घरमनोरंजनफर्स्टक्लास म्हणावा... आणि स्टील ग्लास

फर्स्टक्लास म्हणावा… आणि स्टील ग्लास

Subscribe

बाई, अमिबा आणि स्टील ग्लास हे नाटकाचं नाव आहे, जे तुम्हा-आम्हाला संभ्रमात टाकतं. प्रायोगिक रंगभूमीमध्ये त्याची गणना केली जात असल्यामुळे त्यात वैचारिक, सामाजिक काही दडलेले असणार हे वेगळे सांगायला नको. किरण येले हा फक्त नाट्य लेखकच नाही तर अलिकडच्या काळात जे नवीन साहित्यिक उदयाला आले, त्यात त्याच्या लेखनाचे भरभरून कौतुक केले जात आहे. ‘मोराची बायको’ हा त्याचा कथासंग्रह येण्यापूर्वी कवी, नाटककार असे त्याच्या नावाला वलय होते. या पुस्तकाच्यानिमित्ताने वाचकवर्गात त्याचा स्वत:चा असा स्तर वाढलेला आहे. त्याला कारण म्हणजे साहित्य संघाने आणि लाभसेटवार फाऊंडेशनने पुरस्कार देऊन त्याच्या या पुस्तकाचे कौतुक केलेले आहे. बाईच्या कविता आणि मोराची बायको या दोन्ही पुस्तकांचे सदर्भ घेत किरण येले यांनी बाई, अमिबा आणि स्टील ग्लास हे नाटक लिहिलेले आहे. मनोरंजन करतेच परंतु काही वेगळे पाहिल्याचा, ऐकल्याचा आनंद देते.

प्रायोगिक नाटकाचे एक वैशिष्ठ्य आहे. सहसा प्रेक्षकांना काय अपेक्षित आहे याचा विचार या नाटकात फारसा केला जात नाही. पण जे कोणी प्रायोगिक नाटकाची निर्मिती करतात, ते आपल्याला नवीन काय सांगता येईल याचा विचार प्रामुख्याने अशा निर्मितीत करतात. हे करत असताना भले त्यात नेपथ्य, प्रकाश योजना, प्रशस्त रंगमंच या गोष्टीचा फारसा आग्रह धरत नाहीत. वातावरण निर्मिती होईल अशी काहीशी जुजबी प्रॉपर्टी वापरणे, त्याला अनुसरुन संगीत देणे या गोष्टीला महत्त्व देतात. परंतु साहित्यमूल्य, अभिनय, वेशभूषा या गोष्टीसाठी मात्र या निर्मात्याला तडजोड करणे मान्य नसते. त्यामुळे जे काही रंगमंचावर घडत असते ते प्रत्ययकारी, आनंद देणारे, वास्तवाच्या जवळ जाणारे असते. याचा अर्थ सगळ्याच निर्मात्यांना त्यात यश मिळते असे नाही. याचा प्रेक्षकवर्गही ठरावीक असल्यामुळे निर्मात्यांबरोबर कलाकार तंत्रज्ञ यांचीसुद्धा तेवढीच जबाबदारी वाढते. हा ध्यास जेव्हा एका निर्मितीच्याबाबतीत घेतला जातो, तेव्हा एक प्रगल्भ, सशक्त, सर्जनशील नाटक जन्माला येते. बाई, अमिबा आणि स्टील ग्लास हे नाटक त्याच प्रयत्नातले आहे. शिर्षकावरून नाटकात काय असेल याचा अंदाज बांधू नका. प्रत्यक्ष नाटक पहा. एकवेळ प्रेम व्यक्त करणे सोपे आहे पण शपथा, आणाभाका, एकत्र राहण्याची हमी याच्यापलीकडे विचारांची एक देवाणघेवाण असते ज्यात मानवी नात्यांचे, एकतर्फी प्रेमाचे दर्शन घडते जे अभिनयातून, संवादातून या नाटकात उलगडताना दिसते.

बाई, अमिबा आणि स्टीलचा ग्लास या तिन्ही गोष्टींत संकल्पना दडलेल्या आहेत म्हणण्यापेक्षा माणसाच्या रोजच्या जीवनाशी त्याला जेव्हा जोडले जाते तेव्हा या नावाची प्रचिती येते. दोन अंकांत हे नाटक सादर केले जाते. पहिल्या अंकात बाई आणि तिच्याकडे कुटुंबाचा , समाजाचा, सान्निध्यात आलेल्या मित्र-मैत्रिणींचा पहाण्याचा दृष्टिकोन काय असू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सगळ्या घडामोडीत प्रियकरही वेगळा असू शकतो हे यात अधोरेखित केलेले आहे. संचित वर्तक, परी तेलंग या कलाकारांनी प्रत्यक्षातल्या नावांचा आधार घेऊन अभिवाचनाने हा पहिला अंक सादर केलेला आहे. दुसरा अंक पाहिल्यानंतर दिग्दर्शक भीमराव मुडे यांनी अभिवाचनाचा आग्रह का धरला असा प्रश्न निर्माण होतो. उत्स्फूर्तपणे ही नाट्यकृती सादर केली असती तर ती अधिक भावली असती असे प्रामाणिकपणे वाटते. टॅब हातात बाळगल्याने हालचालींना, अभिनयाला मर्यादा आल्याचे जाणवते. पण किरण येले याचे लिखाण शोधकवृत्तीचे, बाईच्या सर्वांगीण वागणुकीचे, जीवनशैलीचा तपशील सांगणारे असल्यामुळे छान काही ऐकायला मिळते आहे हा आनंद इथे सर्वांत मोठा वाटतो. अमिबामध्ये निसर्गदत्त होणारे बदल माणसाच्या वागणुकीशी कसे साधर्म्य साधते हे अचूकपणे यात मांडलेले आहे.

- Advertisement -

दुसरा अंक हा स्टील ग्लासच्या अस्तित्त्वाची जाणीव करून देणारा आहे. प्रकाश योजना, रंगभूषा, वेशभूषा, कल्पक नेपथ्य याचा वापर झाल्यामुळे एक छान कलाकृती पहात असल्याचा आनंद दुसरा अंक देतो. यातल्या नायकाला शरीरसुखापेक्षा वेश्येबरोबर मोकळा संवाद साधून तिच्या अंतरंगाचा शोध घेणे आवडत असते. पण वेश्या ही इथे येणार्‍या प्रत्येक व्यक्तीचा हा स्वभावगुण आहे हे ओळखून त्याच्याशी संवाद साधत असते. पुढे हा व्यक्ती आपल्या विचारांशी एकनिष्ठ आहे म्हटल्यानंतर ही वेश्या त्याच्याबरोबर मैत्री करते. संवादातही सुख असते, नात्याचा ओलावा असतो हे दाखवत असताना लहानपणापासून तर ते प्रौढावस्थेपर्यंतचे स्त्रीचे बदलते रुप कसे असू शकते आणि या बदलत्या रुपाला पुरुषाला कसे सामोरे जावे लागते हे यात दाखवले गेलेले आहे. लेखकाइतकेच दिग्दर्शकालासुद्धा नाटकाच्या उत्तमतेचे श्रेय द्यावे लागेल. भूषण तेलंग याच्या संकल्पनेला लेखक, दिग्दर्शकाने आधार दिलेला आहे. संचित आणि परी यांनी कुशल अभिनयाने तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेला आहे. संपूर्ण नाटकाची जबाबदारी या दोन कलाकारांवर आहे. अन्य पात्रेही आजूबाजूला वावरत असल्याचा भास या कलाकारांनी निर्माण केलेला आहे. विषयाची जी गरज आहे ती प्रभावी सादरीकरणाने या दोन्ही कलाकारांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे.

परीची अनमोल कामगिरी
अभिनय म्हटलं की सर्वच कलाकार सर्वच भूमिकांत पारंगत असतात असे नाही. मग बरेचसे दिग्दर्शक त्या अभिनेत्रीचा आवाका लक्षात घेऊन तिच्यावर भूमिका सोपवत असतात. परी तेलंग ग्रेट म्हणावी अशी गोष्ट गेल्या तीन-चार महिन्यांत घडलेली आहे. अनुराधा गाणू लिखित बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावर आधारित नृत्यनाटिका आली होती. त्यात मुख्य भूमिका परीने केली होती. त्यात तिने काव्यातल्या स्त्रीचे दर्शन घडवले होते. मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस लांडगे या नाटकात मिश्किली पण विनोदी अशी स्त्रीची व्यक्तिरेखा ती सध्या साकार करत आहे. परीची अनमोल कामगिरी असे म्हणण्याचे कारण म्हणजे बाई, अमिबा आणि स्टील ग्लास यात साकार केलेली वेश्या लाजवाब म्हणण्यापेक्षा कायम स्मरणात राहील अशीच आहे. वेश्येचे बारीकसारीक तपशील ती सहज, उत्स्फूर्त, नखरेल अशा हालचालींतून दाखवते. नाटक पहायचे झाले तर लेखन, दिग्दर्शनाबरोबर तिच्या अभिनयासाठीही पहावे इतके ते महत्त्वाचे वाटते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -