घरफिचर्ससारांशकाँग्रेसला सावरकर समजले नाहीत !

काँग्रेसला सावरकर समजले नाहीत !

Subscribe

देशप्रेमासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर हे कोणतेही कष्ट उपसायला तयार होते, परंतु काँग्रेसला सावरकर समजलेच नाहीत. स्वातंत्र्यदिन सोहोळ्याच्यावेळी हाकेच्या अंतरावर असतानाही त्यांना बोलाविण्याचे सौजन्य काँग्रेसने दाखविले नाही. सावरकर यांच्या निधनानंतर भारत सरकारच्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री त्यांच्या अंत्यसंस्कारास उपस्थित नव्हता यावरूनच काँग्रेसने त्यांना शत्रू मानून त्यांची किती अवहेलना केली होती हे कळते, परंतु सावरकर हे बावनकशी सोने होते हे लपून राहिलेले नाही. इतिहासाचा काहीही अभ्यास नसताना राहुल गांधी यांच्यासारखे लोक जेव्हा सावरकरांवर टीका करत आहेत, यातून त्यांच्या अकलेची दिवाळखोरी दिसत आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आहे. त्यांनी देशासाठी जो त्याग केला, त्यासाठी त्यांना शतकोटी प्रणाम.

–लक्ष्मण सावजी

देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे बावनकशी सोनं होते. ते थोर विज्ञाननिष्ठ, समाजसुधारक आणि साहित्यिकही होते. इंग्रजांना त्यांनी सळो की पळो करून सोडले होते. त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली. तुरुंगात त्यांचे प्रंचड हाल झाले. परंतु ते डगमगले नाहीत. त्यांचे जीवनचरित्र सर्वांसाठी प्रेरणादायी असेच आहे. मात्र काँग्रेसने त्यांना शत्रू मानून त्यांची सतत अवहेलना केली हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

- Advertisement -

स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक यांचा १०० वर्षांपूर्वीचा तो काळ. त्या काळात स्वातंत्र्यप्रेमाने ओतप्रोत भरलेले मन म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. शत्रूसमोर आक्रमकच रहायला हवे हा त्यांचा त्या काळातील दृष्टिकोन म्हणजे मरणाला घाबरायचे नाही हेच त्यांना कदाचित दर्शवायचे असेल. ब्रिटिशांनी त्यांचा फार मोठा धसका घेतला होता. कोणताही पुरावा नसताना सावरकरांना दोन जन्मठेपेची म्हणजेच ५० वर्षं तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. कोणत्याही भारतीय स्वातंत्र्य सैनिकाला ठोठावलेली ही सर्वाधिक शिक्षा होती. नेहरू आणि गांधींनाही इतकी मोठी शिक्षा कधी झाली नाही हे लक्षात घेतले पाहिजे. अंदमान बेटावर सावरकरांना ही शिक्षा भोगावयाची होती. या बेटावर होणारी शिक्षा म्हणजे काळ्यापाण्याची शिक्षा असे त्याकाळी समजले जात असे.

ही शिक्षा भोगणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांना कठीण परिश्रम करावे लागायचे. त्यांना बैलाप्रमाणे जुंपून मोहरी व नारळाचे तेल काढून घेतले जायचे. काम करताना थांबल्यास चाबकाचे फटके त्यांना मारले जायचे.आपल्यानंतर कुटुंबाचे काय होईल याचा कोणताही विचार न करता केवळ देश स्वतंत्र करायचा हा विचार मनात बाळगणे म्हणजे किती त्याग. याची सर कुणालाच येणार नाही. त्यांना अटक झाल्यानंतर समुद्रमार्गे बोटीतून नेण्यात येत असताना त्यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता समुद्रात मारलेली उडी हे तर शौर्याचे प्रतिकच म्हणावे लागेल. रामासाठी हनुमानाने केलेले समुद्रलंघन आणि स्वातंत्र्यासाठी सावरकरांनी समुद्रात मारलेली उडी याची तुलना होते तेव्हा सावरकरांच्या या धाडसाची चर्चा तर होणारच. नंतर त्यांना पकडण्यात आले.

- Advertisement -

अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये त्यांनी ११ वर्षे काढली. ५० वर्षांची शिक्षा सुनावली त्यावेळी इतका काळ तुम्ही आमच्यावर राज्य करणार काय? असे त्यांनी ब्रिटिश सरकारला ठणकावून विचारले होते. यावरूनच ते किती धाडसी होते याची साक्ष पटते. याकाळात पत्नीशी त्यांचा झालेला प्रत्यक्ष संवाद आणि कुटुंबीयांशी झालेला पत्रव्यवहार यावरून त्यांनी तुरुंगात किती हालअपेष्टा सोसल्या याचे वर्णन ऐकले तरी अंगावर शहारे येतात. त्यांचे बंधूही याच तुरुंगात आहेत हे त्यांना फार उशिरा समजले. हा किती मोठा दैवदुर्विलास. पुढच्या पिढीच्या मनात हे विचार येणारच आहेत. त्यानंतर कोण भामटे आणि कोण सोज्वळ हे सर्वाना आपोआपच कळेलच.

अंदमान तुरुंगात देशभक्त कैद्यांना सावरकरांनी साक्षर केले. पुढे भारतीय जनतेच्या दबावामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अंदमानच्या कारागृहामधून सशर्त सुटका झाली. रत्नागिरी येथे त्यांना नजरकैदेत ठेवले गेले. कोणतेही राजकीय कार्य करावयाचे नाही. अशी अट सरकारने त्यांना घातली. सावरकर तुरुंगातील छळामुळे थकले होते. याठिकाणी त्यांना आराम भेटणार असे वाटत असले तरी ते स्वस्थ बसणारे व्यक्तिमत्व नव्हते. रत्नागिरीत असताना सावरकरांनी जनसामान्यांमध्ये असलेल्या अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता याविरुद्ध बंड पुकारले. भारतामध्ये असलेल्या तत्कालीन हिंदू धर्मामध्ये अनेक चालीरीती आणि परंपरा होत्या. त्या देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीमध्ये बाधक ठरत होत्या. स्वातंत्र्यवीरांनी विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून चुकीच्या परंपरा चालीरीती, अंधश्रद्धा, अस्पृश्यता यांची चिकित्सा करून समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्यासाठी आवाहन केले. धार्मिक बाबींना वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे पहिलेच द्रष्टे समाजसुधारक आणि विचारवंत होते.

सावरकरांची बुद्धीमताही प्रगल्भ होती. कविमनाच्या या क्रांतिकारक नेतृत्वाने मराठी भाषेला ललामभूत ठरतील असे महान ग्रंथ दिले आहेत.अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर, सहा सोनेरी पाने, काळे पाणी, माझी जन्मठेप, जात्युच्छेदक निबंध, संन्यस्त खड्ग, कमला, हिंदुपदपादशाही अशी एकापेक्षा एक सरस पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.ती सर्व देशभक्तीने प्रेरित होऊन लिहिली गेली आहेत. प्रत्येक भारतीयाने आवर्जून वाचावीत अशी ही प्रेरणादायी पुस्तके आहेत. ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, हे सावरकरांनी लिहिलेले एक अजरामर असे आर्त भावगीत आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यसमर या ग्रंथामधून भारतीयांचा इंग्रजांविरुद्ध झालेला हा संघर्ष म्हणजे एखादे बंड नसून तो स्वातंत्र्याचा लढा होता हे दाखवून दिले आहे. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये असताना खिळे आणि दगडाच्या टोकाने ते भिंतीवर लिहायचे.

तेथील लोक ते पुसून टाकायचे तेव्हा पुन्हा आठवून ते लिहिणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हती.ते किती प्रगल्भ बुद्धिमतेचे होते हेच त्यावरून सिद्ध होते.मात्र काही बिनडोक लोकांनी याची टिंगलटवाळी केली. उपहासात्मकदृष्टीने त्याकडे बघितले. स्वातंत्र्य चळवळीच्या काळातील सावरकरांच्या शौर्याचे चीज झाले नाही असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते, पण आता त्यांच्या विचारांचा, साहित्याचा प्रचार आणि प्रसार होत आहे हे शुभ संकेतच म्हणावे लागतील. स्वरसाम्राज्ञी लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी सावरकरांच्या स्वरबद्ध केलेल्या काही कविता, अटलबिहारी वाजपेयी, पु.लं.देशपांडे यांच्यासह अनेकांनी त्यांच्या साहित्याचा केलेला अभ्यास. तात्यासाहेब शिरवाडकर यांनी सावरकरांची तुलना ग्रीक पुराणातील सहसवीर प्रॉमिथियस यांच्याशी केली आहे.

आपल्या साहसाची किंमत सावरकर आणि प्रॉमिथियस या दोघांनाही हालअपेष्टा भोगून चुकवावी लागली हे त्यातून प्रतीत होते. यावरूनच देशप्रेमासाठी सावरकर हे कोणतेही कष्ट उपसायला तयार होते हे सिद्ध होते, परंतु काँग्रेसला सावरकर समजलेच नाहीत. स्वातंत्र्यदिन सोहोळ्याच्यावेळी हाकेच्या अंतरावर असतानाही त्यांना बोलाविण्याचे सौजन्य काँग्रेसने दाखविले नाही. सावरकर यांच्या निधनानंतर भारत सरकारच्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री त्यांच्या अंत्यसंस्कारास उपस्थित नव्हता यावरूनच काँग्रेसने त्यांना शत्रू मानून त्यांची किती अवहेलना केली होती हे कळते, परंतु सावरकर हे बावनकशी सोने होते हे लपून राहिलेले नाही.

आज देशात सावरकरांचे विचार असलेले सरकार आहे. आणि ते त्यांचे विचार जगापुढे आणण्याचा प्रयत्न करीत आहेत ही स्वागतार्ह बाब म्हणावी लागेल. इतिहासाचा काहीही अभ्यास नसताना राहुल गांधी यांच्यासारखे लोक जेव्हा सावरकरांवर टीका करतात तेव्हा त्यांच्या अकलेची दिवाळखोरी झालेली सगळ्यांना दिसते. त्यांची कीव कराविशी वाटते. राहुल यांना पढविणारे लोक कोण आहेत हे लपून राहिलेले नाही आणि या सर्वांना त्यांच्या कर्माची फळे आज ना उद्या भोगावीच लागतील यात शंका नाही. सावरकर हा वाचण्याचा किंवा अभ्यासाचा नव्हे तर जगण्याचा विचार आहे. युवा पिढीने त्यांच्या जीवनचरित्रापासून प्रेरणा घेऊन त्यांचे विचार पुढे नेण्याची गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -