घरपालघरमहिला मृत्युप्रकरणी अधिकारी, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

महिला मृत्युप्रकरणी अधिकारी, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Subscribe

सर्व गटाराची झाकणे विनाविलंब दुरुस्त करावीत किंवा नवीन बसवण्याचे आदेश देण्यात यावे. जेणेकरून कोणत्याही निष्पाप नागरिकाचा जीव धोक्यात येऊ नये.

वसई : वसई-विरार महापालिकेच्या प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषी महापालिका अधिकारी व ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी केली आहे. वसई-विरार महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे विरार पश्चिम येथे राहणार्‍या ६७ वर्षीय कमला गुलाबचंद शाह नामक वृद्ध महिलेचा उघड्या गटारात पडून मृत्यू झाला. ७ नोव्हेंबर रोजी एडीआर नोंदवून या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. वसई-विरार महापालिका क्षेत्रात पावसात पाणी साचल्याने गेल्या चार ते पाच वर्षांपासून उघड्या गटाराच्या झाकण्यांमुळे निरागस बालकांना गटारात पडून जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे या गंभीर बाबीबाबत बारोट यांनी २८ मे २०२२ रोजी महापालिका आयुक्तांना लेखी पत्राद्वारे विनंती केली होती की अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व विभागातील अभियंत्यांना परिसरातील सर्व गटार झाकणांची तपासणी करून तुटलेल्या अवस्थेत दिसणारी सर्व गटाराची झाकणे विनाविलंब दुरुस्त करावीत किंवा नवीन बसवण्याचे आदेश देण्यात यावे. जेणेकरून कोणत्याही निष्पाप नागरिकाचा जीव धोक्यात येऊ नये.

या गंभीर समस्येबाबत निष्काळजीपणा केल्यास व निष्काळजीपणामुळे कोणत्याही नागरिकाच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास, त्यास सर्वस्वी संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असे बारोट यांनी आपल्या पत्रात स्पष्ट नमूद केले होते.असे असले तरीही अनेक गटारांची गायब झालेली झाकणे आजही महापालिका क्षेत्रात अपघातांना निमंत्रण देत आहेत. या समस्येकडे प्रशासन बेफिकीर दिसत आहे. याचाच परिणाम म्हणून की काय विरार येथील एका महिलेला महापालिका अधिकार्‍यांच्या निष्काळजीपणाची किंमत आपला जीव गमवून चुकवावी लागली आहे. त्यामुळे या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी व चौकशीअंती दोषी महापालिका अधिकारी व कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी बारोट यांनी मीरा- भाईंदर वसई-विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्याकडे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -