घरमुंबईआर्यनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

आर्यनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Subscribe

एनसीबी कोठडीची मागणी फेटाळली

कॉर्डेला क्रू्झ अमली पदार्थ प्रकरणात एनसीबीला धक्का बसला आहे. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह अन्य सात आरोपींच्या एनसीबी कोठडीत वाढ करण्याची एनसीबीची विनंती न्यायालयाने फेटाळली आहे. त्याचवेळी न्यायालयाने आर्यन खानसह सर्व आठ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून आर्यन खानतर्फे लगेचच ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांनी अंतरिम जामिनासाठी अर्ज सादर केला आहे. त्याच्यासह अन्य आरोपींच्या वकिलांनीही अंतरिम जामिनासाठी विनंती करत अर्ज सादर केले आहेत. या अर्जांवर आता शुक्रवारी सकाळी ११ वाजता सुनावणी होणार आहे.

आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने गुरुवारी न्यायालयात हजर केले. अधिक चौकशीत मिळालेल्या तपशीलावरून अमली पदार्थ पुरवठ्याचा मोठा कट असल्याचे दिसत असल्याने आर्यन खान, अरबाज मर्चंट व इतर सहा जणांची कोठडीतील अधिक चौकशी आवश्यक आहे, त्यामुळे त्यांच्या एनसीबी कोठडीत ११ ऑक्टोबरपर्यंत वाढ करावी, अशी विनंती एनसीबीतर्फे अतिरिक्त महान्याय अभिकर्ता अनिल सिंग यांची न्यायालयाला केली. अर्चित कुमार या आरोपीला आर्यन खानने दिलेल्या जबाबाच्या आधारावरच अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

४ ऑक्टोबर रोजी या आठ जणांना एनसीबी कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर एनसीबीने तपासात प्रगती दाखवत पार्टी आयोजक व पुरवठादारांनाही ताब्यात घेतले आहे. आता अमली पदार्थ प्रकरणाची पूर्ण साखळी स्पष्ट होणे आवश्यक असल्याने सर्वांची अधिक चौकशी आवश्यक आहे, असे अनिल सिंग यांनी न्यायालयात सांगितले. मात्र, एनसीबीची विनंती न्यायालयाने फेटाळली व आर्यनसह सर्व आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर लगेचच आर्यन व अन्य सात आरोपींच्या वकिलांनी अंतरीम जामिनासाठी अर्ज सादर केला.

‘सर्वांनी सहकार्य केल्यास जामिनाविषयी सुद्धा आताच सुनावणी घेऊन निर्णय देण्याची तयारी आहे’, असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले व एनसीबीने जामीन अर्जांविषयी उत्तर द्यायला हवे, असे नमूद केले. त्यावर अतिरिक्त महान्याय अभिकर्ता अनिल सिंग यांनी जामीन अर्जांना विरोध दर्शवला आणि त्याविषयी उत्तर दाखल करू, असे सांगितले. त्याचबरोबर या न्यायालयाला जामीन अर्जांविषयी सुनावणी घेता येणार नाही, असा मुद्दाही मांडला. मात्र, नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला जाईपर्यंत न्यायालय आरोपीच्या अंतरिम जामिनावर सुनावणी घेऊन निर्णय देऊ शकते, मग तपास संस्थेने उत्तर देवो अथवा न देवो, असे सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्याच्या आधारे मानेशिंदे यांनी न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिले. अखेर कोर्टाने जामिनाविषयीची सुनावणी शुक्रवारी सकाळी सकाळी ११ वाजता ठेवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -