घरमहाराष्ट्रमोठी बातमी! राज्यातील ९२ नगरपालिका आणि ४ नगर पंचायतीच्या निवडणुका स्थगित

मोठी बातमी! राज्यातील ९२ नगरपालिका आणि ४ नगर पंचायतीच्या निवडणुका स्थगित

Subscribe

मुंबईः राज्यातील ९२ नगरपालिका आणि ४ नगर पंचायतीच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगानं याची घोषणा केली आहे, १८ ऑगस्ट २०२२ रोजी या निवडणुका होणार होत्या, पण निवडणूक आयोगानं या सर्व नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुका रद्द केल्या आहेत.

राज्यात सध्या ठिकठिकाणी अतिवृष्टी होत असून, नदी–नाल्यांना पूर आल्यामुळे स्थानिकांचा संपर्क तुटला आहे. अशा स्थितीत राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला ९२ नगरपालिका, ४ नगर पंचायती आणि  १५ ग्रामपंचायतींमधील निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलावा, अशी मागणी भाजपने केली होती. यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांची भेट घेऊन पक्षाच्या मागणीचे निवेदन दिले होते. त्यानंतर सद्यस्थिती पाहता निवडणूक आयोगानं या सर्व निवडणुका रद्दच करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय होऊ नयेत, अशी भाजपची भूमिका आहे. निवडणुका पुढे ढकलल्यास हे आरक्षण पुन्हा लागू करण्यास सवड मिळेल, असे  चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. राज्य निवडणूक आयोगाने चार ते पाच दिवसांपूर्वी ९२ नगरपालिका ४ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. त्यानुसार २० जुलै ते १८ ऑगस्ट या कालावधी निवडणूक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. हा सर्व पावसाचा कालावधी आहे. सध्या राज्यात अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना निवडणूक अर्ज दाखल करणे, प्रचार करणे आणि मतदारांनी मतदान करणे अवघड झाले होते. त्यामुळे आयोगाने हा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलावा, अशी विनंती आम्ही राज्य निवडणूक आयुक्तांना केली होती, त्या अनुषंगाने या निवडणुका रद्द केल्याचं सांगितलं जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील इतर मागासवर्ग समाजाच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणाचा पेच कायम असताना राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील ९२ नगरपालिका आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. त्यानुसार नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी येत्या १८ ऑगस्टला मतदान होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ ऑगस्टला मतमोजणी हाती घेऊन निकाल घोषित केला होता. निवडणूक घोषित झाल्याने संबंधित क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मिनी विधानसभा निवडणूक म्हणून ओळखल्या जात असल्याने या निवडणुका सर्व राजकीय पक्षांसाठी महत्त्वाच्या होत्या. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात निवडणुका होणार होत्या. शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी या निवडणुका महत्वाच्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार २० जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक घोषित झाली होती. त्यानंतर २२ जुलै ते २८ जुलै २०२२ या दरम्यान निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होता. उमेदवारी अर्जांची छाननी २९ जुलैला होणार होती. अपील नसेल तेथे ४ ऑगस्टला तर जेथे अपील आहे तेथे ८ ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार होते.

निवडणूक होऊ घातलेल्या नगरपालिका

नाशिक : मनमाड, सिन्नर, येवला, चांदवड, नांदगाव, सटाणा, भगूर
अहमदनगर : कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर , जामखेड, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, राहता, राहुरी
जळगाव : भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, वरणगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, पारोळा, यावल,
धुळे : दोंडाईचा वरवाडे, शिरपूर वरवाडे
नंदुरबार : शहादा
निवडणूक होऊ घातलेली नगरपंचायत
अहमदनगर : नेवासा
Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -