घरमुंबईआता हाफकिन घडवणार उद्योजक

आता हाफकिन घडवणार उद्योजक

Subscribe

जीववैद्यकशास्त्रात तब्बल 119 वर्षांपासून संशोधन करत असलेल्या हाफकिनने बनवलेली औषधे, लसी, इंजेक्शनमुळे भारतालाच नव्हे तर जगातील अनेक देशांना फायदा झाला. आता संशोधकांचे संशोधन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच उद्योजक घडवण्यावरही हाफकिन लक्ष केंद्रित करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया अंतर्गत हाफकिनमध्ये इनक्युबेशन केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

जीववैद्यक क्षेत्रात लागणारी विविध उपकरणे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आयात केली जातात. हे प्रमाण जवळपास 80 टक्के इतके आहे. वैद्यकीय, दंतवैद्यकीय, शस्त्रक्रियेसाठी लागणारी उपकरणे आयात करावी लागत असल्याने डॉक्टरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे मेक इन इंडिया अंतर्गत हाफकिनमध्ये वैद्यकीय संशोधनावर आधारित उद्योगासाठी इनक्युबेशन सेंटर सुरू करण्यात येणार आहे. इनक्युबेशन सेंटरमार्फत आवश्यक उपकरणांवर संशोधन करून त्याची निर्मिती देशातच करण्यावर भर देण्यात येणार आहे.

- Advertisement -

इनक्युबेशन सेंटरसाठी नुकतेच हाफकिन संस्था व अभियांत्रिकी क्षेत्रात 60 वर्षे कार्यरत असलेली आयआयटी बी-बेटिक यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. इनक्युबेशन सेंटरमध्ये वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, डॉक्टर, संशोधक तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ यांचा ग्रुप बनवण्यात येणार आहे.

ग्रुपमधील संशोधक हे रुग्ण, औषधांबाबतच्या डॉक्टरांच्या गरजा लक्षात घेऊन त्यावर संशोधन करतील. सेंटरमध्ये केलेल्या संशोधनाची तपासणी सरकारी हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडून करण्यात येणार आहे. संशोधनासाठी जागा, लॅब, इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्था, मार्गदर्शन अशा सुविधा हाफकिनकडून पुरवण्यात येणार आहेत. संशोधकांनी बनवलेले उपकरण, मशिन्स यांची तपासणी करून त्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यासाठी उद्योजकाला प्रोत्साहन देण्याचे कामही सेंटर करणार आहे. यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला किंवा शैक्षणिक संस्थेला वैद्यकीय क्षेत्राशी संंबंधित संशोधन करून त्याचे उत्पादन बाजारात आणण्यासाठी आर्थिक मदतही केली जाणार आहे. यामध्ये पेटंट, परवाना, कायदेशीर मान्यता याची पूर्तता करण्यासाठी पाठिंबा देण्यात येणार आहे. त्यामुळे संशोधकांनी किंवा विद्यार्थ्यांनी केलेले संशोधन हे फक्त लॅबपुरते मर्यादित न राहता ते हॉस्पिटल व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठीही हाफकिनकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

सेंटरमध्ये केलेले संशोधन बाजारामध्ये आणण्यासाठी उद्योग उभारण्यासाठी हाफकिनकडून प्रयत्न करण्यात येत असल्यामुळे रोजगार निर्मितीही मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहेे, अशी माहिती हाफकिन संस्थेच्या संचालिका डॉ. निशिगंधा नाईक यांनी दिली.

मार्चमध्ये हॅकेथॉन

वैद्यकीय उपकरण संदर्भातील हॅकेथॉन मार्चमध्ये घेण्यात येणार आहे. हॅकेथॉनमध्ये इनक्युबेशन सेंटरला मूर्तरूप देण्यास सुरुवात होईल, अशी माहिती हाफकिन्स संस्थेच्या संचालिका डॉ. निशिगंधा नाईक यांनी दिली.
इनक्युबेशन सेंटरसाठी विशेष बैठक

इनक्युबेशन सेंटरसंदर्भात नुकतीच हाफकिनमध्ये एक बैठक झाली. बैठकीला टाटा कर्करोग हॉस्पिटलच्या पॅथॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. सुमित गुजराल, सायन हॉस्पिटलचे प्लास्टिक सर्जन डॉ. मुकुंद जगन्नाथन व हिंदुजा हॉस्पिटलचे डॉ. शैलेश रानडे, नायर हॉस्पिटलच्या श्वसन विभागाच्या डॉ. उन्नती देसाई, केईएमच्या शल्यविशारद डॉ. वर्षा कुलकर्णी, गॅस्ट्रोअ‍ॅन्टेरोलॉजिस्ट डॉ. शोभना भाटिया, एनआयआरआरएचच्या संचालिका डॉ. स्मिता महाले, स्त्रीरोगप्रसूतीतज्ज्ञ डॉ. निखिल दातार आदी उपस्थित होते.

हाफकिनच्या भोवताली असणार्‍या मोठ्या हॉस्पिटल्समुळे इनक्युबेशन सेंटरमधील कल्पक प्रयोगांची व आधुनिक उपकरणांची चाचणी-पडताळणी सुलभ होईल. त्यामुळे लवकरात लवकर सुयोग्य तंत्रप्रणालीचे उत्पादन शक्य होईल.
– प्रा. बी. रवी,
प्रमुख, आयआयटी बी-बेटिक

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -