घरपालघरपेंडक्याचीवाडी खुणावतेय ! धबधब्याला पर्यटन दर्जा देण्याची मागणी

पेंडक्याचीवाडी खुणावतेय ! धबधब्याला पर्यटन दर्जा देण्याची मागणी

Subscribe

या धबधब्याला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची मागणी करण्यात येत असून याबाबतचा ठराव 28 तारखेला पार पडलेल्या धामणशेत कोशिमशेत ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत सर्वानुमते करण्यात आला आहे.

मोखाडा : मोखाडा तालुका म्हणजे महाराष्ट्र राज्यातील सौंदर्यपूर्ण स्थळांपैकी एक. या तालुक्यातील बारमाही धो धो वाहणारा पेंडक्याच्यावाडीचा हा धबधबा पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. परंतु, दुर्दैवाने सोयीसुविधा अभावी हा धबधबा दुर्लक्षित राहिला असून यासाठी लोकप्रतिनिधी व शासनाने याकडे लक्ष घालून या धबधब्याला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची मागणी करण्यात येत असून याबाबतचा ठराव 28 तारखेला पार पडलेल्या धामणशेत कोशिमशेत ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत सर्वानुमते करण्यात आला आहे.

खोडाळा-मोखाडा मुख्य रस्त्यावर 6 ते 7 किमीवर असलेल्या पेंडक्याचीवाडी परिसरात हा धबधबा विविधतेने नटलेला असून आपल्या सौंदर्याने भुरळ घालणार आहे. परंतु याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक आदिवासी बांधवाकडून याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. धबधब्यावर जाणार्‍या रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या धबधब्याचा परिसर सुशोभीत करायला हवा. या ठिकाणी बारमाही पाणी असल्याने वर्षभर पर्यटक येऊ शकतात. यातून स्थानिक आदिवासींना बांधवांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
300 ते 400 फूट उंचीचा बारमाही वाहणारा धबधबा प्राचीन काळातील गुहा व पाणी अडवण्यासाठी बांधण्यात आलेले बंधारे हे सगळी दृष्य बघून मन भारावून जाते. या ठिकाणी असलेल्या प्राचीन गुहेचा वापर त्याकाळी रहदारीसाठी केला जात असावा. कारण या गुहेचा मार्ग 8 ते 9 किमी अंतरावरील वाशाळा या गावपाड्याशी जोडला गेला असल्याचे येथील जाणकार सांगतात. येथील असलेला उंच धबधबा हा शेकडो फूट खोल जात असून खोलीचा अंदाज अद्यापपर्यंत आला नसल्याचे स्थानिक आदिवासी सांगतात. तसेच प्राचीन काळी या नदीपात्रातील पाणी अडवण्यासाठी प्रयत्न केले गेले असावेत हे अर्धवट स्थितीत बांधण्यात आले असलेल्या बंधार्‍यावरून लक्षात येते. तसेच या बांधाचा अजूनपर्यंत दगड सुद्धा हललेला नाही.

- Advertisement -

पेंडक्याचीवाडी धबधब्याला पर्यटनस्थळाचा दर्जा द्यावा यासाठी ग्रामपंचायतीने 28 तारखेच्या ग्रामसभेत ठराव केला असून याकडे जिल्हा प्रशासनाने जातीने लक्ष घालून आमच्या मागणीला न्याय द्यावा.
– सुरेश धिंडे ,सरपंच
(धामणशेत, कोशिमशेत ग्रामपंचायत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -