घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसेल्फीसाठी जीव गेला तरी बेहत्तर; पाण्याच्या ठिकाणी स्टंटबाजी सुरूच

सेल्फीसाठी जीव गेला तरी बेहत्तर; पाण्याच्या ठिकाणी स्टंटबाजी सुरूच

Subscribe

नांदूरमधमेश्वर धरणासमोरील पुलावर स्टंटबाजी जोरात

नाशिक : जिल्ह्यात अतिउत्साही पर्यटकांची नांदूरमधमेश्वर धरणावर स्टंटबाजी सुरूच आहे. नांदूरमधमेश्वर धरणासमोरील पुलावर गेल्या कित्येक दिवसांपासून हौशी पर्यटक जीवाची पर्वा न करता स्टंटबाजी करताना दिसून येत आहेत. मात्र, जीव धोक्यात घालून फोटो घेण्याचा मोह त्यांच्या जीवावर बेतू शकतो, याचा विचार करून प्रशासनाने आता तातडीने अशा बेशिस्तांवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून गंगापूर व दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. हेच पाणी पुढे नांदूरमधमेश्वर धरणात जाते. त्यामुळे गोदावरी आणि दारणा नदीचे पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणात आल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. परिणामी येथे पुन्हा पर्यटकांनी गर्दी केल्याचे दिसून येतेय.

- Advertisement -

पुलाला धडकणार्‍या लाटा, प्रचंड वेगाने येणारे पाणी यामुळे धरणावर पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र, ही गर्दी उसळत्या पाण्यात उभे राहून जीवघेणे फोटोसेशन करत असल्याचे प्रकार याठिकाणी सातत्याने सुरू आहेत. याचे काही व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नांदूरमध्यमेश्वर धरणातून प्रचंड वेगात येणारे पाणी समोरच्या पुलावर धडकून लाटा तयार होत आहेत. याचा लाटांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक जीव धोक्यात घालून वाहत्या पाण्यात जात आहेत. अनेक हौशी पर्यटक उसळलेल्या पाण्यात अंघोळ करताना दिसून येत आहेत तर काही पर्यटक उसळलेल्या पाण्याची परवान न करता या पुलावर मुक्त संचार करताना दिसून येत आहेत. यापूर्वीदेखील नांदूरमधमेश्वर धरणावर अशाप्रकारे स्टंटबाजी करतानाचे पर्यटकांचे व्हिडिओ समोर आले होते. प्रशासनाने वेळोवेळी सूचना देऊनदेखील अशाप्रकारे स्टंटबाजी सुरू आहे. अशा पाण्यात आत्मघातकी खेळ करतानाचे हे थरारक दृश्य पाहून कुणी वाहून गेल्यास अथवा जीवितहानी झाल्यास या प्रकारांना जबाबदार कोण असेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हा अट्टहास कशासाठी?

नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढल्याने पाण्याचा विसर्गही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. दारणा-गंगापूर या धरणातील सर्व पाणी नांदूरमध्यमेश्वर बंधार्‍यात एकत्र येत आणि इथून पुढे हेच पाणी जायकवाडीच्या दिशेने जाते. मात्र, नांदूरमधमेश्वरचा विसर्ग झाल्यास पुढील पुलावर पाणी आदळते आणि लाटांसारखे पाणी उसळते. या पाण्यात महाविद्यालयीन तरुण-तरुणी, नागरिक सेल्फी काढण्यासाठी गर्दी करतात. शिवाय फोटोसेशनसाठी लहान मुलांचाही जीव धोक्यात घालतात. तरुणाईकडून मोठ्या प्रमाणावर हुल्लबाजी केली जाते. तसे व्हिडियो आता सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने प्रशासनाने तातडीने यावर अंकुश घालावा, अशी मागणी होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -