घरक्रीडाToronto Masters : दुखापतीमुळे राफेल नदालची माघार; मेदवेदेव्हचा दुसऱ्या फेरीत प्रवेश

Toronto Masters : दुखापतीमुळे राफेल नदालची माघार; मेदवेदेव्हचा दुसऱ्या फेरीत प्रवेश

Subscribe

नदालच्या अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेतील सहभागाबाबतही साशंकता आहे.

स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालने एटीपी टोरोंटो मास्टर्स स्पर्धेतून माघार घेतली आहे. डाव्या पायाच्या दुखापतीमुळे नदालला हा निर्णय घेणे भाग पडले. तसेच या महिन्याअखेरीस होणाऱ्या अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेतील त्याच्या सहभागाबाबतही साशंकता निर्माण झाली आहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या नदालचा टोरोंटो मास्टर्स स्पर्धेतील सलामीचा सामना दक्षिण आफ्रिकेच्या लॉईड हॅरिसविरुद्ध होणार होता. परंतु, या सामन्याच्या एक दिवसआधीच त्याने स्पर्धेतून माघार घेतली. हॅरिसनेच मागील आठवड्यात वॉशिंग्टन येथे झालेल्या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत नदालला पराभवाचा धक्का दिला होता.

खेळाचा आनंद घेता येत नाहीये

नदालला दुखापतीमुळे विम्बल्डन आणि टोकियो ऑलिम्पिकलाही मुकावे लागले होते.’मागील काही महिन्यांपासून मला त्रास जाणवत आहे. कॅनडामध्ये खेळताना मला बरेच यश मिळाले आहे. त्यामुळे या स्पर्धेतून माघार घेताना मला दुःख होत आहे. परंतु, टेनिसचा आनंद घेणे सर्वात महत्त्वाचे असते आणि पायाच्या दुखापतीमुळे मला खेळाचा आनंद घेता येत नाहीये,’ असे नदाल म्हणाला. नदालने याआधी पाच वेळा टोरोंटो मास्टर्स स्पर्धा जिंकली आहे.

- Advertisement -

मेदवेदेव्हची विजयी सुरुवात 

दुसरीकडे रशियाचा अव्वल सीडेड खेळाडू डॅनिल मेदवेदेव्हला टोरोंटो मास्टर्स स्पर्धेची विजयी सुरुवात करण्यात यश आले. त्याने कझाकस्तानच्या आलेहान्द्रो बुबलिकचा ४-६, ६-३, ६-४ असा पराभव केला. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्याची मेदवेदेव्हला चांगली सुरुवात करता आली नाही. त्याने पहिला सेट ४-६ असा गमावला होता. परंतु, त्याने दमदार पुनरागमन करताना दुसरा आणि तिसरा सेट अनुक्रमे ६-३ आणि ६-४ अशा फरकाने जिंकत स्पर्धेत आगेकूच केली.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -