घरफिचर्ससारांशतैवान आणि चीन : संघर्ष की, नवे जागतिक युद्ध?

तैवान आणि चीन : संघर्ष की, नवे जागतिक युद्ध?

Subscribe

चीन आणि तैवान या दोन्ही राष्ट्रांतील संघर्ष हा सर्वच राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय संबंध, व्यापार, आर्थिक, भौगोलिक आणि संरक्षणदृष्ठ्या परिणाम करणारा आहे. त्यामुळे या संघर्षात चीन, तैवान आणि अमेरिका यांच्याबरोबर अनेक राष्ट्र सहभागी झालेले आपणास दिसतील. म्हणूनच हा संघर्ष पुढील काही दिवसांत अधिक चिघळल्यास एका नवीन जागतिक युद्धाची सुरवात होईल. हे मात्र निश्चित...

— भूषण रविकांत खापणे

आशिया खंडातील तैवान आणि चीन या दोन राष्ट्रांमधील संघर्ष सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे, कारण शनिवारपासून चीनच्या लष्कराने तैवानच्या चारही बाजूने आपल्या लष्कराचे संचलन सुरू केले आहे. तैवान हे चीनच्या पूर्व बाजूस प्रशांत महासागरात स्थित असलेले एक लहान राष्ट्र आहे. तैवान स्वतंत्र राष्ट्र असेल तरीही चीन मात्र अद्यापही तैवान हा चीनचा भाग असल्याचा वारंवार दावा करतो. दोन्ही राष्ट्रांच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केल्यास चीन हा तैवानपेक्षा अधिक बलाढ्य आहे, परंतु तरी देखील तैवानने आंतरराष्ट्रीय स्तरावर विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात स्वतःची एक वेगळी उंची गाठली आहे. त्याचबरोबर तैवानने अमेरिका या महासत्तेच्या नेहमी आशयाखाली आपलं अस्तित्व बाधित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तैवान आणि अमेरिका यांच्यातील मैत्री हीच तैवान – चीन यांच्या वादातील प्रमुख कारण असते.

- Advertisement -

आताही काही दिवसांपूर्वी तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साय इंग-वेन या १० दिवसीय अमेरिका दौर्‍यावर होत्या. या दौर्‍यात त्यांनी अमेरिका संसदेचे अध्यक्ष केविन मॅकार्थी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान तैवान – अमेरिका यांच्यात परराष्ट्रीय संबंध, आर्थिक, सामरिक व संरक्षण या प्रमुख मुद्द्यांंवर चर्चा झाली. याच कारणामुळे चीन पीपल्स लिब्रेशन आर्मीच्या पूर्व कमांड वरून शनिवारी अचानक घोषित करण्यात आले की, तैवान भौवती तीन दिवसीय चीन लष्कराचे संचलन म्हणजे युद्ध सराव करण्यात येईल.

याआधीही चीनने आपल्या पूर्व बाजूला लष्कराचे संचलन किंवा युद्ध सराव केला होता हा सराव तैवान – चीन यांच्यातील सागरी सीमा रेषा म्हणजे तैवान स्ट्रेट मिडन लाईनच्या अलीकडे असायचा, परंतु या यावेळेस चीनने ही रेषा ओलांडून आपले लष्करी संचलन सुरू केले. विशेष म्हणजे संचलनात चीनच्या लष्करामार्फत जवळपास ७० फायटर जेटस्, ९ वॉर शिप्स तसेच मिसाईल, नेवल डिस्ट्रोयर, बॉम्बर्स, जामर्स इ. सर्व रसद म्हणजे सागरी क्षेत्रात एखाद्या जागतिक युद्धाच्या सुरवातीस लागणारी तयारी चीनमार्फत करण्यात आलेली आहे. तसेच हे संचलन तैवानच्या चारही बाजूने केले जाईल, असे चीनकडून स्पष्ट करण्यात आले आहे. चीनच्या या कृत्याचा विचार करता आणि रशिया – युक्रेन यांच्यातील युद्धाचा दाखला घेता तैवानवर कधीही चीनचे लष्कर आक्रमण करून एका युद्धाची सुरवात करू शकते.

- Advertisement -

चीनसाठी तैवान अनेक कारणांसाठी महत्वाचा आहे. ‘सेमी-कंडक्टर’ उत्पादनात तैवान अग्रेसर आहे. अमेरिकेस तैवानमार्फत सर्वात जास्त ‘सेमी-कंडक्टर’ ची निर्यात केली जाते. ही निर्यात बंद झाल्यास त्याचा परिमाण हा अमेरिकेच्या तंत्रज्ञान व अर्थ व्यवस्थेवर आणि एकूणच विकासावर होईल. दक्षिण कोरिया, जपान आणि फिलीपाईन्स या राष्ट्रांना तैवानमार्फत तेल पुरवठा केला जातो. हिंद महासागर व प्रशांत महासागरातून जाणारे आंतरराष्ट्रीय जहाज तैवानचा सागरी भागातून जातात. यांसारख्या अनेक कारणांच्या आधारे चीन आपल्या विस्तारवादी धोरणांतर्गत तैवानवर आपली सत्ता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच तैवान हे एकमात्र राष्ट्र आहे जिथे अमेरिका काँग्रेसने एक कायदा मंजूर केला आहे की, जर तैवान अडचणीत असेल तर अमेरिका तैवानच्या मदतीस धावून येईल.

त्यामुळे तैवान आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीपूर्वक घटनांवर चीनमार्फत नेहमी युद्धजन्य परिस्थिती निर्माण करून तैवानवर आपली विस्तारवादी दहशत माजविण्यात येतो, परंतु चीन आणि तैवान यांच्या वादात अमेरिका नेहमी तैवानसाठी युद्ध करण्यास तयारी दर्शविते. आताही चीन लष्कराच्या संचलनास प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने आपण तैवानकरिता युद्धासाठी तयार असल्याचे घोषित केले आहे. त्याचबरोबर तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने ही स्पष्ट केले आहे की, आम्हाला शांतता हवी असून चीन आणि आमच्यात काही वाद असतील ते शांततेच्या मार्गानेच बसून सोडविण्यात यावे आणि वेळ आल्यास आमच्या राष्ट्राचे लष्कर राष्ट्राचे स्वतंत्र टिकविण्यासाठी किंवा परकीय आक्रमण रोखण्यासाठी सज्ज आहे.

हा संघर्ष चीन आणि तैवान यांच्यातील असला तरीही यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या अमेरिकेचा सहभाग यात आहे, परंतु मागील काही कालावधीत ऐनवेळेस युद्धजन्य परिस्थितीतून अमेरिकने अफगाणिस्तान आणि युक्रेनमधून काढलेला पळ हा जगजाहीर आहे. त्यामुळे या घटनांमधून धडा घेत तैवान येत्या काळात अमेरिकेसोबत कश्या प्रकारे मैत्री सांभाळतो, स्वबळावर चीनचा सामना करतो किंवा इतर कोणत्या नव्या राष्ट्राची मदत घेऊन चीनच्या विस्तारवादी धोरणांस शह देतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. चीन आणि तैवान या दोन्ही राष्ट्रांतील संघर्ष हा सर्वच राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय संबंध, व्यापार, आर्थिक, भौगोलिक आणि संरक्षणदृष्ठ्या परिणाम करणारा आहे. त्यामुळे या संघर्षात चीन, तैवान आणि अमेरिका यांच्याबरोबर अनेक राष्ट्र सहभागी झालेले आपणास दिसतील. म्हणूनच हा संघर्ष पुढील काही दिवसांत अधिक चिघळल्यास एका नवीन जागतिक युद्धाची सुरवात होईल. हे मात्र निश्चित…

–संरक्षणशास्त्र व सामरिकशास्त्र अभ्यासक, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -