घरताज्या घडामोडीवृक्षांचे संरक्षण करण्यासाठी पालिकेची विशेष मोहीम, झाडांना जाहिरात फलक, खिळे, केबल्समुक्त करणार

वृक्षांचे संरक्षण करण्यासाठी पालिकेची विशेष मोहीम, झाडांना जाहिरात फलक, खिळे, केबल्समुक्त करणार

Subscribe

मुंबई महापालिकेने १८ ते २३ एप्रिल या दरम्यान मुंबईतील वृक्षांचे संरक्षण, जतन, संवर्धन आणि पर्यावरण जपण्यासाठी ‘वृक्ष संजीवनी मोहिम’ हाती घेतली आहे. या अंतर्गत रस्ते, सार्वजनिक ठिकाणी झाडांभोवतीचे काँक्रिट, झाडांवरील जाहिरात फलक, खिळे, केबल्स हटविण्यात येणार आहे. त्यामुळे झाडांना अधिक चांगला मोकळा श्वास घेता येणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अखत्यारीतील संस्थेने मुंबई शहरातील पर्यावरण व वृक्ष संवर्धन (३० लाख वृक्ष) यांची दखल घेऊन मुंबई शहराला ‘वृक्ष नगरी’ अर्थात ‘Tree City’ चा ‘वर्ष २०२१’ साठीचा बहुमान घोषित केला असल्याची आनंदाची बातमी मुंबई महापालिका प्रशासनातर्फे जनसंपर्क विभागाने मुंबईकरांना नुकतीच दिली आहे.

पर्यावरण साखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या वृक्षांचे संरक्षण, जतन, संवर्धन करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून मुंबईत १८ ते २३ एप्रिल २०२२ या कालावधीत वृक्ष संजीवनी मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्था, सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालये यांचादेखील सहभाग राहणार आहे, अशी माहिती पालिका उद्यान विभागाचे अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.

- Advertisement -

अशी असणार वृक्ष संजीवनी मोहिम

पालिकेच्या वृक्ष संजीवनी मोहिमेत प्रामुख्याने शहर व उपनगरातील रस्त्यांवरील व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या झाडांभोवतीचे काँक्रीट काढणे, झाडांवरील जाहिरात फलक, खिळे, विद्युत तारा, केबल काढणे इत्यादी प्रकारची कामे केली जाणार आहेत. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागामार्फत ही विशेष मोहीम राबविली जाणार आहे. राष्‍ट्रीय हरित लवादाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, झाडांभोवती मोकळी जागा सोडणे अनिवार्य आहे. तसेच झाडांवर जाहिरात फलक, नामफलक, विद्युत तारा आढळल्यास ते काढणे आवश्‍यक आहे.

त्यामुळे उद्यान विभागाच्‍या खातेअंतर्गत कर्मचाऱ्यांकडून १८ ते २३ एप्रिल २०२२ या कालावधीत ही मोहीम राबवली जाईल, अशी माहिती उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. महापालिकेच्या विभाग कार्यालय स्‍तरावरील सहाय्यक अभियंता (परिरक्षण) व दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) यांचाही यामध्ये सहभाग असेल. मुंबईतील स्‍थानिक सामाजिक संस्‍था, पर्यावरण क्षेत्रात कार्यरत अशासकीय संस्‍था, शाळा, महाविद्यालये यांना सहभागी होण्‍यासाठी आवाहन करण्‍यात येईल, जेणेकरून या मोहिमेची व्याप्ती वाढून सामाजिक जनजागृती होईल आणि युवा पिढीमध्ये देखील पर्यावरण रक्षणाचा संदेश पोहोचेल, असे जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा : दोन दिवसांत अनिल परबांची केस दापोली कोर्टात; किरीट सोमय्यांचा पुन्हा इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -