घरमुंबईस्मशानभूमींतील धगधगत्या समस्या

स्मशानभूमींतील धगधगत्या समस्या

Subscribe

मुंबईत सध्या ६८ हून अधिक स्मशानभूमी आहेत. आजही अनेक स्मशानभूमीची परिस्थिती तशी फारशी चांगली नाही. अनेक ठिकाणी अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण अशा स्मशानभूमी आजही मुंबईत आहेत. तर पर्यावरणाचे हित लक्षात घेता अनेक ठिकाणी विद्युतदहन वाहिनीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. परंतु बहुतांश ठिकाणी त्या बंद असल्याने स्थानिकांची गैरसोय कायम असल्याचे पहायला मिळाले आहे. अनेक ठिकाणी या स्मशानभूमीपर्यंत पोहचण्यासाठी स्थानिक नागरिकांची अक्षरश: दमछाक होत असल्याचे दिसून आले असून ‘नजर महानगर’च्या माध्यमातून मुंबईतील स्मशानभूमीच्या परिस्थितीवर घेतलेला हा आढावा.

मुंबईत अंतिम संस्कार करावयाच्या ठिकाणी प्राथमिक स्वरूपाच्या आवश्यक त्या सोयी-सुविधा सुयोग्यप्रकारे पुरविणे आवश्यक आहे. यादृष्टीने मुंबईतील अंतिम संस्कार करावयाच्या ठिकाणांबाबत सध्याची स्थिती व तिथे आवश्यक असलेल्या सुधारणा याबाबत सविस्तर सादरीकरण करण्याची सूचना दीड वर्षांपूर्वी देऊनही अद्याप याचे सादरीकरण महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेले नाही. मुंबईत एकूण ६८ अंतिम संस्कार करण्यात येणारी स्मशानभूमी, दफनभूमी आहे. या सर्व ठिकाणी स्वच्छता, पिण्याचे पाणी, बसावयाच्या जागा, स्वच्छतागृहे यांसारख्या प्राथमिक सोयी-सुविधांबरोबरच प्रवेशद्वार, दिशादर्शक फलक, माहिती फलक यांसह परिसराची देखभाल करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधितांना दिल्या होत्या. शिवाय सर्व सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या विभागात ही कामे व्यवस्थितपणे होतील यासाठी विशेष काळजी घेण्याचे आदेश दिले होते, परंतु अद्यापही स्मशानभूमी, दफनभूमींच्या बाबतीत आरोग्य खाते तसेच प्रशासनातील अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे या सर्व अंतिम संस्काराच्याठिकाणी गैरसोयीच पहायला मिळत आहे.

- Advertisement -

स्मशानभूमीत महापालिकेच्या वतीने १०० किलो जळाऊ लाकडे मोफत पुरवली जातात. त्यामुळे यावर होणारा २ हजार रुपयांचा खर्च कमी होतो. मात्र, हा खर्च केला जात असला तरी पर्यावरणाची हानी टाळली जात नसल्याने महाालिकेने २०१५ मध्ये तीन टप्प्यात ४४ विद्युतदाहिनींच्या स्मशानभूमींचे रूपांतर पीएनजीवर करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये पहिल्या टप्प्यात १२ विद्युतदाहिन्यांचे रूपांतर करण्याचे काम हाती घेण्यात आले. परंतु अद्यापही याचे काम पूर्ण झालेले नाही, तर दुसर्‍या टप्प्यातील ९ विद्युतदाहिन्यांचे सीएनजीवर रूपांतरित करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे.

– एक पार्थिव शरीराच्या दहनासाठी सुमारे ३०० किलो लाकूड आणि त्यावर महापालिकेचा दोन हजार रुपयांचा खर्च
– इलेक्ट्रिक शवदाहिनीमध्ये सुमारे ७०० रुपये प्रति दहनासाठी खर्च, मात्र व्यवस्थापन खर्च अधिक
– पीएनजी गॅसवर चालणार्‍या शवदाहिनीमध्ये प्रति दहनासाठी ६५० रुपये खर्च, पर्यावरण पुरक दहन

- Advertisement -

दादरच्या शिवाजी पार्कमध्ये असलेली कै. भागोजी बाळूजी कीर हिंदू स्मशानभूमीत आज उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र मागील दोन वर्षांपूर्वी या स्मशानभूमीत कवट्या, हाडांचे सांगाडे मोठ्या प्रमाणात सापडले होते. त्यामुळे या स्मशानभूमीत अघोरी कृत्य सुरू नाही ना, असा मुद्दा उपस्थित झाला होता. तेव्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेत सुरक्षा वाढवली होती. मात्र आज इथली सुरक्षा वार्‍यावर आहे. त्यामुळे आताही नागरिकांमध्ये या स्मशानभूमीविषयी शंका कायम आहे. कै. भागोजी बाळूजी कीर हिंदू स्मशानभूमी खूप वर्षे जुनी आहे. ही स्मशानभूमी मुंबईतील थोर समाजसेवक कै. भागोजी बाळूजी कीर यांनी बांधली आहे. जेव्हा भागोजी बाळूजी कीर मुंबईत दाखल झाले तेव्हा भागोजींच्या लक्षात आले की, दादरसारख्या सुसंस्कृत, मोठ्या लोकसंख्येच्या परिसरात हिंदूंसाठी स्मशानभूमी नाही. त्यांनी सरकारकडे स्वस्त किंवा फुकट भूखंडासाठी अर्ज न करता शिवाजी पार्कला प्रचंड मोठी जागा, त्या वेळच्या बाजारभावाने स्वतःचे पैसे टाकून विकत घेतली. त्यावर कै. भागोजी बाळूजी कीर यांनी हिंदू समाजासाठी स्मशानभूमी शिवाजी पार्क दादर येथे बांधली आहे.

तेव्हापासून दादर परिसरात मोठ्या संख्येने हिंदु समाजातील पार्थिवावर अंत्यसंस्कार या स्मशानभूमीत करण्यात येते. या स्मशानभूमी परिसरामध्ये निसर्गरम्य वातावरणासोबत अपेक्षित सर्व सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये पिण्याचे पाणी आणि अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होणार्‍या नागरिकांसाठी बसण्याची सोय या स्मशानभूमीत उपलब्ध आहे. इतकेच नव्हे तर या परिसरात दोन गॅदरिंग हॉलसुद्धा बांधण्यात आले आहेत. या कै.भागोजी बाळूजी कीर हिंदू स्मशानभूमीमध्ये पूर्वी लाकडाच्या माध्यमातून पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जात होते. मात्र बदलत्या काळानुसार आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्या दुष्टीकोनातून आता विद्युतदहन वाहिनीच्या माध्यमातून इथे पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात. आज या स्मशानभूमी अंत्यसंस्कारासाठी दोन्ही पद्धती उपलब्ध करून दिल्यामुळे हिंदू समाजातील नागरिकांना मोठा फायदा झाला आहे. याचे श्रेय स्थानिक नगरसेवक आणि आमदाराचे आहे, असे या परिसरातील नागरिकांनी दैनिक ‘आपलं महानगर’ला सांगितले. सोबतच या स्मशानभूमीत सुरक्षा वाढविण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे.

माझगाव स्मशानभूमी
मुंबईतील एकूण ६८ स्मशानभूमीपैकी सर्वात जुनी स्मशानभूमी म्हणजे एक म्हणजे, माझगाव येथील स्मशानभूमी. याठिकाणी भायखळा, माझगाव, घोडपदेव आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांसाठी ही स्मशानभूमी बांधण्यात आलेली आहे. रे रोड येथील अत्यंत दाटीवाटीच्या ठिकाणी ही स्मशानभूमी आहे. गेल्या काही वर्षांपूर्वीच याठिकाणी आमदार आणि खासदार निधीतून याठिकाणी दुरस्तीची कामे करण्यात आलेली आहेत. त्यानुसार येथील स्मशानभूमीत तसा नीटनेटकेपणा दिसून येतो. पण विद्युतदहन वाहिनीच्या वापराकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. याठिकाणी विद्युतदहन वाहिनीचा वापर मोठ्या प्रमाणात जे.जे. हॉस्पिटल आणि स्थानिक पोलिसांकडून होता. त्यामुळे याठिकाणी बर्‍याच अंशी विद्युतदहन वाहिनीचा वापर कमी होतो. तर ज्याठिकाणी विद्युतदहन वाहिनी आहे, त्याठिकाणी मात्र स्वच्छता नसल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आल्याने ही परिस्थिती बदलण्याची मागणी वारंवार केली जात असली तरी ती पूर्ण झालेली नाही.

याठिकाणी पिण्याच्या पाण्यापासून हात पाय धुण्यासाठी देखील पाण्याची व्यवस्था नीटपणे करण्यात आलेली आहे. त्यामुळे येथे येणार्‍या स्थानिकांची तशी गैरसोय होत नाही. परंतु ही स्मशानभूमी फारच दाटीवाटीच्या परिसरात असल्याने याठिकाणी पोहण्यासाठी नागरिकांची दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे. रेल्वे स्टेशनच्या नजीकच ही स्मशानभूमी आहे. परंतु येथे पोहचण्यासाठी अंधारातून मार्ग काढावा लागतो. तर स्मशानभूमीच्या बाहेरच मोठ्या गाड्यांनी गर्दी केली असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन येथे प्रवास करीत लागत असल्याची खंत येथील स्थानिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

कुर्ला बैलबाजार स्मशानभूमी
कुर्ला पश्चिम परिसरात असणार्‍या बैल बाजारानजीक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध असणारी स्मशानभूमी बांधण्यात आली आहे. स्मशानभूमीत एकाच वेळी जवळपास 8 मृतदेहाचे अंत्यविधी करता येतील अशी सोय करून देण्यात आली आहे त्यामुळे मृतदेहांचा अंत्यविधी करण्यासाठी वाट पहावी लागत नाही. स्मशानभूमी म्हटले की त्या ठिकाणी असणारे वातावरण जवळपास भकास असते पण यालाही स्मशानभूमी अपवाद आहे. बाजूलाच छोटेसे उद्यान उभारण्यात आले असून त्यामध्ये कित्येक लोक वेळ घालावतात. बर्‍याचशा स्मशानभूमीमध्ये लहान मुलांचे अंत्यविधी करण्यासाठी एकाच पद्धतीचा पर्याय असतो मात्र इथे लहान मुलांना दफन करण्यासाठी स्वतंत्र जागा तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे सगळ्याच बाजूने सोयीसुविधांनी सुसज्ज अशी ही स्मशानभूमी आहे. त्याचबरोबर इथे बसण्याची सोय देखील असल्याने अंत्यविधीसाठी येणार्‍या लोकांची गैरसोय होत नाही.

मालाड हिंदू-मुस्लिम ख्रिस्त स्मशानभूमी
मालाडमधील बराच भाग हा झोपडपट्टीचा असल्याने या भागात सर्व धर्माचे लोक राहतात. परंतु मालाडमध्ये असलेली हिंदू, मुस्लिम, ख्रिस्त स्मशान आणि दफन भूमी अंत्यसंस्कारासाठी अपुरी पडत आहे. तसेच या स्मशानभूमीमध्ये येणार्‍या मृतदेहांच्या नातेवाईकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. स्मशानभूमीमध्ये पाणपोई नसल्याने अंत्यसंस्कारासाठी येणार्‍या पार्थिव देहांच्या नातेवाईकांची गैरसोय होते. इतकेच नव्हे तर येथे तीन पाळीमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांना रात्रपाळीच्या वेळी राहण्याची कोणतीही व्यवस्था नाही. तसेच स्मशानभूमीमध्ये शौचालयाची व्यवस्था नसल्याने कर्मचारी व मृतांच्या नातेवाइकांची गैरसोय होते. तसेच या परिसरतील वाहतूक पोलीस रोज सायंकाळी स्मशानभूमीमध्ये दारु प्यायला बसत असल्याने येथे दारुचा अड्डाच झाला आहे. पोलिसांना काहीच बोलता येत नसल्याने कर्मचार्‍यांची प्रचंड अडचण होत आहे.

दहिसर गावठाण स्मशानभूमी
मुंबईच्या वेशीवर असलेल्या दहिसर गावाठाण स्मशानभूमीतील धर्मशाळेची अवस्था अत्यंत दयनीय आहे. धर्मशाळेचे खांब व भिंतींना ठिकठिकाणी भेगा गेल्या आहेत. त्यामुळे धर्मशाळा कधीही पडेल, एखाद्या अंत्यसंस्कारावेळी धर्मशाळा कोसळल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. त्याचप्रमाणे स्मशानभूमीमध्ये असलेल्या लाकडाच्या वखारीचे स्लॅब कोसळलेले आहेत. वखारीची दुरवस्था झाल्याने लाकडे साठवून ठेवण्यात अडचणी येतात. त्याचप्रमाणे येथे असलेल्या पाण्याच्या टाकीवर झाकण नसल्याने त्यात कचरा पडून पाणी खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्याता अधिक आहे. दहिसर स्मशानभूमीतील धर्मशाळा, लाकडाच्या वखारीची दुरवस्था याबरोबरच कार्यालयाचीही दुरवस्था झाली आहे.

बोरिवली वझिरा स्मशानभूमी
बोरिवली पश्चिम, वझिरा येथे असलेली स्मशानभूमी सुस्थितीत आहे. पण लोकसंख्येच्या तुलनेत याठिकाणी अग्नी देणार्‍या जागांची संख्या कमी आहे. बोरिवली पश्चिम आणि आसपासच्या रहिवाशांसाठी ही स्मशानभूमीवर फक्त तीनच जागा मर्यादित आहे. अनेकवेळा एक बंद असते. त्यामुळे स्थानिकांना बराच वेळ ताटकळत बसावे लागते. याबद्दल स्थानिकांकडून अनेकवेळा नाराजी व्यक्त केली आहे.

सोयी सुविधांच्या बाबतीत म्हणायचे झाले तर याठिकाणी पिण्याच्या पाण्यापासून नातेवाईकांना बसण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर याठिकाणी स्मशानभूमीच्या बाहेरील रस्त्यावर वाहतूक कमी प्रमाणात असते यामुळे, पार्थिव नेताना लोकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत नाही. रात्री कितीही वाजता या स्मशानभूमीत अग्नीसंस्कार करता येऊ शकतात. स्मशानाजवळच लाकडाची मोठी वखार असल्याने संस्कारासाठी लागणारे सामानही या परिसरात उपलब्ध होत असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे.

विक्रोळी स्मशानभूमी विद्युतदाहिनी वापराविना
झाडांची कत्तल होवू नये यासाठी पालिकेकडून अनेक स्मशानभूमीमध्ये विद्युतदाहिनी बसवण्यात आल्या आहेत. परंतु आशियातील सर्वात मोठी रहिवासी वसाहत (हौसिंग सोसायटी) म्हणून ओळख असलेले विक्रोळीतील कन्नमवार नगर, टागोर नगर, कांजुरमार्ग या सर्व भागांतील रहिवाशांसाठी टागोर नगरमध्ये स्मशानभूमी उभारण्यात आली आहे. यामध्ये दोन विद्युतदाहिनीही आहेत. परंतु या विद्युतदाहिनीमधून पार्थिवावर अंत्यसंस्कारच होत नसल्याचे समोर आले आहे. वर्षातून एखाद दुसर्‍या पार्थिवाचे दहन केले जाते. विशेष म्हणजे कन्नमवारनगरमध्ये महाराष्ट्रातील अनेक नामवंत साहित्यिक, मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील कलाकार, पत्रकार, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, माजी महापौर दत्ता दळवी असे अनेक नामवंत राहतात. असे असतानाही येथील नागरिकांमध्ये विद्युतदाहिनीमध्ये दहन करण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यात आलेली नाही. ही मोठी खेदाची बाब आहे.

ओशिवरा दफनभूमी
ओशिवरा स्मशानभूमी व दफनभूमी एकत्रच आहे. त्यामुळे येथे हिंदू व मुस्लिम यांना आणले जाते. परंतु येथील दफनभूमीमध्ये अंत्यविधीसाठी येणार्‍या मुस्लिमांना अनेक गैरसोयींचा सामना कारावा लागतो. दफनभूमीमध्ये दफनविधीसाठी येणार्‍या मुस्लिमांना बसण्यासाठी आसनव्यवस्थाच नाही. तसेच जेथे लोक उभे रहातात तेथील पत्र्याचे शेडही तुटलेले आहे. त्यामुळे त्यांना उन्हा-पावसात उभे राहावे लागते. इतकेच नव्हे तर दफनविधीवेळी नमाज पढले जाते. परंतु नमाज पढण्यासाठी नमाजखानाच नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. इतकेच नव्हे तर स्मशानभूमी व दफनभूमीत शौचालयाची सोय नसल्याने येणार्‍या नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. याबाबत अनेकदा तक्रारी करुनही पालिकेकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.

रामबाग स्मशानभूमीची दुरवस्था
शास्त्रीनगर, वर्तक नगर, शिवाई नगर या भागातील नागरिकांना त्यांच्या आप्तस्वकीयांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी पायपीट करावी लागते. या परिसरातील नागरिकांना मरणानंतरही यातना सहन कराव्या लागत आहेत. केवळ बेवारस मृतदेह जाळण्याकरिताच रामबाग स्मशानभूमीचा वापर होत आहे. चिंचोळा रस्ता, रस्त्याच्या आजूबाजूला इंडस्ट्रीज एरिया, परिसरातील कारखानदारांच्या वाहनांची गर्दी. परिणामी स्मशानभूमीकडे जाणे अगदी जिकरीचे होत असते. त्यामुळे या ठिकाणचे नागरिक प्रचंड संतापले असून हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी करीत आहेत. प्रथम येऊर येथील रामबाग स्मशानभूमी त्यानंतर दोस्ती रेटल हाऊसिंग येथील सुविधा भूखंडावर स्मशानभूमी उभारण्याची मागणी केली होती. परंतु वनविभागाला सर्वोच्च न्यायालयाचे आदेश दाखवून रामबाग स्मशानभूमीला रस्ता देण्यास विरोध केला तर दोस्ती येथील सुविधा भूखंडावर ज्येष्ठ नागरिकांसाठी भवन उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

रस्ता रूंदीकरणादरम्यान रेप्टाकोर्स कंपनीच्या सुविधा भूखंडावर स्मशानभूमी उभारण्याची मागणी केली होती. कल्पतरू येथील भूखंड संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ आहे. तेथे मनुष्यवस्तीही नाही. त्या ठिकाणी स्मशानभूमीची मागणी करण्यात आली होती. परंतु बिल्डरच्या दबावामुळे तेथील स्मशानभूमी हलवून ती कॉसमॉस येथील सुविधा भूखंडावर उभारण्याचा महापालिका प्रशासनाने निर्णय घेतला आहे. त्यालाही विरोध होत आहे. यामुळे हा परिसरातील नागरिकांना स्मशानभूमीकरिता वारंवार महापालिकेला विनंती करावी लागत आहे. मात्र मागील अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित असून त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.

मजकूर – सौरभ शर्मा, सचिन धानजी, विनायक डिगे, प्रकाश गुजर, नितीन बिनेकर
फोटो – प्रविण काजरोळकर, संदीप टक्के, अमित मार्कंडे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -