घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकोरोना संपल्यानंतरच मराठी साहित्य संमेलन

कोरोना संपल्यानंतरच मराठी साहित्य संमेलन

Subscribe

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

जोपर्यंत कोरोनाची साथ कमी होत नाही तोपर्यंत नाशिक शहरात ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार नाही, असा महत्वपूर्ण निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतला आहे. लोकांचा मान राखून साहित्य संमेलन झाले पाहिजे. मात्र, जोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नाही. सरकार परवानगी देत नाही तोपर्यंत संमेलन आयोजित करता येणार नाही, अशी माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी माध्यमांना दिली.

कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेले साहित्य संमेलन आणखी एक महिने स्थगित करायचे की तूर्त यंदा साहित्य संमेलनच रद्द करायचे, यासंबंधी भूमिका ३१ जुलैपर्यंत कळवावी, असे पत्र कौतिकराव ठाले-पाटील यांनी नाशिकच्या आयोजकांना पाठविले होते. त्यानंतर साहित्य संमेलनाबाबत उलटसुलट चर्चा झाली. संमेलनाबाबत आणि कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करण्यासाठी मंगळवारी (दि.३) साहित्य संमेलनाच्या स्वागत मंडळाचे प्रमुख जयप्रकाश जातेगावकर, समितीप्रमुख विश्वास ठाकूर, डॉ. शंकर बोर्‍हाडे, दिलीप साळवेकर, संजय करंजकर, सुभाष पाटील, विनायक रानडे साहित्य महामंडळाच्या औरंगाबाद येथील कार्यालयात आले होते. या भेटीत त्यांनी अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे व कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे यांच्याशी चर्चा केली.

- Advertisement -

नाशिककरांना साहित्य संमेलन घ्यावयाचे आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर साहित्य संमेलन घेऊ, असे महामंडळाच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. कोरोनामुळे संमेलनाच्या तारखा सांगणे अशक्य आहे. मात्र, संमेलन फार पुढे जाणार नाही, याची दक्षता स्वागत मंडळ आणि लोकहितवादी मंडळ घेईल. त्या संदर्भात स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करुन साहित्य संमेलन लवकर घेता येईल, याचा प्रयत्न केला जाईल. संमेलन नाशिककरांसाठी घ्यावयाचे असल्याचे त्याचा लाभ साहित्य रसिकांना घेता येईल, अशी साहित्य महामंडळाप्रमाणेच स्वागत मंडळाचीही भूमिका आहे. मात्र, संमेलन जेव्हा घेऊ तेव्हा ते उत्तमच घेण्यात येईल. साहित्य संमेलनात वाचकांना पुस्तक खरेदी व प्रकाशक विक्रेत्यांना पुस्तक विक्रीचा लाभ घेता यावा. लेखक व वाचकांच्या गाठीभेटी व्हाव्यात, अशी साहित्य महामंडळाची व स्वागत मंडळाची भूमिका आहे. त्या दृष्टीने हे संमेलन नेहमीप्रमाणेच व्हावे, असा साहित्य महामंडळाप्रमाणेच स्वागत मंडळाचा प्रयत्न आहे, असे प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर यांनी सांगितले.

ऑनलाईन साहित्य संमेलनास नकार

कोरोनामुळे अनेक सार्वजनिक कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. साहित्य संमेलनही ऑनलाईन पद्धतीने व्हावे, असे अनेकांचे मत आहे. यावर ठाले यांनी स्पष्टीकरण दिले. ऑनलाईन साहित्य संमेलन आयोजित केले जाणार नाही. ऑनलाईन संमेलन हे संकल्पनेत बसत नाही. लोकांना पुस्तक खरेदी करावे लागतात, असे ठाले-पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -