घरफिचर्ससारांशविटाळ नव्हे, हा तर उत्सव..!

विटाळ नव्हे, हा तर उत्सव..!

Subscribe

केवळ गुवाहाटी येथेच नव्हे, तर आंध्र प्रदेश येथील देवीपूर, केरळमधील पार्वती देवीच्या मंदिरातही मासिक पाळीचा उत्सव साजरा केला जातो. जर देवीच्या ‘मासिक पाळीचा’ उत्सव साजरा केला जातो तर स्त्रियांनीही मासिक पाळी अशुभ न मानता उत्सव साजरा करणेच योग्य आहे आणि हेच मी महिलांच्या मनावर बिंबवू ईच्छीतो. हीच खरी आपली परंपरा आहे आणि शहरातील महिलांनी हे आपल्या मनात रुजवले पाहिजे. स्त्रीच्या स्पर्शाने विटाळणारा देव गाईच्या मूत्राने कसा काय शुद्ध होतो? गाईला गोमाता म्हणजे मातेचा दर्जा दिला जात असेल तर मग मानवी मातेला सापत्न वागणूक कशासाठी दिली जाते, याचा विचार समाजाने करण्याची गरज आहे.

–आकाश महालपूरे

अनेकांना प्रश्न पडेल की किती वेळा हे मासिक पाळीचे तुणतुणे वाजवायचे? पण खरं सांगतो, आजही मासिक पाळी, त्यातून उद्भवलेले समज, गैरसमज कायम आहेत आणि विशेष म्हणजे शहरी भागातील सुशिक्षित स्त्रियांमध्ये आजही मासिक पाळीचे नियम पाळण्याचा जो अट्टहास दिसतो किंवा अट्टहास म्हणण्यापेक्षा परंपरांचा विळखा दिसतो तो चकित करणारा आहे. शहरी भागातील स्त्रियांच्या मानसिकतेत बदल करणे हे फारच कठीण आहे. मासिक पाळीबाबत आजही स्त्रियांमध्ये अनेक गैरसमज आहेत. अर्थात हा त्यांचा दोष नसून पूर्वापार ज्या चालीरीती चालत आल्या आहेत त्यांचा पगडा आहे. त्यातून बाहेर येणे त्यांना आजही शक्य होत नाहीये,असे दिसून येत आहे. मासिक पाळी म्हणजे काही तरी चुकीचे आणि घाणेरडे आहे, असे आजही अनेक स्त्रियांना वाटते. ते का वाटते, तेच मला समजत नाही. स्त्रीच्या शरीराच्या रचनेतच तशी सोय केली असून महिन्यातून चार दिवस रक्तस्त्राव होतो.

- Advertisement -

हे अशुद्ध रक्त असते, असे म्हटले जाते, परंतु मला तसे वाटत नाही. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यात वाईट आणि चुकीचे काय आहे तेच समजत नाही. मासिक पाळी हा स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असून यामुळे स्त्री ‘मातृत्वाचा’ आनंद घेते. हे अशुभ आहे असे नाही. पूर्वीच्या काळी ‘सॅनिटरी नॅपकिन’ नसल्याने कपड्याचा वापर केला जात असे. आजही अनेक ठिकाणी कपड्याचा वापर करत असल्याचे आढळून येते. कपड्यावर डाग पडत असे. त्यामुळे असे डागाळलेले कपडे घालून मंदिरात जाणे योग्य नसायचे. त्यामुळेच मंदिरात महिला जात नसत. परंतु कालांतराने याचा असा गैरसमज झाला की मासिक पाळीच्या काळात देवळात जाऊ नये आणि हा गैरसमज आजही तसाच कायम आहे. शहरी भागातील सुशिक्षित तरुणीचा आजही हा विचार असेल तर आपल्यावर मासिक पाळीबाबत गैरसमजुतीचा पगडा किती आहे ते दिसून येते.

‘झाडाला फूल येतं मग त्या फुलाच फळ होतं. आपण झाडाची फुले देवाला घालतो, कारण देवाला फुले आवडतात. स्त्रियांना मासिक पाळी येते आणि म्हणून गर्भधारणा होते, म्हणजे मासिक पाळी जर ‘फूल’ असेल तर गर्भधारणा हे ‘फळ’ झालं..! ‘देवाला झाडाचं फूल चालतं मग ‘मासिक पाळी’ का चालत नाही’..? मासिक पाळी आलेल्या स्त्रीचा साधा स्पर्शसुद्धा चालत नाही..? कधी कधी ती घरात धार्मिक कार्यक्रम आहे म्हणून गोळ्या घेऊन पाळी पुढे ढकलते.. की जे सरळ-सरळ निसर्गाच्या विरोधात जाणं आहे आणि याचा त्रास मुळात जो आहे ना तो पुरुषी मानसिकतेत आहे. तिच्यावर हक्क गाजवला पाहिजे या पुरुषी अहंकाराचा आहे आणि त्यापेक्षा सर्वात जास्त स्वतःच्या मानसिक गुलामगिरीत आहे.

- Advertisement -

या गोष्टीकडे आपण कधी उघड्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने पाहिलेलचं नाही..! मासिक पाळी स्त्रीची कमजोरी नसून निसर्गाने स्त्रीला दिलेली ही जास्तीची शक्ती आहे. कळत नाही, कोण आहेत ही फालतू माणसं की जे सांगतात, ‘स्त्रीला मासिक पाळीत मंदिरात प्रवेश नाही म्हणून..?’ स्त्रीचं गर्भाशय म्हणजे काय वाटतं यांना..? अरे म्हणा, एका बाळंतपणात स्त्री जन्माची काय हालत होते ना ते आधी जाऊन ‘तुमच्या आईला’ विचारा. पोटाच्या बेंबीपासून ते छातीपर्यंत ९ महिने ९ दिवस एक जीव वाढवायचा, त्याला जन्म द्यायचा, त्याचे संगोपन करायचं. तुम्हाला आठवतं मासिक पाळीत जेवण बनवू नये, विटाळ होईल, असेही म्हटले जाते. पण कसला विटाळ ते कोणी सांगत नाही.

पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबात घरात १५-२० माणसे असायची. त्यांच्यासाठी जेवण बनवावे लागायचे. रक्तस्त्राव होत असल्याने अशक्तपणा येत असे आणि कपडा लावल्याने जंतुसंसर्ग होत असे. तेव्हा जेवण बनवताना संसर्ग वाढू नये म्हणून त्यांना जेवण बनवण्यापासून दूर ठेवले जात असे. तेव्हा आतासारखे हँडवॉश वगैरे काही नव्हते. मात्र, आज स्वच्छतेसाठी सर्व प्रकारची साधने बाजारात उपलब्ध आहेत. कपड्यांच्या जागी सॅनिटरी नॅपकिन आहेत. आता तर सिलिकॉन कपही आलेले आहेत. मासिक पाळी ही जर वाईट समस्या असती तर गुवाहाटीत कामाख्या मंदिराची निर्मितीच झाली नसती. या मंदिराला योनी पीठ असेही म्हटले जाते.स्त्रीला ज्याप्रमाणे मासिक पाळी येते त्याप्रमाणे देवीच्या योनीतूनही तीन दिवस रक्तस्राव होतो असे म्हणतात आणि तीन दिवस मंदिर बंद ठेवतात.

त्यानंतर उत्सव साजरा केला जातो आणि प्रसादही दिला जातो. केवळ गुवाहाटी येथेच नव्हे, तर आंध्र प्रदेश येथील देवीपूर, केरळमधील पार्वती देवीच्या मंदिरातही मासिक पाळीचा उत्सव साजरा केला जातो. जर देवीच्या ‘मासिक पाळीचा’ उत्सव साजरा केला जातो तर स्त्रियांनीही मासिक पाळी अशुभ न मानता उत्सव साजरा करणेच योग्य आहे आणि हेच मी महिलांच्या मनावर बिंबवू ईच्छीतो. हीच खरी आपली परंपरा आहे आणि शहरातील महिलांनी हे आपल्या मनात रुजवले पाहिजे. स्त्रीच्या स्पर्शाने विटाळणारा देव गाईच्या मूत्राने कसा काय शुद्ध होतो? आणि म्हणूनच सांगतो, आजही गरज आहे तिला समजून घेण्याची, तिच्या मासिक पाळीला समजून घेण्याची, तिच्या भावनांना समजून घेण्याची आणि या विद्रोहात हळुवारपणे ‘तिला’ मदत करण्याची..!!!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -