घरमुंबईखगोल भौतिकशास्त्रज्ञ मेघनाद साहा

खगोल भौतिकशास्त्रज्ञ मेघनाद साहा

Subscribe

मेघनाद साहा हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांनी ऊष्मीय आयनीकरणाचे समीकरण मांडून त्यांचा उपयोग तारकेय वर्णपटांच्या स्पष्टीकरणासाठी केला. खगोल भौतिकीतील या महत्त्वाच्या कार्याकरिता ते प्रसिद्घ आहेत. साहा यांचा जन्म डाक्का जिल्ह्यातील सिओरात्तली (आता बांगला देश) येथे ६ ऑक्टोबर १८९३ रोजी झाला. त्यांनी कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजात प्रफुलचंद्र रॉय व सर जगदीशचंद्र बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊन 1915 मध्ये एम. एस्सी आणि नंतर सापेक्षता सिद्घांत व प्रारण दाबाचे मापन या विषयांवर संशोधन करून पीएचडी संपादन केली. त्यानंतर त्यांनी लंडनच्या इंपिरियल कॉलेजमध्ये संशोधन करून डी. एस्सी. पदवी मिळविली. ते कोलकाता विद्यापीठात भौतिकी विषयाचे खैरा प्राध्यापक (1921-23), पलित प्राध्यापक (1938-52) आणि गुणश्री प्राध्यापक (1952-56) तसेच अलाहाबाद विद्यापीठात भौतिकीचे प्राध्यापक (1923-38) होते.

साहा यांनी आणवीय सिद्घांत आणि पुंजयामिकी यांमधील तत्त्वांचा वापर करून तारकेय वर्णपटांच्या चित्रलिपीचा सांकेतिक अर्थ शोधून काढण्याकरिता सर्वप्रथम प्रयत्न केला. तारकेय वातावरणातील तापमानाला (6,000ओ से. किंवा अधिक) तार्‍याचे घटक असलेल्या पुष्कळशा अणूंच्या बाह्य कवचातील इलेक्ट्रॉन छेदले जातात. या आणवीय छेदन प्रक्रियेला इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे आयनीकरण म्हणतात आणि छेदित अणूला आयन (विद्युत्भारित अणू) म्हणतात. अशा प्रकारे तारकेय वातावरणात मुक्त इलेक्ट्रॉन आणि छेदित अणू यांचे वायुमय मिश्रण असते. साहा यांनी या मिश्रणास वायूचा गत्यात्मक सिद्घांत आणि ऊष्मागतिकी यांचे नियम लावले.

- Advertisement -

कोणत्याही मूलद्रव्याच्या अणुंकरिता छेदन किंवा आयनीभवन केवळ उच्च तापमानामुळे घडून येत नसून ते नीच दाबामुळेसुद्घा घडते, हे साहा यांनी सप्रमाण सिद्घ केले. दाबातील न्यूनीकरणामुळे छेदन झाल्यानंतर उरलेला अणू आणि मुक्त इलेक्ट्रॉन यांची गाठ पडण्याची संधी अधिक कमी होते आणि पुनःसंयोग होण्याचा वेग कमी होऊन आयनीकरण वेग बदलत नाही. साहा यांनी 1920 मध्ये ‘ सूर्याच्या वर्णमय आवरणातील आयनीभवन’ या विषयावरील एक निबंध फिलॉसॉफिकल मॅगझीनमध्ये प्रसिद्घ केला. रेडिओ तरंगांचे प्रेषण, ज्योतींचे संवहन, प्रज्योत आणि स्फोटक विक्रियांची रचना यांमधील समस्या सोडविण्याकरिता साहा यांचा आयनीभवन सिद्घांत उपयुक्त ठरला आहे. साहा यांनी कोलकाता येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स’ ही संस्था स्थापन करण्यात पुढाकार घेतला.

ते या संस्थेचे सन्माननीय संचालक होते. त्यांच्या मृत्यूनंतर या संस्थेला त्यांचे नाव देण्यात आले. ते लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलो होते (1927). भारतीय विज्ञान परिषद संस्थेच्या एकविसाव्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते (1934). 1952 च्या सार्वत्रिक निवडणुकीत स्वतंत्र उमेदवार म्हणून ते लोकसभेवर निवडून आले होते. आयुष्याच्या अखेरच्या काळात त्यांनी आपले लक्ष विज्ञानाच्या सामाजिक कार्याकडे वळविले. 1935 मध्ये त्यांनी इतिहास, संस्कृती व विज्ञान यांना वाहिलेले सायन्स अँड कल्चर हे नियतकालिक सुरू केले. अशा या महान वैज्ञानिकाचे 16 फेब्रुवारी 1956 रोजी दिल्ली येथे निधन झाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -