घरदेश-विदेशशांतता इच्छिणारा देश दहशतवादाचा पुरस्कार करीत नाही, भारताचे पाकला सडेतोड उत्तर

शांतता इच्छिणारा देश दहशतवादाचा पुरस्कार करीत नाही, भारताचे पाकला सडेतोड उत्तर

Subscribe

नवी दिल्ली : भारतासह आम्हाला सर्व शेजारील राष्ट्रांबरोबर शांततापूर्ण संबंध हवे आहेत, अशी भूमिका पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांमध्ये मांडली होती. तोच मुद्दा घेत भारताने सडेतोड उत्तर दिले आहे. ज्या देशाला शेजाऱ्यांबरोबर शांततापूर्ण संबंध हवे आहेत, तोच देश दहशतवादाचा पुरस्करा करत आहे, अशी सणसणीत चपराक भारताने पाकिस्तानला लगावली.

भारताने शनिवारी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबंधित करताना पाकिस्तानवर निशाणा साधला. भारतीय मिशनचे पहिले सचिव मिजिटो विनिटो म्हणाले, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी या सभेत भारतावर खोटे आरोप करणे खेदजनक आहे. आपल्या देशात सुरू असलेले गैरप्रकार लपविण्यासाठी पाकिस्तानाच्या पंतप्रधानांनी या व्यासपीठाचा उघडपणे दुरुपयोग केला आहे.

- Advertisement -

सकारात्मक स्थिती राखण्यासाठी भारताने पावले उचलायला हवीत. आपण शेजारी आहोत. शांतता हवी की संघर्ष याचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना मजिटो विनिटो म्हणाले, ज्या देशाला शेजाऱ्यांबरोबर शांततापूर्ण संबंध हवे आहेत, तो देश कधीही सीमेपलिकडील दहशतवादाला खतपाणी घालणार नाही. तसेच मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांना तसेच 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेचा कट रचणाऱ्यांना आश्रय देणार नाही.

- Advertisement -

काश्मीरबाबत शरीफ यांनी केलेले दावे त्यांनी खोडून काढले. भारतावर खोटे आरोप करण्याऐवजी पाकिस्तानने आपले काळे कारनामे उघड करण्याची गरज आहे. जम्मू-काश्मीरवर दावा करण्याऐवजी पाकिस्तानला दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याचे थांबविले पाहिजे, असे सांगून ते म्हणाले, दहशतवाद, शत्रूत्व आणि हिंसा यातून मुक्त वातावरणात भारताला पाकिस्तानसमवेत शेजारी राष्ट्र म्हणून संबंध प्रस्थापित करायचे आहेत.

पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर सतत अत्याचार सुरू आहेत. अल्पसंख्य तरुणींचे अपहरण करून त्यांच्याशी बळजबरीने निकाह केला जातो आणि नंतर धर्मांतर केले जात आहे. जगातील इतर देशांनी याची माहिती घ्यायला हवी. मानवाधिकार, अल्पसंख्यकांचे अधिकार हा तिथे चिंतेचा विषय बनला आहे, अशी टीका त्यांनी केली. असे असतानाही जागतिक व्यासपीठावर तोच देश अल्पसंख्याकांच्या प्रश्नांबाबत बोलत आहे, हे आश्चर्यजनकच आहे, अशी उपहासात्मक टीका मजिटो विनिटो यांनी केली.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -