घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टराजेंची हॅट्ट्रिक की सेनेचा विजय?

राजेंची हॅट्ट्रिक की सेनेचा विजय?

Subscribe

सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात आहेत, त्यामुळे ते तिसर्‍यांना निवडून येणार की शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील हे राजेंचा पराभव करणार याबाबत आता सातारकरांना उत्सुकता लागली आहे. दोन्ही बाजूने प्रचारांचा धुराळा उडाला आहे. त्यामुळे मतदारांवर कुणाचा प्रभाव पडला आहे. हे बुधवारी, २३ एप्रिल रोजी तिसर्‍या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर निकालावेळी स्पष्ट होणार आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. 1996 ते 1998 हा एकमेव अपवाद वगळता हा मतदारसंघ सुरुवातीला काँग्रेस आणि 1999 पासून कायम राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिला आहे. क्रांतीसिंह नाना पाटील, किसन महादेव वीर उर्फ आबासाहेब वीर, यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे दिग्गज नेतृत्व देणारा हा मतदारसंघ आहे. लोकसभा निवडणूक 2019 साठी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवार उदयनराजे भोसले विरुद्ध शिवसेना उमेदवार आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यात सामना आहे. तसेच, वंचित बहुजन आघाडीतर्फे सहदेव ऐवळे आणि बसपकडून आनंदा थोरवडे हे उमेदवार देखील रिंगणात आहेत.

- Advertisement -

सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व मागील दहा वर्षांपासून उदयनराजे भोसले हे करीत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे राष्ट्रवादीच्या आमदारांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता. मात्र, शरद पवार यांनी उदयनराजे यांनाच उमेदवारी जाहीर केल्यानंतर आमदारांनी आपल्या तलवारी म्यान केल्या अणि उदयनराजे यांचा प्रचार सुरू केला. उदयनराजेंच्या विरुद्ध माथाडी नेते नरेंद्र पाटील हे शिवसेनेकडून मैदानात उतरले आहेत. माथाडी कामगार नेता म्हणून प्रतिमा असलेले नरेंद्र पाटील हे राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्षपद दिल्यानंतर त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला. मात्र, जागा वाटपामध्ये सातार्‍याची जागा शिवसेनेला गेली. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली.

या आधीच्या निवडणुकांचा इतिहास पाहिला तर, गेल्या काही वर्षांत लोकसभा निडवणुकीत सातारा मतदारसंघात उदयनराजे फॅक्टरच चालल्याचे पाहायला मिळते. रांगडी भाषा आणि हटके स्टाईल हे उदयनराजे यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ठ्य आहे. भाषणादरम्यान चित्रपटातील डायलॉग फेकणे आणि शर्टची कॉलर उडवणे या उदयनराजे यांच्या स्टाईलवर त्यांचे चाहते आणि कार्यकर्ते नेहमीच फिदा असतात. असे असले तरी, या वेळी सातार्‍याची जनता कोणाला आपला प्रतिनिधी म्हणून निवडते हे प्रत्यक्ष निकालाच्या दिवशीच कळणार आहे.

- Advertisement -

कुणाचा प्रचार किती परिणामकारक?
लोकसभेच्या निवडणूक प्रचारात सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांची जोरदार चर्चा आहे. राज ठाकरे यांची सातार्‍यातही सभा झाली, त्यामुळे राष्ट्रवादीसाठी अर्थात उदयनराजे भोसले यांच्यासाठी ही जमेची बाजू झाली. शरद पवारांसह राष्ट्रवादीचे दिग्गज नेत्यांच्या प्रचाराच्या फेर्‍याही झाल्या आहेत. त्याचप्रमाणे शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या समर्थनार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली, त्या पाठोपाठ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा झाली. अशा प्रकारे महायुतीचे स्टार प्रचारकही या मतदारसंघात फिरकले आहेत, त्यामुळे कुणाचा प्रचार किती परिणामकारक झाला हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -