घरनवी मुंबईमहाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील मृतांचा आकडा १२ वर

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील मृतांचा आकडा १२ वर

Subscribe

खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे मृत पावलेल्यांचा आकडा १२ वर जाऊन पोहचला असून, अद्याप उपचार घेत असलेल्या काहींची प्रकृती अत्यवस्थ असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असताना दुसरीकडे दुर्घटनेबाबत वेगवेगळी माहिती समोर येत आहे.

पनवेल: दीपक घरत
खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे मृत पावलेल्यांचा आकडा १२ वर जाऊन पोहचला असून, अद्याप उपचार घेत असलेल्या काहींची प्रकृती अत्यवस्थ असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या असताना दुसरीकडे दुर्घटनेबाबत वेगवेगळी माहिती समोर येत आहे.
ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य शासनाच्यावतीने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार रविवारी प्रदान करण्यात आला. त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली. परिणामी शासनावर चौफेर टीकेची झोड उठली असून, मृत्यूमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या संतप्त नातेवाईकांकडून प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजीची भावना व्यक्त होत आहे. प्रशासनाने योग्य ती कार्यवाही न केल्यानेच इतक्या मोठ्या संख्येने श्री सदस्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. कार्यक्रमात उन्हाच्या तडाख्यामुळे १२ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती शासनाच्यावतीने देण्यात आली आहे. घटनेप्रसंगी उपस्थित श्री सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार धक्कादायक वास्तव समोर येत आहे. पुरस्कार सोहळा पार पडल्यानंतर श्री सदस्यांनी एकाच वेळी एकाच मार्गावरून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्याने झालेल्या ढकलाढकलीत काहींचा मृत्यू झाल्याची माहिती उपस्थितांनी दिली आहे.
डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यासाठी खारघरमधील ज्या मैदानात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याच मैदानावर २००८ मध्येसुद्धा आप्पासाहेबांचे वडील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यात आला होता. मात्र त्यावेळी उपस्थित श्री सदस्यांसाठी अवघ्या पंधरा मिनिटांवर सार्वजनिक शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. रविवारी देखील कार्यक्रमस्थळी महिला आणि पुरुषांसाठी प्रत्येकी चार हजार शौचालयांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र या शौचालयापर्यंत पोहचण्यासाठी जवळपास पाऊण तासाचा वेळ लागत असल्याने अनेक श्री सदस्यांनी पाणी पिणे आणि खाणे टाळल्याने डीहायड्रेशनच्या त्रासाने अनेकांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वैद्यकीय जाणकरांनी व्यक्त केली आहे.
कार्यक्रमात उपस्थित राहणार्‍या व्हीव्हीआयपी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी दोन ठिकाणी वातानुकूलित तंबूंची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी उपस्थितांना आयोजकांकडून बाटलीबंद पाणी आणि सामोसे, ढोकळा, तसेच मूग वडे असलेल्या अल्पोहाराची पाकिटे पुरविण्याचे काम स्वयंसेवकांकरवी करण्यात येत होते. मात्र त्याचवेळी सामान्य श्री सदस्यांना ग्लुकोजची बिस्कीटं देण्यात येत होती. कार्यक्रमाला लाखो संख्येने श्री सदस्य उपस्थित राहतील ही शक्यता लक्षात घेत तीनशे डॉक्टर उपस्थित असावेत अशी मागणी श्री सदस्यांनी प्रशासनाकडे केली होती. मात्र दुर्घटना घडल्यानंतर रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टर उपस्थित नसल्याची माहिती उपस्थित श्री सदस्यांनी दिली आहे.
लाखो श्री सदस्य कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची प्रशासनाला कल्पना असल्याने कार्यक्रम स्थळी करण्यात आलेल्या बैठक व्यवस्थेभोवती रुग्णवाहिका आणि पाण्याचे टँकर पोहचण्यासाठी प्रशासनकडून जवळपास १२ मीटर रूंदीचे रस्ते तयार करण्यात आले होते. पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी पुढाकार घेत सुरवातीला अरूंद असलेल्या या रस्त्यांचे रूंदीकरण करून घेतल्याची माहिती श्री सदस्यांनी दिली. मैदानावर उपस्थित राहण्यासाठी कार्यक्रमाच्या दोन दिवस अगोदरपासूनच देशभरातून श्री सदस्य पोहचत होते. आलेल्यांसाठी मैदानात जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र जेवण करण्यासाठी गेलेले श्री सदस्य आपल्यासोबतच नव्याने मैदानात दाखल होणार्‍या सदस्यांना देखील स्वतः बसलेल्या जागेवर घेऊन येत असल्याने कार्यक्रम स्थळी उपस्थित बाऊंसरनी नव्याने येणार्‍या श्री सदस्यांना रोखल्याने आदल्या दिवशीच गोंधळ झाल्याची माहिती उपस्थितांनी दिली आहे.
कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या मुख्य सभा मंडपामागे कार्यक्रमाचे आयोजक, सिडको अधिकारी, पालिका अधिकारी, तसेच कार्यक्रमात सामील श्री सदस्यांच्या बैठकीसाठी दोन ठिकाणी वातानुकूलित तंबू उभारण्यात आले होते. उष्माघातामुळे अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना उपचारासाठी सुरुवातीला या ठिकाणी आणण्यात आले. मात्र या ठिकाणी दाखल रुग्णांवर योग्य उपचार न झाल्याने त्यांना जवळच्या टाटा मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु हे रुग्णालय कर्करोगावर उपचारासाठी प्रसिद्ध आहे. कार्यक्रमस्थळी उष्माघाताचा फटका बसलेल्या रुग्णांना टाटा रुग्णालयात उपचारासाठी नेणे ही प्रशासनाची चूक असल्याचे मत श्री सदस्य व्यक्त करीत आहेत.
कार्यक्रमानंतर विविध रुग्णालयांत श्री सदस्य उपचारासाठी दाखल आहेत. कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात देखील १७ रुग्णांवर उपचार सुरू असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मनसेचे नेते राज ठाकरे यांनी एमजीएम रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेतली. राज्य सरकारकडून ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारसाठी २ एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली होती. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा मात्र जाहीर कार्यक्रमात हा पुरस्कार स्वीकारण्यास विरोध होता. परंतु मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या हट्टामुळेच रविवारचा हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे वक्तव्य श्री सदस्यांनी केले आहे.

राजकीय स्वार्थासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घरी जाऊन त्यांना हा पुरस्कार देता आला असता किंवा राजभवनातही कार्यक्रम होऊ शकला असता. कडाक्याच्या ऊन्हात हा कार्यक्रम घेणे चुकीचे आहे. कार्यक्रमानंतर घडलेला प्रकार दुर्दैवी आहे.
-राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

- Advertisement -

अमित शहा यांच्या ऐवजी राज्यपालांच्या हस्ते हा पुरस्कार का देण्यात आला नाही? महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानंतर घडलेला प्रकार शासनाची शोभा घालविणारा असून, या प्रकरणी सांस्कृतिक विभागाच्या अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून या विभागाच्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
-अंबादास दानवे, विरोधी पक्षनेता, विधान परिषद

राजकारण नको
महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेले सारे श्री सदस्य हे माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत. श्री सदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे. माझ्या कुटुंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे. आपल्याच कुटुंबातील लोकांवर घाला येण्याच्या घटनेने मी व्यथित आहे. माझे हे दुःख शब्दात व्यक्त करण्यापलीकडचे आहे. मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटुंबियांची आणि माझी वेदना सारखीच आहे. श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे. त्यानुसार आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम आहोत. यातील मृतांना सद्गती लाभो, तसेच त्यांच्या कुटुंबाला हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. झाला प्रकार दुर्दैवीच होता. त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे.
-डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -