर्षभराच्या कालावधीत सुमारे ८ हजार ३१७ टन इतका कचरा निर्माण झाला. त्यापाठोपाठ केरळ ६ हजार ४४२ टन, गुजरात ५ हजार टन, तामिळनाडू ४ हजार ८३५ टन, दिल्ली ३ हजार ९९५ टन, उत्तर प्रदेश ३ हजार ८८१ टन आणि कर्नाटक ३ हजार १३३ टन इतक्या मोठ्या प्रमाणात बायोमेडिकल कचरा निर्माण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

पण प्रत्यक्षात तयार झालेला कचरा आणि त्यामधून पसरलेले इन्फेक्शन याचा संबंध थेट वास्तविक परिस्थितीशी जोडला तर तो वेगळाच आहे असे तज्ञांचे मत आहे. बायोमेडिकल कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी मंत्रालयाकडून कोविड बीएमड्ब्यू एपची निर्मिती करण्यात आली होती. देशात एकुण १९८ इतक्या मोठ्या प्रमाणात बायोमेडिकल वेस्टवर प्रक्रिया करणाऱ्या सुविधा आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक अशा २९ इतक्या प्रकारच्या सुविधा आहेत. त्यापाठोपाठ कर्नाटकात २६ अशा प्रमाणात आहेत.

- Advertisement -

सेंट्रल पोल्यूशन कंट्रोल बोर्डच्या आकडेवारीनुसार बायोमेडिकल कचऱ्याची सर्वाधिक अशी निर्मिती ही १० मे रोजी झाली होती, जेव्हा दुसरी कोरोनाची लाट ही पिकमध्ये होती. अनेक राज्यातील कोरोनाची वाढलेली रूग्णसंख्या यासाठी जबाबदार होती. तर गेल्या वर्षी सरासरी बायो मेडिकल वेस्ट निर्मिती ही १८०-२२० टीपीडी या दरम्यान होती. कोरोनाने संपुर्ण देशात आपण कोणत्या पद्धतीने बायोमेडिकल वेस्ट हाताळतो याचा खुलासा केला आहे. मुळातच आपण वापरत असलेल्या मास्कची विल्हेवाट कशी लावावी यासारख्या सोप्या गोष्टी राज्य सरकारने नागरिकांना सांगितलेल्या नाहीत. मास्कची विल्हेवाट लावायची नेमकी कोणती आदर्श पद्धती आहे ? त्यासोबतच महापालिकेच्या कचऱ्यासोबतच बायोमेडिकल कचरा एकत्र करायचा का ? यासारख्या गोष्टीही राज्य सरकारने स्पष्ट केलेल्या नाहीत. त्यासाठी सार्वजनिक खाजगी भागिदारीतून ही संपुर्ण बायोमेडिकल कचरा विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया राबवण्याची गरज असल्याचे मत इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पॉप्युलेशन स्टडिजच्या डेव्हलपमेंटल स्टडिजच्या प्राध्यापिका अपराजिता चट्टोपाध्याय यांनी मांडले आहे.

असोसिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (APHI) च्या डॉ गिरधर ग्यानी यांच्यानुसार कोविड बायोमेडिकल कचरा हा महापालिकेच्या इतर कचऱ्यासोबतच उचलला जातो. त्यासाठी वापरण्यात येणारे वाहनही एकच असते. तर कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी याबाबत कोणतीही एकसारखी पद्धत नसल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली. बायोमेडिकल कचऱ्यामध्ये प्रामुख्याने पीपीईचा समावेश सर्वाधिक आहे. तर कोरोना रूग्णांकडून उरलेले अन्नही बायोमेडिकल कचरा म्हणूनच हाताळले जाते. त्यासोबतच कटलरी, उशी, बेड कव्हर याचाही समावेश बायोमेडिकल कचरा म्हणून हाताळला जात होता. याआधी दिवसापोटी प्रत्येक कोरोना रूग्णाकडून जूनमध्ये ३ किलो इतका सरासरी बायोमेडिकल कचरा निर्माण व्हायचा. आता या कचऱ्याचे प्रमाण १.२ किलो इतके कमी झाले आहे. सध्या पीपीई, मास्क, ग्लव्ह्ज, कापूस, स्वॅब, बूट, कव्हर, सुई, सिरींज आणि आयव्ही बॉटल्स या कोरोनाचा बायोमेडिकल कचरा म्हणून विल्हेवाट लावला जातो.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -