घरठाणेकुत्रा चावल्याने नऊ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

कुत्रा चावल्याने नऊ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Subscribe

घराच्या परिसरात खेळत असताना भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने एका नऊ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शहापूर जवळील गोठेघर येथे घडली. साधारण महिन्याभरापूर्वी कुत्रा चावलेल्या आरोही भागरे या चिमुकलीवर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू होते. आरोहीच्या संपर्कातील नातेवाईकांवर देखील प्रतिबंधात्मक उपचार सुरू केले असून या पार्श्वभूमीवर गोठेघर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
शहापूर जवळील गोठेघर येथील आरोही भागरे ही नऊ वर्षाची चिमुकली घराच्या परिसरात खेळत असताना साधारण एक महिन्यापूर्वी तिला भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असताना दोन दिवसांपूर्वी तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मृत आरोहीच्या संपर्कातील तिच्या आई वडिलांसह दहा जणांवर शहापूर उपजिल्हारुग्णालयात प्रतिबंधात्मक उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर गोठेघर चे माजी सरपंच गणेश कामडी यांनी गोठेघर व परिसरातील कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहापूर पंचायत समितीचा पशुसंवर्धन विभाग व ग्रामपंचायतीकडे केली आहे. या भटक्या कुत्र्यांची परिसरात दहशत पसरली असून लहान मुले, तरुण व वृद्धांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच भटके कुत्रे बाईक च्या मागे धावत असल्याने काही अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत याकडे गणेश कामडी यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -