घरमुंबईसचिनचा मृतदेह १००  दिवसांनंतरही जेजेत!

सचिनचा मृतदेह १००  दिवसांनंतरही जेजेत!

Subscribe

पोलीस ठाण्यात झालेल्या मारहाणीमुळे आपल्या भावाचा मृत्यू झाला, असा दावा करत एका १७ वर्षीय संशयित आरोपीचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्याच्या कुटुंबियांनी नकार दिला आहे. तीन महिने उलटूनही त्या मुलाचा मृतदेह ताब्यात घेतलेला नाही. जोपर्यंत संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,असा पवित्रा त्या मुलाच्या कुटुंबियांनी घेतला आहे.मात्र मुलाचा मृत्यू हा लेप्टोस्पायरोसिसने झाल्याचे पोलिस सांगतात.

सचिन जैसवार (१७) हा धारावीतील राजीव गांधी नगर या परिसरात कुटुंबियांसह रहात होता. नववी इयत्तेत शिकणारा सचिनच्या कुटुंबात आई, वडील, दोन भाऊ, दोन बहिणी,आजी आणि आजोबा असे सदस्य आहेत. वडील रंगारी असून मोठा भाऊ सुनील हा जेवणाच्या डिलिव्हरीचे काम करतो. भाऊ सुनीलने दिलेल्या माहितीनुसार १२ जुले रोजी धारावी पोलिसांनी मोबाईल फोन चोरीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी संशयित म्हणून सचिनला धारावी पोलीस ठाण्यात आणले होते. मात्र चौकशीत काही निष्पन्न न झाल्यामुळे त्याला तब्बल २२ तासांनी सोडून देण्यात आले होते.

- Advertisement -

पोलीस ठाण्यातून आल्यानंतर सचिनला ताप आणि अंगदुखीचा त्रास होत असल्याकारणाने आम्ही त्याला नजीकच्या दवाखान्यात आणले होते. परंतु त्याला अधिक त्रास होऊ लागल्यामुळे आम्ही त्याला सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले होते. त्याच्यावर उपचार सुरु असताना १५ जुलै रोजी सचिनला रक्ताची उलटी झाली. डॉक्टरांनी सचिनला अतिदक्षता विभागात दाखल करून घेतले. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला, असे सचिनचा मोठा भाऊ सुनीलने ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले.

२२ तास पोलिसांनी बेकायदेशीररित्या सचिनला ताब्यात ठेवून त्रास दिला. त्यामुळे सचिनचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याचा मोठा भाऊ सुनील याने केला. तसेच सचिनचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मात्र सचिनच्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण लेप्टोस्पायरोसिस आढळून आले. तसेच त्याच्या शरीरावर मारहाणीच्या कुठल्याही खूणा नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी सचिनच्या कुटुंबियांनी संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारा अर्ज मुंबई पोलीस आयुक्तांकडे केला होता. या प्रकरणाचा तपास मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी एक महिन्यापूर्वी गुन्हे शाखेकडे दिला आहे. जैसवार  कुटुंबीयांनी मुलगा सचिनचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यामुळे तो जे.जे. हॉस्पिटलच्या शवगृहात ठेवण्यात आला आहे.

- Advertisement -

या घटनेला ३महिने उलटले असून सचिनचा मृतदेह जे.जे. रुग्णालयाच्या शवगृहात असून अद्यापही तो ताब्यात घेण्यात आलेला नाही. सचिनच्या कुटुंबियांनी न्यायासाठी कोर्टाचे दरवाजे ठोठावले असून ते न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. जो पर्यंत आम्हला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा जैसवार कुटुंबियांनी घेतला आहे.

पोलिसांनीच टॉर्चर केले 

माझ्या लहान भावाला धारावी पोलिसांनी १२ जुलै रोजी मध्यरात्री मोबाईल चोरीच्या प्रकरणात संशयित म्हणून चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले होते, त्याच्या पाठोपाठ मी सुद्धा पोलीस ठाण्यात आलो होतो. त्याच्याकडे विचारपूस सुरु होती,त्याला टॉर्चर करण्यात येत होते. अखेर चौकशीत काही आढळून आले नसल्यामुळे सचिनला २२ तासांनी सोडण्यात आले.
– सुनील जैसवार,मृत सचिनचा भाऊ 

प्रकरण गुन्हे शाखेकडे

सचिनचा मृतदेह अजूनही जे.जे. रुग्णालयातील शवगृहात नातेवाईकाच्या प्रतीक्षेत असून हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.
– सुरेश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक , धारावी पोलीस ठाण्याचे पोलीस 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -