घरमहाराष्ट्रमहाडमधील बगीचे कोमेजले!

महाडमधील बगीचे कोमेजले!

Subscribe

ऐन सुट्टीच्या काळात बच्चे कंपनीचा हिरमोड

परीक्षा संपताच बच्चे कंपनीची पावले बगीच्यांकडे वळली खरी, मात्र त्यांची झालेली दुरवस्था पाहून त्यांचा हिरमोड झाला आहे. शहरात असलेल्या बागा कोमेजल्या आहेत. छत्रपती शिवाजी चौकातील एकमेव बाग सध्या काहीशा धड अवस्थेतील असली तरी तेथील खेळणी मोडली आहेत. इतर बगीचे मात्र ओस पडले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे विविध ठेक्याच्या रूपाने नगर पालिका या बगिच्यांवर लाखो रुपये खर्च करीत आहे.

छत्रपती शिवाजी चौक येथील राजमाता जिजामाता उद्यान, दादली पुलाजवळील छत्रपती शिवाजी उद्यान अशा दोनच बागा अस्तित्त्चात आहेत. यातील राजमाता जिजामाता उद्यान, चवदार तळे येथील खुले प्रांगण याच ठिकाणी लहान मुलांना मनमोकळे खेळता येते. इतर बगिच्यांची पुरती दुरवस्था झाली आहे. परीक्षा संपताच लहान मुलांची पावले या बगिच्यांकडे वळतात. लहान मुलांची आवडती खेळणी असलेले राजमाता जिजामाता उद्यान एकमेव आहे. यात फुलांचा पत्ता नसला तरी मुलांची मात्र खेळण्यासाठी गर्दी असते. या बागेतील खेळणी जुनी झाली असून एकमेव खेळण्यांची बाग असल्या कारणाने या ठिकाणी बच्चे कंपनी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. खेळण्यांची संख्या कमी आणि मुलांची संख्या अधिक यामुळे खेळणी अल्पावधीतच नादुरुस्त होत आहेत. यातील अनेक खेळणी धोकादायक स्थितीत आहेत. सर्व खेळणी लोखंडी असल्याने वरील पत्रा गंजून गेला आहे. गंजलेल्या पत्र्याचा भाग मुलांच्या जीविताला धोकादायक ठरत आहे. हा पत्रा लागून गेल्या वर्षी दोन ते तीन लहान मुले जखमी झाली होती. तक्रारी करून देखील नगर पालिका दुर्लक्ष करीत आहे.

- Advertisement -

दादली पुलानजीक असलेल्या बगिच्याचे काम गेले अनेक वर्षे अर्धवट अवस्थेत पडून असून, तेथील वीज, देखभाल आदींवर लाखो रुपये खर्च केले जात आहेत. शिवाय हे उद्यान गेले वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. या ठिकाणी स्वच्छता नसल्याने या बागेकडे बच्चे कंपनी आणि त्यांच्या पालकांनी पाठ फिरवली आहे. हे उद्यान बंद असले तरी देखभाल दुरुस्तीसाठी प्रति महिना 12 हजार 750 रुपये खर्च केला जातो. वीज व्यवस्थेवर देखील खर्च टाकला जात आहे. त्याचप्रमाणे चवदारतळे येथील खुले प्रांगण केवळ बसण्यासाठी आणि लहान मुलांना स्वैर फिरण्यासाठी आहे. या ठिकाणी कोणतीच खेळणी नसल्याने इथेही फारशी गर्दी होत नाही. चवदारतळे येथील मागील बाजूला नाना-नानी पार्कचे काम केले गेले, मात्र याची देखील दुरवस्था आहे.

राजमाता जिजाऊ उद्यानाच्या शेजारील नाल्यावरील संरक्षक कठडा देखील तुटला आहे. देखभाल दुरुस्तीसाठी सन 2017 मध्ये काढलेली निविदा आणि नेमण्यात आलेला ठेकेदार आजही कायम आहे. येथील खराब अवस्थेतील खेळणी काढून टाकली असली तरी नवीन खेळणी अद्याप बसविलेली नाहीत. या ठिकाणी देखील देखभाल दुरुस्तीसाठी देण्यात आलेल्या ठेकेदाराला प्रतिमहिना 48 हजार 750 रुपये दिले जातात. यामध्ये शिवाजी चौक येथील सर्कल, अर्धपुतळा आणि बगीचा यांच्या देखभाल दुरुस्तीचा समावेश आहे.

- Advertisement -

नवीन प्रस्ताव तयार केला असून, तीन कोटीचे अंदाजपत्रक तयार आहे. लवकरच नवीन खेळणी बसवली जातील. तसेच चवदारतळे सुशोभीकरण कामाचा देखील समावेश केला आहे. प्रस्ताव पाठवला असून निधी प्राप्त होताच कामे पूर्ण होतील. – सुहास कांबळे, नगर पालिका अभियंता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -