घरमहाराष्ट्रविरोधी पक्षनेतेपदावरून मविआत धुसफूस

विरोधी पक्षनेतेपदावरून मविआत धुसफूस

Subscribe

अंबादास दानवेंच्या निवडीवेळी विश्वासात न घेतल्याची तक्रार, ही तर अनैसर्गिक आघाडी युती- नाना पटोले

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीवरून आता महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्येच धुसफूस सुरू झाली आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्या नावाची शिफारस करून तशी घोषणा करताना विश्वासात घेतले नाही. अशी तक्रार करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यातील सत्तांतरानंतर महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले आहेत.

विधान परिषदेत शिवसेनेचे १२, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी १० सदस्य आहेत. त्यामुळे संख्याबळाच्या आधारे विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेचा दावा रास्त आहे, परंतु विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेताना आघाडीतील मित्रपक्षांशी चर्चा अपेक्षित होती. ही चर्चा न करता शिवसेनेने परस्पर दानवे यांचे नाव दिल्याने दोन्ही काँग्रेस नाराज आहेत. वास्तविक विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा सभागृहात केली जाते, मात्र दानवे यांच्या नावाची घोषणा अधिवेशन नसताना झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

- Advertisement -

राज्यात सत्तांतर होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले. विधान परिषदेत उपसभापतीपद शिवसेनेकडे आहे. विधिमंडळात काँग्रेसकडे कोणतेही घटनात्मक पद नाही. त्यामुळे काँग्रेसला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद हवे होते, मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी अंबादास दानवे यांच्या नावाची शिफारस केली. ही शिफारस तत्काळ मान्य करून डॉ. गोर्‍हे यांनी दानवे यांच्या नावाला मान्यता दिली. यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून नाराजीला तोंड फोडले. अशी निवड करताना शिवसेनेने चर्चा करायला हवी होती, असे चव्हाण यांनी म्हटले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही चर्चा न करण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदाची निवड करताना महाविकास आघाडी म्हणून चर्चा होणे आवश्यक होते, मात्र तशी चर्चा करण्यात आली नाही. आम्हाला विचारात घेतले गेले नाही. निवड कुणाचीही होवो, पण चर्चा होणे गरजेचे होते. त्यामुळे आमचा या निवडीला विरोध आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही शिवसेनेने विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय घेताना इतर दोन पक्षांशी चर्चा केली असती तर ते अधिक चांगले झाले असते, असे म्हटले आहे. राष्ट्रवादीने विधानसभेत अजित पवार यांच्या नावाचे पत्र देण्याआधी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरातांशी चर्चा केली होती. ज्यांच्याकडे जास्त संख्याबळ आहे त्यांचा विरोधी पक्षनेता होतो अशी पूर्वीपासूनची परंपरा आहे. असे असले तरी विरोधी पक्षनेता नेहमीच इतरांचाही पाठिंबा घेण्याचा प्रयत्न करतो, असेही पाटील यांनी सांगितले.

तुमच्याकडे सत्ता मागायला आलो नव्हतो
आमची ही काही नैसर्गिक आघाडी नाही.आम्ही काही सत्तेत नव्हतो. विरोधी पक्षात बसण्याचा कौल आम्हाला जनतेने दिला होता. त्याप्रमाणे विरोधी पक्षात बसण्याची आमची मानसिकता होती. ही आघाडी विपरित परिस्थितीत महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी त्यावेळी केली. कायमस्वरूपी असा शब्द आम्ही वापरला नाही. नैसर्गक आघाडी असे आम्ही म्हटलेच नाही. त्यामुळे ती तुटू शकते, असे सांगत पटोले यांनी मविआत फुटीचे संकेत दिले आहेत. सोबतच आम्ही तुमच्याकडे सत्ता मागायला आलो नव्हतो, तर तुम्ही आला होता हे लक्षात ठेवा असा टोला देखील पटोले यांनी शिवसेनेला लगावला आहे.

स्थानिक निवडणुका आघाडी एकत्र लढविणार –अजित पवार 

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढविल्या जातील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र निवडणूक लढण्याला मान्यता दिली आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय जिल्हा स्तरावर होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बुधवारी रात्री मातोश्रीवर जाऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत झालेल्या चर्चेची माहिती अजित पवार यांनी गुरुवारी माध्यमांना दिली. या बैठकीत आगामी निवडणुका आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली सुनावणी यावरही चर्चा झाल्याचे पवार म्हणाले.

आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणूक एकत्र लढण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख एकत्र बसून निर्णय घेतील, असे पवार यांनी सांगितले.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत जेथे शक्य आहे तेथे आघाडी करण्याचा प्रयत्न असून याबाबत तिन्ही पक्ष स्थानिक पातळीवर निर्णय घेतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गणेशोत्सवानंतर शिर्डीत राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -