घरपालघरपालघर जिल्ह्यात एक जूनपासून मासेमारीला बंदी

पालघर जिल्ह्यात एक जूनपासून मासेमारीला बंदी

Subscribe

राज्यासह पालघर किनारपट्टी क्षेत्रातील मासेमारी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पावसाळी हंगाम सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर समुद्री मासेमारी क्षेत्रात मासेमारी बंदीचा आदेश मत्स्यव्यवसाय विभागाने काढला आहे. राज्यासह पालघर किनारपट्टी क्षेत्रातील मासेमारी १ जून ते ३१ जुलै या कालावधीत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र रायगड रत्नागिरी जिल्ह्यात या नियमांना बगल दिली जाते व मासेमारी सुरूच असते. आदेश डावलून मासेमारी करणार्‍यांवर कारवाई करावी, अन्यथा या बंदीचा काय उपयोग असेही मच्छीमारांचे म्हणणे आहे. मिरा भाईंदरपासून वसई विरार, पालघर, डहाणू समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात मच्छीमारी होते. एक जूनच्या पार्श्वभूमीवर या भागातील मच्छीमार खोल समुद्रात मच्छीमारीला जात नाहीत. हळूहळू आपल्या बोटी समुद्रकिनारी सुरक्षितस्थळी ठेवतात. हे आदेश पालघर जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टीवरील सर्व मच्छीमार संस्था व त्यांच्या मच्छिमार सदस्यांना तसेच खासगी मच्छीमारांना लागू राहणार आहेत. पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणार्‍या बिगर यांत्रिकी नौकांना आदेश लागू राहणार नाहीत. समुद्रातील मासळीच्या साठ्याचे जतन व्हावे. तसेच मच्छीमारांच्या जीवित व वित्तहानी यांच्या संरक्षणार्थ दरवर्षी पावसाळी हंगामात हे आदेश शासनामार्फत काढण्यात येतात. राज्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हे आदेश मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी काढले आहेत.

माशांचे जतन होण्यासाठी बंदी कालावधी आवश्यक आहे. ठाणे-पालघर जिल्ह्यात हे नियम कटाक्षाने पाळले जातात व मासेमारी बंद ठेवली जाते. मात्र रायगड-रत्नागिरी जिल्ह्यात या नियमांना बगल दिली जाते. मासेमारी सुरूच असते. मत्स्यव्यवसाय विभागाने याकडे दुर्लक्ष करू नये.
– जयकुमार भाय, अध्यक्ष, ठाणे जिल्हा मध्यवर्ती मच्छिमार संघ, पालघर

- Advertisement -

बंदीच्या या काळात मासेमारीसाठी गेलेल्या नौकेचे नुकसान झाल्यास शासनामार्फत नुकसानभरपाई मिळणार नसून यादरम्यान राज्याच्या बारा नॉटिकल समुद्री हद्दीमध्ये कोणीही मासेमारी करताना आढळून आल्यास त्यावर मासेमारी अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे आदेशाद्वारे म्हटले आहे.

पावसाळ्याच्या मासेमारी बंदी कालावधीत समुद्रातील मासळीच्या जिवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बिजनिर्मीती प्रक्रियेला वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. तसेच या कालावधीत खराब, वादळी हवामानामुळे होणारी मच्छीमारांची जिवीत व वित्तहानी मासेमारी बंदीमुळे टाळता येणे शक्य होते. त्यामुळे १२ नोटिकल क्षेत्रात जून ते जुलै दरम्यान मासेमारी बंदी असते. राज्याच्या सागरी हद्द क्षेत्राबाहेर (१२ सागरी मैल) खोल समुद्रात मासेमारीला जाणार्‍या नौकांना केंद्र शासनाच्या सूचना व आदेश लागू राहणार आहेत.

- Advertisement -

हवामान खात्याने दिलेल्या पावसाच्या इशारामुळे व समुद्रात उद्भवणाऱ्या वादळी वार्‍याच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी या काळात मासेमारीला जाऊ नये, असे आवाहन हवामान खात्यासह मत्स्यव्यवसाय विभागाने केले आहे. त्यामुळे सध्या मासेमारीचा अंतिम हंगाम येऊन ठेपला आहे. शक्यतो पुढील आठवड्यापासून ते जुलैपर्यंत मासेमारी बंद राहणार आहे.

हेही वाचा –

राणा दाम्पत्यामुळे ‘त्या’ इमारतीमधील ८ रहिवाशांनाही पालिकेची नोटीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -