घरपालघरतारापूर एमआयडीसी पोलीस स्टेशनवर कामाचा वाढता ताण

तारापूर एमआयडीसी पोलीस स्टेशनवर कामाचा वाढता ताण

Subscribe

तारापूर एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत औद्योगिक वसाहत आणि आजुबाजूच्या २९ गावांचा समावेश होतो.

वाणगाव :  देशातील प्रमुख औद्योगिक वसाहत असलेल्या तारापूर आणि लगतच्या बोईसर परिसरातील वाढत्या नागरीकरणामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत असून एकूण लोकसंख्या अंदाजे ३ लाखांच्या पुढे गेली आहे. लोकसंख्या वाढीसोबतच गुन्हेगारीचा आलेख देखील सतत चढत असल्याने त्याचा एमआयडीसी पोलीस स्टेशनवर ताण वाढत असून फक्त ९० अधिकारी आणि पोलीस कर्मचार्‍यांच्या बळावर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. त्यामुळे स्वतंत्र बोईसर पोलीस स्टेशनची मागणी जोर धरू लागली आहे.

तारापूर एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत औद्योगिक वसाहत आणि आजुबाजूच्या २९ गावांचा समावेश होतो. यामध्ये बोईसरसारख्या शहरी भागासोबतच पूर्वेकडील ग्रामीण भाग देखील समाविष्ट असून लोकसंख्या अंदाजे ३ लाखांपेक्षा अधिक आहे. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमध्ये सातत्याने स्फोट, आग, वायुगळती आणि इतर अपघाताच्या घटना घडत असतात. अशावेळी पोलिसांना अग्निशमन दलाच्या सोबत स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करावे लागते. त्याचप्रमाणे वेळोवेळी होणार्‍या कामगार आंदोलनाच्या दरम्यान परीस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांची कसोटी लागते. एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत औद्योगिक वसाहतीसह लगतच्या बोईसर, सरावली, खैरापाडा, कोलवडे, कुंभवली, सालवड, बेटेगाव, मान आणि वारांगडे या मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेल्या ग्रामपंचायतीसह पूर्व भागातील सूर्या नदी अल्याड गावांचा देखील समावेश होतो. त्यामुळे एका बाजूला शहरी भाग तर दुसर्‍या बाजूला दुर्गम डोंगराळ भाग अशा विपरीत परिस्थितीत कायदा-सुव्यवस्था आणि गुन्हेगारी रोखण्याचे काम पोलिसांना करावे लागते.

- Advertisement -

बोईसर परिसराचा सध्या अतिशय वेगाने विकास होत असून लोकसंख्येच्या वाढीसोबत गुन्हेगारीचे प्रमाण देखील सातत्याने वाढत आहे. पुढील दोन-तीन वर्षात बोईसर पूर्वेला बुलेट ट्रेनचे स्टेशन होणार असून यामुळे कायदा-सुव्यवस्था राखण्यसाठी पोलिसांवर अतिरिक्त ताण पडणार आहे. त्यामुळे नवीन पोलीस स्टेशन निर्माण करण्याची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे. सध्याच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये औद्योगिक परिसर, कोलवडे, कुंभवली, सालवड हा परिसर कायम ठेवून नवीन बोईसर पोलीस स्टेशनमध्ये बोईसर, सरावली, खैरापाडा, बेटेगाव, मान, वारांगडे, राणीशिगाव, नेवाळे सहीत रेल्वेच्या पूर्वेकडील सूर्या नदीच्या हद्दीपर्यंत असलेली गावे समाविष्ट केल्यास सध्याच्या पोलीस स्टेशनवरील भार बराचसा हलका होऊन पोलिसांच्या तपास कार्यक्षमतेतदेखील वाढ होऊ शकते. बोईसर एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत बोईसर रेल्वे स्टेशन, चित्रालय, खैरापाडा, कुंभवली आणि बेटेगाव चेक पोस्ट अशा पाच बीट चौक्या असून सर्व मिळून एकूण ९० पदे अस्तित्वात आहेत. यामध्ये एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, पाच पोलीस उपनिरीक्षक व ८३ कर्मचारी यांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -