घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये खोल, खोल पाणी; भूजल पातळीत २.२० मीटरची घट

नाशिकमध्ये खोल, खोल पाणी; भूजल पातळीत २.२० मीटरची घट

Subscribe

मागील ५ वर्षांत यंदा सर्वात कमी पर्जन्यमान झाल्याची नोंद झालेली असतानाच नाशिक जिल्ह्यातील भूजल पातळी २.२० मीटरपर्यंत घटली असल्याचे भूजल सर्व्हेक्षण यंत्रणेच्या अहवालातून समोर आले आहे. दिवाळीच्या आधीपासूनही अनेक तालुक्यांत टँकर सुरू असून आता जिल्ह्यातील टँकर्सने शंभरी गाठलेली आहे. या स्थितीत यंदा दुष्काळाच्या झळा अधिकच तीव्र होत जाणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे.

नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी ८ तालुक्यांत शासनाकडून दुष्काळ जाहीर झाला आहे. बागलाण, मालेगाव, चांदवड, येवला, सिन्नर, निफाडचा पूर्व भाग, नांदगाव या तालुक्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. भूजल सर्व्हेक्षण यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार भूजल पातळीची सर्वाधिक घट बागलाण तालुक्यात २.२० मीटरपर्यंत झाली आहे. मालेगाव तालुक्याची भूजल पातळी २.१५ मीटरने घटली आहे. चांदवड तालुक्याची भूजल पातळी १.६७ मीटरने घटली आहे. येवला आणि सिन्नर तालुक्याच्या भूजल पातळीत अनुक्रमे १.९८ व १.५१ मीटरने घटली आहे. मागील ५ वर्षातील वार्षिक पर्जन्यमानाचे स्वरूप एकसारखे नाही. वर्ष २०१८ च्या पावसाळ्यात बहुतांश तालुक्यात पावसाने ओढ दिली आहे. त्याचा परिणाम भूजल पातळीची घट होण्यावर झाला आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि पेठ हे सर्वाधिक पावसाचे तालुके आहेत. यावर्षी जानेवारी २०१९ पर्यंत इगतपुरीची भूजल पातळी ३.१२ मीटर, तर त्र्यंबकेश्वर तालुक्याची भूजल पातळी ३.२८ मीटर, सुरगाणा तालुक्याची भूजल पातळी ४.२९ तर पेठ तालुक्याची भूजल पातळी ४.९५ मीटर अशी नोंदली गेली आहे.

- Advertisement -

सर्वात नीचांकी स्थिती

भूजल पातळीच्या जानेवारी २०१९ पर्यंतच्या अहवालानुसार यंदा बागलाण, मालेगाव, चांदवड, येवला, सिन्नर या तालुक्यातील भूजल पातळी सर्वाधिक खाली गेली आहे. भूजल पातळीची मागील ३ वर्षातील ही सर्वात नीचांकी स्थिती आहे. – जीवन बेंडवाल, वरिष्ठ भू-वैज्ञानिक. भूजल सर्व्हेक्षण, नाशिक

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -