घरदेश-विदेश...म्हणून राहुल गांधींना 'हीरो' बनवले जातेय, ममता बॅनर्जी यांचा भाजपावर निशाणा

…म्हणून राहुल गांधींना ‘हीरो’ बनवले जातेय, ममता बॅनर्जी यांचा भाजपावर निशाणा

Subscribe

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी इंग्लंडमध्ये मोदी सरकारबाबत केलेल्या वक्त्वयावरून संसदेमध्ये सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसबरोबरच भाजपावरही निशाणा साधला आहे. भाजपाकडून राहुल गांधी यांना ‘हीरो’ बनविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

भारतातील लोकशाही धोक्यात असून सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवणाऱ्यांवर दडपशाही होत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी लंडनमध्ये एका कार्यक्रमात केला. पेगाससद्वारे आपल्यावर आणि विरोधी नेत्यांवर लक्ष ठेवले जात असल्याचा दावाही त्यांनी दुसऱ्या एका कार्यक्रमात केला होता. यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत सत्ताधारी भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांनी परदेशी भूमीवर भारताचा आणि लोकशाहीचा अपमान केला आहे, त्यामुळे त्यांनी माफी मागावी, अशी आग्रही भूमिका भाजपाने घेतली आहे. त्यावरून ममता बॅनर्जी यांनी रविवारी (19 मार्च) काँग्रेसवर हल्लाबोल करतानाच भाजपावर मोठा आरोप केला.

- Advertisement -

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये केलेल्या वक्तव्याचा मुद्दा बनवून भाजपा संसदेच्या कामकाजात वारंवार व्यत्यय आणत आहे. ज्वलंत मुद्द्यांवरून सर्वांचे लक्ष हटवण्यासाठी भाजपा राहुल गांधी यांना ‘हीरो’ बनविण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधी विरोधी पक्षनेते राहिले तर नरेंद्र मोदींना कोणीही टार्गेट करू शकणार नाही, असा आरोप त्यांनी केला.

ममता बॅनर्जी यांनी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील पक्षाच्या अंतर्गत बैठकीत पक्ष कार्यकर्त्यांना फोनवरून संबोधित केले. भाजपशी लढण्यात काँग्रेस अपयशी ठरली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला काँग्रेसची मूक सहमती आहे. यातूनच सर्व काही स्पष्ट होते, असे ममता बॅनर्जी यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

आमच्या पक्षाध्यक्षांनी फोनवर आमच्या अंतर्गत बैठकीला संबोधित करताना सांगितले की, भाजपा जाणीवपूर्वक राहुल गांधींना ‘हीरो’ बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यांच्या टिप्पणीवरून सभागृहातील कामकाजात अडथळा आणत आहे, असे तृणमूल काँग्रेसचे मुर्शिदाबाद जिल्हा प्रमुख आणि खासदार अबू ताहिर म्हणाले.

इतर विरोधी पक्षांनी सर्वसामान्यांशी संबंधित प्रश्न उपस्थित करू नये, यासाठी भाजपा हे करीत आहे. त्यांना राहुल गांधींना विरोधी गटाचा ‘हीरो’ बनवायचा आहे, असे सांगून ताहिर म्हणाले. मुर्शिदाबाद जिल्ह्याची अंतर्गत बैठक रविवारी संध्याकाळी बहरामपूर पक्ष कार्यालयात झाली. त्यात ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याबद्दल टिप्पणी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -