घरमहाराष्ट्रराज्यावर आता शाहीन चक्रीवादळाचे संकट

राज्यावर आता शाहीन चक्रीवादळाचे संकट

Subscribe

चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर पावसाचे गंभीर परिणाम दिसून येत आहे. अशातच आता अरबी समुद्रात शाहीन चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. हे शाहीन चक्रीवादळ गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक या भारताच्या पश्चिम किनारपट्टीला धडकणार नाही. मात्र, गुजरात किनारपट्टी भागात याचा काहीअंशी परिणाम जाणवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या शाहीन चक्रीवादळ भारतीय किनारपट्टीवरून आखाती देशांच्या दिशेने पुढे सरकत आहे. पण या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मात्र, शाहीन चक्रीवादळामुळे राज्यात पुन्हा पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे कोकण किनारपट्टीसह, मराठवाडा, मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार दिवसांत कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे पुढील काही तासांत याठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वार्‍यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

तसेच भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर ताशी ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत. पुढील चार दिवस राज्यात पावसाची हीच स्थिती कायम राहणार असून ५ ऑक्टोबरपासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चक्रीवादळामुळे राज्यातील किनारपट्टी भागात राहणार्‍या नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मच्छिमारांना 3 ऑक्टोबरपर्यंत मासेमारी करण्यासाठी समुद्रात न जाण्याच्या इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -