घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक महापालिका वर्ग ३ कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीची घोषणा ३ नोव्हेंबरला

नाशिक महापालिका वर्ग ३ कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीची घोषणा ३ नोव्हेंबरला

Subscribe

आयुक्तांनी दिले म्युनिसिपल सेनेला आश्वासन: अधिकार्‍यांना मात्र करावी लागणार प्रतिक्षा

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बदलीच्या चर्चेने महापालिका आयुक्त कैलास जाधव व्यथित झाल्याने कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया रखडली होती. कर्मचार्‍यांना दिवाळीनंतरच पदोन्नती दिली जाईल असे मंगळवारी सकाळी आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र पदोन्नती समितीच्या बैठकीनंतर दुपारी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे अखेर वर्ग ३ मधील कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीची घोषणा येत्या ३ नोव्हेंबर रोजी करण्याचे आश्वासन आयुक्त जाधव यांनी दिले. वर्ग १ व २ मधील अधिकार्‍यांच्या पदोन्नतीला महासभेची मान्यता आवश्यक असल्याने अधिकार्‍यांना पदोन्नतीसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयात दाखल याचिकांच्या निर्णयाच्या अधिन राहून शासनाच्या विविध विभागात कर्मचार्‍यांना पदोन्नत्या दिल्या जात असताना महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी मात्र गेल्या आठ वर्षांपासून पदोन्नतीपासून वंचित आहेत. परसेवेतील अधिकार्‍यांना महापालिकेत पदोन्नतीवर एन्ट्री दिली जात असताना महापालिकेच्या स्थानिक अधिकारी, कर्मचार्‍यांना पदोन्नती कधी मिळणार, असा संतप्त सवाल केला जात आहे. स्थायी समिती आणि महासभेत देखील कर्मचारी पदोन्नती प्रश्नावर गरमागरम चर्चा झाल्यानंतर प्रशासनाने लवकरत लवकर पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासित केले होते. उपआयुक्त (प्रशासन) मनोज घोडे-पाटील यांनी दि. ७ मे २०२१ रोजीच्या शासन निर्णयाचा संदर्भ देत पदोन्नतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जाईल, असे सूचित केले होते. मात्र अद्याप ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून महापलिकेत परसेवेतील प्रशांत ठोंबरे यांची पदोन्नतीवर उपायुक्तपदी नियुक्ती केली गेली. मात्र यासंदर्भातील शासन निर्णयाची अंमलबजावणी प्रशासनाकडून केली जात नसल्यामुळे महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे असंतोष निर्माण झाला असून त्याचा महापालिकेच्या कामकाजावर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात कर्मचारी संघटनांसह विरोधी पक्षांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर उपायुक्त(प्रशासन) मनोज घोडे-पाटील यांच्या अध्यक्षतेखालील पदोन्नती समितीने आपला अहवाल ९ सप्टेंबर २०२१ रोजी आयुक्त जाधव यांना सादर केला आहे. परंतू या अहवालाला आयुक्तांची मंजूरी मिळू न शकल्याने म्युनिसिपल कर्मचारी सेनेने मंगळवारी(दि.२६) आक्रमक भूमिका घेत आयुक्तांच्या दालनासमोर निदर्शने केली. त्यानंतर संघटनेचे अध्यक्ष तिदमे यांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली. यावेळी वर्ग ३ मधील कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीचा निर्णय येत्या ३ नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाईल. वर्ग १ व २ मधील अधिकार्‍यांच्या पदोन्नतीसाठी मात्र प्रतिक्षा करावी लागेल. अधिकार्‍यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव महासभेत सादर करून मंजूर घेतली जाईल, असे आश्वासन आयुक्त जाधव यांनी दिले.

- Advertisement -

 

Pravin Tidame
Pravin Tidame

महापालिकेतील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीचा प्रश्न गेल्या आठ वर्षांपासून रखडला आहे. म्युनिसिपल कर्मचारी कामगार संघटनेने आयुक्तांना वेळोवेळी निवेदने सादर केल्यानंतर २५ ऑक्टोबरपर्यंत पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. ही मुदत उलटल्याने संघटनेच्या शिष्टमंडळाने आज आयुक्तांची भेट घेतली. आयुक्तांनी ३ नोव्हेंबरपर्यंत पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.
– प्रविण तिदमे, अध्यक्ष, म्युनिसिपल कर्मचारी, कामगार सेना नाशिक,

- Advertisement -

 

नाशिक महापालिका वर्ग ३ कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीची घोषणा ३ नोव्हेंबरला
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -