घरफिचर्सहे कसले ‘रोल मॉडेल’?

हे कसले ‘रोल मॉडेल’?

Subscribe

बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात महिलांबाबत आक्षेपार्ह विधाने करणार्‍या हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावरील बंदी उठवल्यामुळे हे दोघे पुन्हा चर्चेचा विषय ठरत आहेत. ज्या लोकांनी या दोघांचा एपिसोड बघितला नाही, ते ‘या दोघांनी इतके काय वाईट केले? हे दोघे नक्की काय बोलले?’ असे प्रश्न विचारत आहेत. मात्र, त्यांनी सर्व मर्यादा कशा पार केल्या हे सांगायचे तरी कसे ! क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ. त्यामुळे साहजिकच हे क्रिकेटपटू लहान मुलांसाठी, युवकांसाठी प्रेरणास्थान असतात. त्यांना लोक डोक्यावर घेतात. त्यामुळे या खेळाडूंनीही जबाबदारीने वागणे गरजेचे असते. त्या कार्यक्रमात या दोन खेळाडूंना जणू आपल्या जबाबदारीचा विसरच पडला होता. त्यामुळे आता त्याच लहान मुलांना, युवकांना ‘या खेळाडूंना आपण खरंच आदर्श मानू शकतो का?’ असा प्रश्न पडला तर नवल नाही.

‘कॉफी विथ करण’ हा खूपच लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा आता सहावा मोसम सुरू आहे. यावरूनच त्याची लोकप्रियता कळून येते. मात्र, लोकप्रियतेसोबतच हा कार्यक्रम वादग्रस्तही आहे. करण जोहरच्या कार्यक्रमातील कॉफी पिऊन एखादा ‘सेलिब्रिटी’ वाहवत जाण्याची अनेक उदाहरणे आहेत. बर्‍याच सेलेब्रिटींनी या कार्यक्रमात नको ती विधाने आणि कृत्ये केली आहेत. मात्र, क्रिकेटपटूंनी या कार्यक्रमात येण्याची ही पहिलीच (आणि कदाचित शेवटची) वेळ होती.
हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल या ‘खेळाडूंनी’ या कार्यक्रमात खेळ सोडून बर्‍याच गोष्टींवर चर्चा केली. आपल्या मागे मुली कशा वेड्या आहेत हे सांगण्याची त्यांनी एकही संधी सोडली नाही. आपल्या किती ‘गर्लफ्रेंड’ होत्या हे सांगताना त्यांची छाती जणू अभिमानाने फुलली होती. यापुढे त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या ज्याबाबत चर्चा न केलेलीच बरी. या दोघांनी आपले नाव खराब केलेच. मात्र, पांड्याने तर आपल्या आई-वडिलांचेही नाव खराब केले. आपले आई-वडील कसे पुढारलेले आहेत हे सांगताना त्याने कोणत्याही मर्यादा ठेवल्या नाहीत. आपण आपल्या आई-वडिलांना ‘आज मै करके आया हूँ’ (हे सांगायची गरज नाही) हे सांगितले, असे सांगताना पांड्याला जणू भीम पराक्रम केल्याचा गर्व वाटत होता. तसेच, एका पार्टीत माझ्या आई-वडिलांनी मला विचारले की यातली तुझी गर्लफ्रेंड कोणती तर मी ही, ही (४-५ मुलींकडे बोट दाखवून) म्हटले आणि माझे आई-वडील मला शाबास म्हणाले, असे पांड्याने सांगितले. राहुलनेही ‘हार्दिकच्या कुटुंबासारखे कुटुंब पाहिलेले नाही’ असे म्हणत पांड्याच्या वक्तव्यांना दुजोरा दिला. मात्र, स्वतःला ‘कुल’ दाखवण्याचा प्रयत्न किती अंगाशी येईल याचे त्यांना भान नव्हते. त्यांना हा कार्यक्रम जगभरात दाखवला जाणार आहे याचा जणू विसरच पडला होता.

- Advertisement -

या दोघांच्या आक्षेपार्ह विधानांमुळे त्यांच्यावर आधी सोशल मीडियावर खूप टीका झाली. मग बीसीसीआयला त्यांच्याविरोधात कारवाई करणे भागच पडले. दोन आठवड्यांपूर्वी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. त्यावेळी भारत ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर होता. या दोघांना तेथून पुन्हा भारतात बोलावण्यात आले. मात्र, गेल्या गुरुवारी या दोघांवरील बंदी तत्काळ उठवण्याचा निर्णय बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने घेतला. असे असले तरी या दोघांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात ५ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. मात्र, कुठेतरी असेही वाटते की या दोघांइतकीच या प्रकरणात बीसीसीआयचीही चूक आहे.
हार्दिक पांड्या आपल्या ‘बिंदास’ व्यक्तिमत्वासाठी ओळखला जातो. तसेच, त्याने आणि राहुलने याआधीही १-२ कार्यक्रमांत मुलींबाबत चर्चा केल्या आहेत. या दोघांची नावे बर्‍याच बॉलिवूड अभिनेत्रींशीही जोडली गेली आहेत. मग असे असताना बीसीसीआयने या खेळाडूंना अशा वादग्रस्त कार्यक्रमात जाण्याची परवानगी देणे योग्य होते का ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

यावर्षी मे महिन्यात क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. पांड्याला मागील काही महिन्यांत दुखापतीमुळे फारसे क्रिकेट खेळता आलेले नाही. राहुलने सामने तर खेळले आहेत. मात्र, त्या सामन्यांत त्याचे प्रदर्शन निराशाजनक होते. विश्वचषकाआधी आता अवघे काही एकदिवसीय सामने बाकी आहेत. त्यामुळे या दोघांसाठी हे सामने अत्यंत महत्त्वाचे आहेत. बंदीमुळे या दोघांना आधीच ४ सामने (ऑस्ट्रेलियातील ३ आणि न्यूझीलंडमधील १) मुकावे लागले आहेत. त्यातच सुप्रीम कोर्टात या दोघांबाबत काय निकाल घेतला जातो हे सांगता येणे अवघड आहे. मात्र, निकाल काही येवो, या दोघांना गेल्या दोन आठवड्यांत ज्या गोष्टी भोगाव्या लागल्या आहेत, त्यामुळे त्यांना जरा शहाणपण आले असेल आणि त्यांनी घडलेल्या प्रकरणातून काहीतरी धडा घेतला असेल अशी आशा आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -