घरताज्या घडामोडी'कोस्टल रोड'च्या दुसऱ्या बोगद्याचे १००० मीटरचे खोदकाम पूर्ण

‘कोस्टल रोड’च्या दुसऱ्या बोगद्याचे १००० मीटरचे खोदकाम पूर्ण

Subscribe

या प्रकल्पांतर्गत २ महाबोगदे खणण्यात येत आहे. यासाठी 'मावळा' या अवाढव्य संयंत्राचा नियमितपणे वापर करण्यात येत असून २ बोगद्यांपैकी पहिल्या बोगद्याचे खोदकाम याचवर्षी जानेवारी महिन्यात पूर्ण झाले होते.

‘सुखाचा प्रवास, मोकळा श्वास’ असे घोषवाक्य असणारा आणि मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ व वेगवान करण्यासह प्रदूषण नियंत्रणास हातभार लावणाऱ्या ‘मुंबई सागरी किनारा मार्ग’ या मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने नुकताच एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. (Excavation of 1000 meters of second tunnel of Coastal Road completed)

या प्रकल्पांतर्गत २ महाबोगदे खणण्यात येत आहे. यासाठी ‘मावळा’ या अवाढव्य संयंत्राचा नियमितपणे वापर करण्यात येत असून २ बोगद्यांपैकी पहिल्या बोगद्याचे खोदकाम याचवर्षी जानेवारी महिन्यात पूर्ण झाले होते. तर दुसऱ्या बोगद्याचे तब्बल १ हजार मीटरचे खोदकाम आज २९ जुलै रोजी पूर्ण झाले आहे.

- Advertisement -

‘हे लक्षात घेता बोगद्यांच्या खोदकामाची सहस्रपूर्ती एका वेगळ्या अर्थाने झाली आहे’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्याचबरोबर बोगद्याच्या उभारणीचा महत्त्वाचा भाग असणारे कंकणाकृती कडे हे बोगद्याचे खोदकाम झाल्यानंतर त्यापाठोपाठ लगेचच उभारण्याचे काम देखील वेगात सुरु असून दुसऱ्या बोगद्यात आतापर्यंत ४९५ कंकणाकृती कडे उभारण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे प्रमुख अभियंताचक्रधर कांडलकर यांनी दिली आहे.

सागरी किनारा मार्गाचा महत्त्वाचा भाग असणारे महाबोगदे खणण्याच्या कार्याचा व यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘मावळा’ हे संयंत्र कार्यान्वित करण्याचा शुभारंभ दिनांक ११ जानेवारी, २०२१ रोजी करण्यात आला होता. तेव्हापासून सदर बोगदे खणण्याचे काम अव्याहतपणे सुरु आहे. यानंतर पहिल्या बोगद्याचे खोदकाम हे दिनांक १० जानेवारी रोजी पूर्ण झाले होते. त्यानंतर १ एप्रिल २०२२ पासून दुस-या बोगद्याचे खोदकाम सुरु करण्यात आले.

- Advertisement -

ही बाब लक्षात घेतल्यास केवळ ११९ दिवसात १ हजार मीटरचा टप्पा गाठत या कामाने आज सहस्रपूर्ती केली आहे. या निमित्ताने बोगद्यात काम करणा-या अभियंता व कामगार वर्गाने मावळा या संयंत्राच्या आकाराचा केक कापून हा आनंद साजरा केला.

सागरी किनारा मार्गाबद्दल महत्त्वाची माहिती :

सागरी किनारा मार्गाचा महत्त्वाचा भाग असणारे महाबोगदे खणण्याची सुरुवात प्रियदर्शनी पार्क येथून करण्यात आली आहे. हे बोगदे प्रियदर्शनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) असणाऱ्या स्वराज्य भूमीलगतच्या ‘छोटा चौपाटी’पर्यंत असणार असून ते ‘मलबार हिल’ च्या खालून जाणार आहेत. सदर दोन्ही बोगद्यांसाठीचे खोदकाम हे जमिनीखाली १० मीटर ते ७० मीटर एवढ्या खोलीवर करण्यात येत आहे.

हे बोगदे खणण्यासाठी १२.१९ मीटर व्यास असणारे भव्य असे ‘टनेल बोरिंग मशीन’ वापरण्यात येत असून या संयंत्राचे ‘मावळा’ असे नामकरण करण्यात आले आहे. हे संयंत्र ४ मजली इमारती एवढे उंच असून त्याची लांबी ही तब्बल ८० मीटर एवढी आहे.

‘मावळा’ या संयंत्राची पाती ही प्रत्येक मिनिटाला साधारणपणे २.६ वेळा गोलाकार फिरु शकणारी आहेत (2.6 RPM). ‘मावळा’ या संयंत्राचे प्रत्यक्ष प्रचलन हे संगणकीय पद्धतीने होत आहे. तर ‘मावळा’ या संयंत्राची उर्जा क्षमता ही ७,२८० किलोवॅट एवढी असून प्रकल्प कालावधी दरम्यान दररोज सरासरी ८ मीटर बोगदा खणला ज़ात आहे.

‘मावळा’ या संयंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या ठिकाणी बोगदा खणावयाचा आहे, त्या ठिकाणी प्रथम ‘बेंटोनाईट’ (Bentonite) मिश्रित पाण्याचा अत्यंत वेगवान फवारा मारला जात आहे. त्यानंतर ‘मावळा’ या संयंत्राच्या १२.१९ मीटर व्यास असणाऱ्या चकती प्रकारच्या पात्यांद्वारे बोगदा खणला जात आहे.

बोगदा खणल्यामुळे निघणारी माती, खडी इत्यादी ही आधी फवारलेल्या पाण्यामध्ये एकत्र होऊन खडी व माती मिश्रित पाणी (Slurry) तयार होत असून, हे पाणी ‘मावळा’ या संयंत्राद्वारेच खेचून बाहेर टाकले जात आहे. हे पाणी बाहेर काढण्यासाठी मावळा संयंत्रामध्ये स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था आहे.

दोन्ही बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी २.०७ किलोमीटर एवढी असणार आहे. तसेच खणण्यात येत असलेल्या दोन्ही बोगद्यांचा व्यास हा प्रत्येकी १२.१९ मीटर आहे. या बोगद्यांना वर्तुळाकृती पद्धतीने काँक्रिटचे अस्तर (Concrete Lining) असणार असून ज्यामुळे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बोगद्याचा अंतर्गत व्यास हा प्रत्येकी ११ मीटर इतका असणार आहे.

वरील नुसार दोन्ही बोगदे हे दोन बाजूंच्या वाहतुकीसाठी अर्थात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहतुकीसाठी स्वतंत्रपणे उपयोगात येतील. सुरक्षेची व प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून दोन्ही बोगद्यांना जोडणारे एकंदर ११ छेद बोगदे (Cross Tunnel / Cross Passages) देखील महाबोगद्यांचा भाग असणार आहेत.

दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम हे साधारणपणे या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

मावळा या संयंत्राद्वारे बाहेर टाकण्यात येणा-या पाण्याचा पुनर्वापर करता यावा, यासाठी ‘प्रक्रिया केंद्र’ (Treatment Plant) देखील प्रकल्पाच्या ठिकाणी उभारण्यात आले आहे. तर खोदकामातून निघणारे खडक व खडी याचा उपयोग भराव कामात (Reclamation Work) करण्यात येत आहे.

शामलदास गांधी मार्गावरील उड्डाणपूल (Princess street flyover) ते वरळी या दरम्यान १०.५८ किमी लांबीचा असणारा ‘सागरी किनारा मार्ग’ बांधल्यामुळे प्रवासाच्या वेळेत ७० टक्‍क्‍यांची बचत होण्यासोबतच ३० टक्के इंधन बचत देखील साध्य होणार आहे. यामुळे अर्थातच पर्यावरण पूरकताही साधली जाणार आहे.


हेही वाचा – शिंदे आणि फडणवीस यांचे अखेर ठरले : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -