घरमहाराष्ट्रविद्यार्थ्यांनो, हसत खेळत परीक्षेला सामोरे जा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विद्यार्थ्यांनो, हसत खेळत परीक्षेला सामोरे जा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

शाळा क्रमांक २३ विषयी आठवणी जाग्या करतानाच आपले वर्गशिक्षक रघुनाथ परब यांची आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली. त्यावेळी शाळेची आतासारखी इमारत नव्हती तर चाळीत ही शाळा भरायची. शाळेची स्वच्छता आम्ही स्वत:च करायचो. त्यात वेगळा आनंद होता, असे सांगत मुख्यमंत्री आठवणीत रमले.

ठाणेः ज्या शाळेतून शिक्षण घेतले तेथूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले. ठाणे येथील किसन नगरमधील महापालिकेच्या शाळा क्रमांक २३ मध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या आठवणी जागवतानाच विद्यार्थ्यांना आणि पालकांना परिक्षेला सामोरे जाताना ताण घेऊन नका. हसत खेळत परीक्षेला सामोरे जा, असा सल्ला दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थांना दिलेले संस्कार त्यांना नक्की उपयुक्त ठरतील. तणावमुक्त, खेळात रमणारा, वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होणारा विद्यार्थी घडावा अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री शिंदे हे ठाणे येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक २३ मधून सहभागी झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे आपल्या शाळेत आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता.

- Advertisement -

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंतप्रधान मोदी यांचे विचार ऐकणारे विद्यार्थी त्यातून नक्कीच प्रेरणा घेतील आणि परिक्षेदरम्यान येणारा तणाव दूर सारून आपल्या क्षमता हेरून आपलं आयुष्य घडवतील. शिक्षण क्षेत्रात राज्य शासनाच्या माध्यमातून सुधारणा केल्या जात आहेत. मात्र विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी, आत्मबल, आत्मविश्वास असला पाहिजे. अपयशामुळे खचून जाऊ नका, यश हमखास मिळतेच असे सांगताना आयुष्यात आलेल्या अपयशानंतर मी खचलो नाही, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले एक्झाम वॉरियर्स हे पुस्तक ठाणे महानगरपालिकेच्या तसेच राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.

- Advertisement -

शाळा क्रमांक २३ विषयी आठवणी जाग्या करतानाच आपले वर्गशिक्षक रघुनाथ परब यांची आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली. त्यावेळी शाळेची आतासारखी इमारत नव्हती तर चाळीत ही शाळा भरायची. शाळेची स्वच्छता आम्ही स्वत:च करायचो. त्यात वेगळा आनंद होता, असे सांगत मुख्यमंत्री आठवणीत रमले.

कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी शाळेची पाहणी केली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील संगणक लॅब, वर्ग खोल्या, तसेच पिण्याच्या पाण्याच्या जागेची पाहणी केली. बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी मुलांशी संवाद साधला.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -