घरफिचर्सप्रशिक्षक हरेंदर यांचे करायचे काय?

प्रशिक्षक हरेंदर यांचे करायचे काय?

Subscribe

द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक हरेंदरसिंग यांची हॉकी इंडियाने प्रशिक्षक पदावरून उचलबांगडी केली आहे. गेल्या दोन दशकातील गच्छंती झालेले हरेंदरसिंग हे २५ वे हॉकी प्रशिक्षक! राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षक पदावरून हटविण्यात आलेल्या हरेंदर यांच्याकडे पुन्हा एकदा भारतीय ज्युनियर हॉकी संघाच्या प्रशिक्षक पदाची धुरा सोपविण्याचा हॉकी इंडियाचा मानस आहे. राष्ट्रीय सिनियर संघाच्या प्रशिक्षक पदावरून उचलबांगडी करण्यात आली, तेव्हा हरेंदर वाराणसी गंगा घाटावर स्नान करत होते. आपल्या उचलबांगडीची त्यांना कल्पनादेखील नव्हती.

भारतीय हॉकी संघासाठी सन २०१८ हे वर्ष निराशाजनक ठरले. अपेक्षेनुसार कामगिरी झाली नाही. मे २०१८ मध्ये हरेंदर यांनी राष्ट्रीय सिनियर संघाच्या प्रशिक्षक पदाची सूत्रे हाती घेतली. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारताला रौप्य पदक लाभले. जाकार्ता येथे झालेल्या एशियाडमध्ये भारताला सुवर्ण, रौप्य पदकाने हुलकावणी दिली आणि ब्राँझ पदकावरच समाधान मानण्याची वेळ भारतावर आली. इन्चाँन (२०१४) स्पर्धेतील सुवर्ण पदक राखण्यात भारत अपयशी ठरला. परिणामी टोकिओ ऑलिंपिक (२०२०) साठी भारताचा थेट प्रवेशही हुकला. हरेंदर यांचे हे अपयश होते. साखळी लढतीत भारताकडून पराभूत झालेल्या (८-०) जपानने मलेशियाला नमवून अनपेक्षितपणे सुवर्ण पदक पटकावले. मलेशियाविरुध्द झालेल्या पराभवाचा फटका भारताला बसला. या गाफिलपणाची जबर किंमत भारताला तसेच प्रशिक्षक हरेंदर यांना मोजावी लागली आहे. एशियाड पाठोपाठ भुवनेश्वरमध्ये झालेल्या वर्ल्ड कप हॉकी स्पर्धेत भारताला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भूषविणार्‍या हॉकी इंडियाला हरेंदर यांच्या भारतीय चमूकडून किमान उपांत्य फेरी गाठण्याची अपेक्षा होती. परंतु, घडले विपरीतच.

साखळी लढतीत बेल्जियमला (बेल्जियमनेच वर्ल्ड कप स्पर्धेत जेतेपद पटकावले) बरोबरीत रोखणार्‍या भारताने उपांत्यपूर्व फेरी गाठली खरी. परंतु, हॉलंडने भारताला नमवून त्यांची आगेकूच रोखली. उपांत्यपूर्व फेरीत हॉलंडकडून पराभूत झाल्यावर प्रशिक्षक हरेंदर यांनी पंचांवर तोंडसुख घेताना १३ विरुध्द ११ असा सामना झाल्याची विखारी टीका केली. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे (आयएचएफ) अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी हरेंदर यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. एशियाड, वर्ल्ड कपमधील अपयश हरेंदर यांना भोवले.

- Advertisement -

भारतीय संघाचे माजी कर्णधार, प्रशिक्षक वासुदेवन भास्करन यांनी हॉकी इंडियाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. भास्करन यांच्यामते हॉकी इंडियाला भारतीय प्रशिक्षकांची अ‍ॅलर्जी वाटते. प्रशिक्षक पदावर पुरेसा कालावधी न देताच त्यांची उचलबांगडी करण्याचे धोरण चुकीचे. भारतीय संघाचे माजी गोलकिपर आशिष बल्लाळ यांच्या मते ‘प्रशिक्षक-खेळाडू’ यांचे सूर जुळण्यास किमान वर्षभराचा कालावधी लागतो. हरेंदर यांचे खेळाडूंशी चांगलेच सूर जमत असताना त्यांची वर्षभराच्या आतच उचलबांगडी करण्यात आली. परदेशी प्रशिक्षकांना झुकते माप देणार्‍या हॉकी इंडियाची खोड जुनीच !’भारतीय संघाचे माजी कर्णधार धनराज पिल्ले यांनादेखील हरेंदर यांच्या गच्छंतीचा निर्णय पटलेला नाही. याबाबत नाराजी व्यक्त करताना धनराज म्हणाले, ‘हरेंदरइतका चांगला कुशल भारतीय प्रशिक्षक मिळणे कठीण. दुर्दैवाने भारतीय हॉकीची सूत्रे परदेशी व्यक्तींकडेच आहेत. हॉकी इंडियाच्या सीईओ एलेना नॉर्मन (त्या ऑस्ट्रेलियन) असून, हॉकी इंडियाचे हाय परफॉर्मन्स डायरेक्टर क्रिस सिरीलो हेदेखील ऑस्ट्रेलियन. ऑलिंपिक पात्रता स्पर्धा ६ महिन्यांवर तर टोकीओ ऑलिंपिक १८ महिन्यांवर आले असताना नव्या प्रशिक्षकाच्या हाती भारतीय संघ सुपुर्द करणे कितपत उचित आहे, असा सवाल धनराजने केला.

हॉकी इंडियाचे हाय परफॉर्मन्स डायरेक्टर डेव्हिड जॉन यांच्याकडे भारतीय संघाची सूत्रे तात्पुरती सोपविण्यात आली आहेत. परंतु, याच डेव्हिड जॉनवर भारतीय हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष महंमद मुस्ताफ अहमद यांनी सिनियर खेळाडूंवर आकस असल्याचे आरोप केले होते. वर्ल्ड कप दरम्यान भारतीय संघ निवडीच्यावेळी जॉन यांना हटविण्यात आले होते. एवढेच काय तर भुवनेश्वरमधील वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान भारताच्या सामन्यांना जॉन क्वचितच हजर होते.

- Advertisement -

वर्ल्ड कप हॉकी स्पर्धेदरम्यान उद्भवलेल्या एका घटनेचा इथे उल्लेख करावासा वाटतो. हॉकी इंडियाच्या सीईओ एलेना नॉर्मन यांनी कर्णधार मनप्रीत सिंग, मनदीप सिंग, क्रिशन पाठक, गुरजंत सिंग या चार खेळाडूंना अपमानास्पद वागणूक देताना ‘गेट आऊट’ केले होते. हॉलंडविरुध्दच्या उपांत्यपूर्व लढती आधी कर्णधार मनप्रीत आपल्या तीन सहकार्‍यांसह सामना पाहण्यासाठी कलिंग स्टेडियममधील व्हीआयपी लाऊंजमध्ये गेला होता. स्पर्धेच्या आचारसंहितेनुसार व्हीआयपी लाऊंजमध्ये इतरांना प्रवेश करण्यास मनाई असते. मनप्रीतकडून अभावितपणे ही आगळीक घडली. त्याबाबत त्याने दिलगिरीही व्यक्त केली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीआधी मायदेशातच भारतीय खेळाडूंना अपमानास्पद वागणूक देण्यात आली याबाबत हरेंदर यांनी हॉकी इंडिया तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाला सादर करण्यात आलेल्या आपल्या अहवालात नाराजी व्यक्त करताना म्हटले की, या घटनेमुळे खेळाडूंच्या मनस्वास्थ्यावर परिणाम झाला आहे.

सेड्रिक डिसूझा, राजिंदर सिंग (सिनियर व ज्युनियर), वासुदेवन भास्करन, जोकिम कार्व्हालो या भारतीय प्रशिक्षकांप्रमाणेच ब्रासा, टेरी वॉल्श, ऑल्टमन्स, रिक चार्ल्सवर्थ, या परदेशी प्रशिक्षकांनीही गेली काही वर्षे भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकांची धुरा वाहिली. स्पर्धेतील अपयशामुळे या सार्‍यांची गच्छंती अटळ ठरली.

खेळाडूंमध्ये शिस्त निर्माण करण्यात हरेंदर अपयशी ठरले. तसेच, गटबाजी, प्रांतीय वार रोखण्यात त्यांना यश लाभले नाही. उच्च दर्जाच्या हॉकीचे तंत्र, डावपेच आखणे त्यांना जमले नाही, असा ठपका प्रशिक्षक हरेंदर यांना नारळ देणार्‍या हॉकी इंडियाने ठेवला आहे. भारतीय खेळाडूंना हाताळणे भारतीय प्रशिक्षकांना जमत नाही, असा आरोप करण्यात येतो. या आरोपाचे खंडन करताना हरेंदर म्हणतात, हे आरोप बिनबुडाचे असून, माझ्या प्रशिक्षक पदाच्या कालावधीत संघात एकजुटता होती. सर्वांनी निस्वार्थपणे खेळ करताना सांघिक हिताला प्राधान्य दिले. वर्ल्ड कप दरम्यान सार्‍यांनी आमचा खेळ बघितला. हाय परफॉर्मन्सच्या वेळी समितीचे सदस्य आर.पी.सिंग, गोविंदा प्रभूती हजर होते. मी जर चुकत होतो तर वेळीच माझ्या चुका नजरेस आणून का दिल्या नाहीत, असा सवाल हरेंदर यांनी केला.

हॉकी इंडियाचा एकतंत्री कारभार, प्रशिक्षकांची वारंवार होणारी उचलबांगडी, सिनियर खेळाडूंचा असहकार यामुळे भारतीय हॉकी संघ प्रगतीऐवजी अधोगतीकडेच वाटचाल करत आहे. टोकियो ऑलिंपिकसाठी भारतीय हॉकी संघ प्रवेश मिळविणार का? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

शरद कद्रेकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -