घरसंपादकीयओपेडगोंधळलेली शिवसेना, संभ्रमात शिवसैनिक!

गोंधळलेली शिवसेना, संभ्रमात शिवसैनिक!

Subscribe

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी पुकारलेलं बंड हे आत्तापर्यंतचं शिवसेनेतील सर्वात मोठं बंड ठरलं आहे. शिवसेनेचा नैसर्गिक मित्र भाजपच आहे आणि आपण त्यांच्यासोबतच गेलं पाहिजे ही भूमिका एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांनी घेतली आहे. यानंतर घडलेलं सत्तानाट्य सगळ्या देशानं पाहिलं. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. तर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करून त्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनाही स्थान दिलं जाणार आहे. शिवसेनेत आता उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे शिवसेनेत गोंधळ निर्माण झाला असून शिवसैनिक संभ्रमात आहेत.

खणखणणारे मोबाईल, ताटकळणारे पाय आणि मातोश्री…अशीच काहीशी अवस्था २० वर्षांपासून मातोश्रीवर होती. नव्यानेच २००२ साली जानेवारीत शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेसह मार्च २००२ मध्ये पार पडलेल्या १० महापालिकांच्या उमदेवारांचा एकहाती, एकछत्री कारभार उद्धव ठाकरे यांच्या हातात होता. मागील २० वर्षांत तो तसाच राहिला, कारण पक्षात उद्धव यांच्या नेतृत्वाला आव्हान देणारे कुणी शिल्लकच नव्हते. उद्धव यांनी पक्षाची सूत्रे हाती आल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतच परिस्थिती निर्माण करून नारायण राणे, राज ठाकरे यांना पक्ष सोडण्याशिवाय पर्याय ठेवला नाही. त्यामुळे आपल्या नेतृत्वाला आव्हान देणारा कुणी पक्षात राहताच कामा नये असेच चित्र निर्माण केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसोबत अष्टप्रधान मंडळ होते तर उद्धव यांच्यासोबत राज्यसभेवर, विधान परिषदेवर जाणारे प्रधान होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी फार हलक्यात घेतले आणि सध्या त्याचाच परिणाम हा शिवसेनेत दिसत आहे. शिंदे यांच्या ताकदीचा कधी अंदाजच न घेतल्याने पक्षप्रमुखांना त्यांच्या अवती भवती असणारे प्रधान शिंदे यांची ताकद केवळ चार आमदार आणि एक खासदार अशी सांगण्यात धन्यता मानत राहिले, पण वरून शांत असलेला, प्रसंगी अपमानीत झालेला संयमी नेता आतून किती कणखर असतो हे शिंदे यांनी दाखवल्याने मातोश्रीत शिवसेनेत भूकंप झाला. त्या राजकीय भूकंपाचे हादरे आज महिना होत आला तरी शिवसेनेला, मातोश्रीला, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना जाणवत आहेत.

- Advertisement -

शिवसेना पक्षाला मोठे खिंडार

मागील पाच आठवड्यांपासून म्हणजे २० जूनपासून शिवसेनेत अंतर्गत कलह सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. त्यामुळे मूळ शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा? याबाबत शिवसैनिकांसह सामान्य जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या ज्या ४० आमदारांच्या आणि १२ खासदारांच्या जोरावर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत त्यालाही आता चार आठवडे होत आलेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे वारसा हक्काने माझीच शिवसेना खरी जसे वेळोवेळी जो येईल त्याला सांगत आहेत, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्हीच पुढे नेत असल्याचा दावा एकनाथ शिंदेंकडून करण्यात येत असल्याने सामान्य शिवसैनिक विठ्ठला…कोणता झेंडा घेऊ हाती या विवंचनेत आहे. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही बाजूंनी असलेली शिवसेना गोंधळलेली आणि दोन्ही बाजूचे शिवसैनिक संभ्रमात आहेत. याला कारण म्हणजे शिंदे गटापैकी एकाही आमदार, खासदार किंवा नगरसेवकाने आम्ही शिवसेना सोडली, फोडली अशी वक्तव्ये न केल्याने राज्यभरातील शिवसैनिक, महिला शिवसैनिकांमध्ये प्रचंड गोंधळ, संभ्रम निर्माण करण्यात सध्या तरी शिंदे गटाला बर्‍यापैकी यश आले आहे.

- Advertisement -

२००६ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना

यापूर्वीही शिवसेनेत बंड झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत बंडू शिंगरे, छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी बंड केले, पण यापैकी बंडू शिंगरे यांनी प्रतिशिवसेना स्थापन केली, पण त्यांचे नाव काही दिवसांतच राजकारणातून लुप्त झाले, पण भुजबळ, नाईक आणि राणे यांनी दुसर्‍या पक्षात प्रवेश केला. त्यामुळे यापैकी कुणीही शिवसेनेवर अथवा निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर दावा केला नाही. राज ठाकरे यांनीही २००५ साली शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर २००६ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. त्यामुळे त्यांचाही शिवसेनेवर दावा करण्याचा प्रश्न येत नव्हता. आता मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड हे जरा वेगळे आहे. बंड, उठाव अथवा हिंदुत्वासाठी अशी अनेक लेबल लावूनही शिंदे समर्थक ४० आमदार आणि १२ खासदार यांनी दुसर्‍या कोणत्याच पक्षात प्रवेश न केल्याने शिवसेना आणि शिवसैनिकांची गोची झाली आहे. करे तो क्या करे… तोंड दाबून बुक्यांचा मार… अशी विचित्र अवस्था शिवसैनिकांची झाली ही वस्तुस्थिती आहे.

आम्ही अद्याप शिवसेना सोडलेली नाही, त्यामुळे धनुष्यबाण हा आमचाच आहे. धनुष्यबाण कोणाचा आहे? न्यायालयात काय निर्णय होईल? यावरही दोन्ही बाजूंनी दावे प्रतिदावे होताना दिसतात. कोणत्याही ठिकाणी सामान्यत: डोकी मोजली जातात आणि डोक्यांनाच महत्त्व असतं. आम्ही अद्याप शिवसेना पक्ष सोडला नाही. त्यामुळे असा संभ्रम कुणी तयार करत असेल तर तो करू नये. आम्ही पार्टी सोडलेली नाही. आम्ही पार्टीच्या अंतर्गत हा उठाव केलेला आहे, असे शिंदे समर्थक आमदार आणि खासदार पदोपदी सांगतात. पक्ष सोडला असता तर धनुष्यबाण कोणाचा, असे प्रश्न पडले असते, मात्र शिवसेना पक्षाने भाजपशी नैसर्गिक युती करावी, अशी मागणी आम्ही शिवसेना पक्षप्रमुखांकडे केली होती. बहुतांशी आमदारांनी हीच मागणी केली होती, पण ही मागणी न ऐकल्यामुळे आम्हाला हा उठाव करावा लागला. आम्ही शिवसेना पक्ष सोडलेला नाही, त्यामुळे धनुष्यबाण हा आमचाच राहणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही म्हणत आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बॅनर

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर आता शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्ष शिगेला पोहचला आहे. जिथे राजकीय विश्लेषकांना या संघर्षाचा नेमका अर्थ सापडलेला नाही तिथे सर्वसामान्य शिवसैनिकांची तर गोष्टच वेगळी आहे. राज्यात अनेक ठिकाणी शिंदे यांच्या समर्थनार्थ तर काही ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बॅनर लागले आहेत. आजवर प्रत्येक शिवसैनिकासाठी त्याच्या जिल्ह्यातूनच मातोश्री मार्ग असाच प्रवास राहिला आहे. ठाण्यातूनही जिथे एकनाथ शिंंदे यांचा दबदबा आहे तिथल्या शिवसैनिकांच्या मनात गोंधळ उडाला आहे.

काही झालं तरी आम्ही शिवसेनेसोबत असल्याचे शिवसैनिक दबक्या आवाजात बोलत असले तरी ही ताटातूट खरीखुरी नसावी, तर हा एक नियोजित कट असावा आणि पुन्हा सर्व काही सुरळीत व्हावे, अशी अपेक्षा वारंवार शिवसैनिकांकडून केली जात आहे. राजकारणाचे बाळकडू बाळासाहेबांच्या शिवसेनेने दिले, तर राजकारणात पावलोपावली आलेल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी मदत केली, यामुळे कोणाची बाजू घ्यावी हेच कळत नसल्याने कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण आहे. अनेक शिवसैनिकांची या संघर्षात वेट अँड वॉचची भूमिका असून आपण कोणाबरोबर जावे याबाबतची भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.

शिवसेनेतील सर्वात मोठं बंड

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी पुकारलेलं बंड हे आत्तापर्यंतचं शिवसेनेतील सर्वात मोठं बंड ठरलं आहे. शिवसेनेचा नैसर्गिक मित्र भाजपच आहे आणि आपण त्यांच्यासोबतच गेलं पाहिजे ही भूमिका एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांनी घेतली आहे. यानंतर घडलेलं सत्तानाट्य सगळ्या देशानं पाहिलं. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. तर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करून त्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनाही स्थान दिलं जाणार आहे. शिवसेनेत आता उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक कार्यकर्ते शिवसेनेसोबत जोडले गेले. संघर्ष करत सेना वाढवली.

त्यानंतर अनेक कार्यकर्ते निवडणुकीत विजय संपादन करून विधानसभेत गेले, तर काहीजण संसदेत गेले. अशात शिवसेनेत जे दोन गट पडले आहेत त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत हे वास्तव नाकारता येणार नाही. कोणता झेंडा घेऊ हाती या ‘झेंडा’ सिनेमातील गाण्यात दिसणार्‍या कार्यकर्त्यांप्रमाणे राज्यातील शिवसैनिकांची अवस्था झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर आता शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्ष पेटलाय. राज्यात काही ठिकाणी शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लागले आहेत, तर काही ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे समर्थन करण्यात येतंय, मात्र या शिंदे विरुद्ध शिवसेनेच्या संघर्षात शिंदेसेना की शिवसेना, असा सवाल या कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला आहे.

तर दुसरीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे मुलाखतीत ज्या लोकांवर मी विश्वास ठेवला त्यांनी माझ्यासोबत विश्वासघात केलाय, शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याची आवई नेहमी उठवली जाते, परंतु २०१४ साली भाजपनं युती तोडली होती, ते त्यांनी काय सोडलं होतं?, जेव्हा शिवसेना विरोधी पक्षात बसली तेव्हा अनेक लोकांना वाटलं की, शिवसेना संपेल, पण शिवसेना स्वबळावर लढली आणि ६३ आमदार निवडून आणले. ज्याचे आईवडील सुदैवाने जिवंत आहेत, त्यांनी त्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने काम करावे, माझ्या वडिलांना चोरू नये, तुम्ही मर्द नाही, विश्वासघातकी आहात, माझा विश्वासघात तर केला, पण लोकांना धोका देताना बाळासाहेबांबद्दल कशाला संभ्रम निर्माण करत आहात?, तुम्ही मर्द आहात तर मर्दाचा चेहरा घेऊन पुढे जा आणि निवडणुका जिंका, असं आव्हानही उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिले आहे. एकीकडं मी हॉस्पिटलमध्ये असताना माझ्या शरीराची हालचाल बंद पडली होती, तर दुसरीकडे पक्ष फोडण्याची तयारी सुरू झालेली होती. म्हणूनच बंडखोरांनी माझा विश्वासघात केला आहे, असे पक्षप्रमुख ठाकरे ठणकावून वारंवार सांगत आहेत.

‘शिवसेना कोणाची’, या प्रश्नाच्या फैसल्याची सुनावणी १ ऑगस्टपासून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे सुरू होणार असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करून उद्धव ठाकरे यांच्यापुढे एक नवा डाव टाकला आहे. राज्यभरातील शिवसेनेच्या संघटनेवर कब्जा मिळवण्याचे शिंदे गटाचे अहोरात्र प्रयत्न सुरू असून शिंदे गटाने जाहीर केलेल्या या नव्या कार्यकारिणीत ‘अध्यक्ष’ हे पद नाही. नेता वा मुख्य नेता अशी पदे ही केवळ शिवसेनेच्या दरबारात असतात! त्यामुळेच हा सारा ‘बुद्धिबळा’चा डाव केवळ शिवसैनिकांना संभ्रमात टाकण्यासाठीच टाकला जात आहे, ही बाब लपून राहिलेली नाही. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालय शिवसेनेच्या ‘सात बारा’वर आपले नाव टाकण्यासाठी शिंदे गटाने सुरू केलेल्या खेळीसंदर्भात नेमकी काय भूमिका घेणार, याबाबत कमालीचे कुतूहल निर्माण झाले आहे. खरी शिवसेना कोणाची, या प्रश्नापाठोपाठ शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह नेमक्या कोणत्या गटाकडे सुपूर्द करायचे, या प्रश्नाचा निर्णय अखेर केंद्रीय निवडणूक आयोगच करणार आहे.

बंडखोरांना सामील होऊ पाहणार्‍या शिवसेना पदाधिकार्‍यांची हकालपट्टी करणे उद्धव ठाकरे यांनी सुरू केल्यानंतर या गटाने त्या त्या पदाधिकार्‍यांच्या पुनर्नियुक्त्या त्याच पदांवर करण्याचा सपाटा गेले काही दिवस लावला होता. त्यामुळे मूळ शिवसेना आणि हा नवा गट या दोहोंबाबत सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनात भ्रम तयार होणे स्वाभाविक आहे. एकाच वेळी कायदेशीर लढाईही करावयाची आणि त्याच वेळी शिवसैनिकांच्या भावनाही गोंजारण्याचा प्रयत्न करावयाचा, असा हा दुहेरी डाव आहे. शिवसेनेच्या दोन तृतीयांश खासदारांनीही शिंदे गटासोबत जाण्याची भूमिका घेतल्यामुळे संसदीय तसेच वैधानिक पातळीवरील शिवसेनेतील फुटीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाची या याचिकांसंबंधातील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

अर्थात, याविषयी निर्णय काहीही झाला तरी ‘शिवसेना कोणाची?’ या कळीच्या प्रश्नाचे उत्तर तोंडावर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सर्वसामान्य शिवसैनिक आणि सर्वसामान्य मतदारच देणार आहेत, हेही तितकेच खरे. एकूणच राज्यभरातील शिवसेनेत सध्या गोंधळाचेच वातावरण असून शिवसैनिकही संभ्रमात आहेत. त्यामुळे पुढील महिन्याभरात सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोग या दोन्ही न्यायदेवता आणि घटनात्मक संस्थेत शिवसेनेचा निकाल लागेल. त्यामुळे येणार्‍या गणेशोत्सवापूर्वी दोन्हीपैकी एका बाजूने निकाल येईल किंवा दोन्ही गटांना हात चोळत बसावे लागेल, अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे खरी लढाई सुरू होण्यास अजून महिन्याभराचा अवकाश आहे. तोपर्यंत कालचा गोंधळ बरा होता, असेच आपल्याला म्हणावे लागेल.

Sanjay Sawant
Sanjay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanjay/
आपलं महानगरचे संपादक, माय महानगरचे संस्थापक-संपादक. गेली २२ वर्ष पत्रकारितेत. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाचा दांडगा अनुभव. शिवसेना, महापालिका ते मंत्रालय, मुंबई आणि राजकारणावर सातत्याने लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -