घरमुंबईप्रवासापेक्षा मुतारी महाग

प्रवासापेक्षा मुतारी महाग

Subscribe

"राईट टू पी" च्या नावाखाली मध्य रेल्वेवर लूटमार

मुंबई:शौचालयाबाहेर मुतारी मोफत असा फलक लावला असतानाही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर शौचालयात जाणार्‍या महिलांची लूटमार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आले आहे. मुतारीत जाणार्‍या महिला प्रवाशांकडून प्रति महिला १, ५ , १० रुपये घेण्यात येत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची आर्थिक लूटमार सुरू आहे. अशा लुटणार्‍या शौचालय चालकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

सीएसएमटी रेल्वेस्थानकात शौचास येणार्‍या महिला प्रवाशांकडून ५ ते १० रुपये शुल्क आकारले जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये तेथील कर्मचारी महिला प्रवाशांकडून १० रुपये घेत असल्याचे दिसून येत आहे. मध्य रेल्वेने स्टेशनवरील काही शौचालय आणि मुतारी देखभालीची जबाबदारी खासगी कंत्राटदारकडे दिली आहे. तर काही ठिकाणी रेल्वे स्वत: देखभाल करते.

- Advertisement -

मात्र जे शौचालय खासगी कंत्राटदारांकडून चालविले जातात, तिथे कंत्राटदाराकडून कर्मचार्‍यांची नेमणूक केली गेली आहे. हे कर्मचारी येणार्‍या प्रवाशांकडून पैसे घेतात. न दिल्यास त्या प्रवाशासोबत मुजोरी सुद्धा करतात. मध्य रेल्वेचे मुख्यालय सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आहे. मात्र या मुख्यालयाजवळच रेल्वे प्रवाशांसाठी असलेल्या शौचालयाबाहेर मुतारी निःशुल्क लिहले असूनसुद्धा यांच्याकडून पैसे घेतले जात आहेत.याबद्दल रेल्वे प्रशासनाला माहिती सुद्धा नाही. त्यामुळे रेल्वेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

शौचालयाच्या सफाईसाठी लागणारे फिनेल आणण्यासाठी हा एक रुपया घेण्यात येतो. एक रुपया फार नसल्याने अनेक प्रवासी कोणतीही कटकट न करता एक रुपया देतात. मात्र, काही शौचालयांवर काम करणारे कर्मचारी अतिरिक्त पैसे घेतात, असे शौचालयात काम करणार्‍या कर्मचार्‍याने नाव न छापण्यासाठी अटीवरदैनिक आपलं महानगरला सांगितले आहे. परंतु, यातून कंत्राटदार दिवसाला हजारो रुपये कमवत असल्याचे उघड आहे.

- Advertisement -

महिला प्रवाशांचे आरोग्य धोक्यात
आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरील स्थानकांत महिलांसाठी केवळ 30 टक्के प्रसाधनगृहे आहेत. यातील सुस्थितीत असलेली प्रसाधनगृहे हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकीच आहेत. त्यामुळे उपनगरीय रेल्वेने प्रवास करणार्‍या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर मूत्रमार्गाच्या रोगांचा (यूरिनर ट्रॅक्ट इन्फेक्शन) संसर्ग होतो. स्त्रियांमध्ये या रोगाचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत सहापट अधिक असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार म्हणतात.

काय म्हणते प्रशासन

मुतारीमध्ये पैसे आकारले जात असल्याची तक्रार आतापर्यंत आमच्याकडे आली नाही. जर आमच्याकडे कोणी पैसे आकारल्याची तक्रार केल्यास आम्ही त्यावर तातडीने कारवाई करू. – ए.के. सिंह,
वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

सीएसएमटी रेल्वे स्थानकावर स्वच्छता गृहांमध्ये नि: शुल्कचा फलक लावून सुद्धा आज महिला प्रवाशांकडे लघुशंकेसाठी पैसे मागितले जातात. यावर रेल्वे प्रशासनाने लक्ष घालून अशा पैसे मागणार्‍या शौचालय चालकांवर कडक कारवाई करावी.
-अरुणा घाडगे, महिला प्रवासी

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -