घरक्रीडाTokyo Olympics : तीन पराभवांमुळे निराश झालेल्या भारतीय महिला हॉकी संघाचा एका...

Tokyo Olympics : तीन पराभवांमुळे निराश झालेल्या भारतीय महिला हॉकी संघाचा एका चित्रपटामुळे वाढला जोश

Subscribe

पहिल्या तीन सामन्यांतील पराभवामुळे भारताच्या खेळाडू निराश होत्या.

भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सोमवारी ऐतिहासिक कामगिरी केली. भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का देत ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली. मात्र, त्याआधी भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरी गाठण्याबाबतही साशंकता होती. भारतीय महिला संघाने टोकियो ऑलिम्पिकची निराशाजनक सुरुवात करताना पहिले तीन साखळी सामने गमावले होते. त्यानंतर मात्र दमदार पुनरागमन करत भारताने आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांना पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. प्रशिक्षक जोर्द मरीन यांनी तीन पराभवांमुळे निराश असलेल्या भारतीय महिला संघाला एक चित्रपट दाखवला. त्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढल्याचे मरीन यांनी सांगितले.

वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे

स्वतःतील क्षमता आणि स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवतानाच मागील कामगिरी लक्षात घेऊन वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते. आम्ही तेच केले. पराभूत झाल्यानंतर तुम्ही स्वतःतील क्षमतेवर विश्वास कायम ठेवला पाहिजे आणि हेच मी आमच्या खेळाडूंना सांगितले. मी त्यांना एक चित्रपट दाखवला. केवळ वर्तमानाचा विचार करणे गरजेचे असते हे त्या चित्रपटात दाखवले होते. त्याचा आम्हाला खूप फायदा झाला. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात मी सतत त्या चित्रपटाचा उल्लेख करत होतो, असे मरीन म्हणाले.

- Advertisement -

मोठा विचार करणे खूप महत्त्वाचे

मरीन यांनी चित्रपटाचे नाव सांगण्यास मात्र नकार दिला. लॉकडाऊनच्या काळात मला भारतात आलेल्या अनुभवांबाबत मी पुस्तक लिहिले आहे. त्यात या चित्रपटाचा उल्लेख असल्याचे मरीन म्हणाले. भारतात मोठा विचार करणे खूप महत्त्वाचे असते आणि हेच आमच्या खेळाडूंना सांगितले. तुम्ही मोठे लक्ष्य समोर ठेवणे गरजेचे असते. तुम्ही जर डोंगराचे लक्ष्य समोर ठेवले, तर तुम्ही पडलात जरी जमिनीवर पडता, असेही मरीन यांनी नमूद केले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -